तलवारीने केक कापून जल्लाेष, पाेलिसांचा दणका; ७ जणांवर गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Published: February 7, 2023 08:53 PM2023-02-07T20:53:05+5:302023-02-07T20:53:41+5:30

‘बर्थ डे बाॅय’सह पाच जण ताब्यात, दाेघांचा शाेध सुरू...

cutting the cake with a sword police registered crime against 7 persons in latur | तलवारीने केक कापून जल्लाेष, पाेलिसांचा दणका; ७ जणांवर गुन्हा

तलवारीने केक कापून जल्लाेष, पाेलिसांचा दणका; ७ जणांवर गुन्हा

googlenewsNext

लातूर : तलवारीने केक कापून रस्त्यावर वाढदिवसाचा जल्लाेष करणे सात जणांना महागात पडले आहे. लातुरातील विवेकानंद चाैक पाेलिसांनी कायद्यासह दंडुका दाखवित आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करून, ‘बर्थ डे बाॅय’सह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. रस्त्यावर सेलिब्रेशन करण्याची एक विचित्र पद्धत रुढ हाेत आहे. परंतु, रस्ता अडविणे, रहदारीला अडथळा करणे, येणाऱ्या-जाणाऱ्यास त्रास हाेईल, असे वर्तन करणे हा गुन्हा असून, पाेलिस अशा महाभागांना चांगलाच धडा शिकवित आहेत.

पाेलिसांनी सांगितले, विवेकानंद चाैक ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी तरुणांनी एकत्र येत बर्थ डेचा केक तलवारीने कापला असून, काही तरुण तलवारी बाळगून असल्याची माहिती पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांना खबऱ्याने दिली. याप्रकरणी पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, लातूर उपविभागीय पाेलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आराेपींचा शाेध घेत मंगळवारी पाच जणांना अटक केली.

याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात जव्वाद अजमद देशमुख (वय २२, रा. लातूर), वशीम खलील शेख (वय २२, रा. लातूर), महेताब माजीद शेख (वय १८, रा. तुळजापुरेनगर, लातूर), अफताफ उर्फ अरबाज शेरखान पठाण (वय २१, रा. लातूर), अबरार अरशद देशमुख (वय २३, रा. लातूर), अतुल्ला अस्लम देशमुख (रा. लातूर) आणि साहिल सिकंदर शेख (रा. हत्तेनगर, लातूर) यांच्याविराेधात गुरनं. ९२/२०२३ कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १८८, ३४ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील अतुल्ला देशमुख आणि साहिल शेख हे दाेघे पळून गेले आहेत.

लाेखंडी कत्ती, दाेन तलवारी केल्या जप्त...

विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी पाच जणांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून लाेखंडी कत्ती आणि दाेन तलवारी जप्त केल्या आहेत. तर सातपैकी पळून गेलेल्या दाेघांचा पाेलिसांकडून शाेध सुरू आहे, अशी माहिती पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी दिली.

खबऱ्याच्या माहितीनंतर पाच जणांना उचलले...

तलवारीने केक कापून सेलिब्रेशन केल्याची, तलवारीसह इतर शस्त्र बाळगून असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. या माहितीची खातरजमा करून, आराेपींचा शाेध सुरू केला. दरम्यान, मंगळवारी बर्थ डे बाॅयसह पाच जणांना उचलण्यात पाेलिसांना यश आले. मात्र, दाेघे जण पाेलिसांच्या तावडीतून निसटले आहेत.

अन्य ठाण्यांच्या कारवाईकडे लक्ष...

लातूर शहरातील अन्य पाेलिस ठाण्यांच्या भागातही अनेकदा असेच लपून-छपून बर्थ डे सेलिब्रेशन सुरू असते. विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी दाखविलेली तत्परता इतर पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत दिसली तर अनेकांना जरब बसणार आहे. त्यामुळे भविष्यातील कारवाईकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: cutting the cake with a sword police registered crime against 7 persons in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.