देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार ट्रॅक्टरला धडकली; चौघे जागीच ठार
By हरी मोकाशे | Published: March 3, 2024 05:37 PM2024-03-03T17:37:35+5:302024-03-03T17:39:42+5:30
लातूर- नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारातील घटना.
हरी मोकाशे, लातूर : तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडकली. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना लातूर- नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारात रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली.
माेनू बालाजी कोतवाल (२७), शिवराज हरिश्चंद्र लंकाढाई (२६), कृष्णा मंडके (२४), नर्मन राजाराम कात्रे (३३, सर्वजण रा. नांदेड) अशी मयत चौघांची नावे आहेत. चाकूर ठाण्यातील पोलिस हवालदार भागवत मामडगे यांनी सांगितले, नांदेड येथील मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके, शुभम किशोर लंकाढाई (२२) हे चौघे मित्र तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कार (एमएच २६, बीसी ८२८६) ने शनिवारी रात्री निघाले होते. दरम्यान, ते चाकूर तालुक्यातील महाळंग्रा शिवारात पोहोचले असता कारचालक नर्मन राजाराम कात्रे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला कारने पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके यांच्यासह चालक नर्मन कात्रे हे चौघे जागीच ठार झाले. शुभम लंकाढाई हा गंभीर जखमी झाला. त्याला लातुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची अद्यापही चाकूर पोलिसांत नोंद नसल्याचे पोलिस हवालदार मामडगे यांनी सांगितले.