सावधान! लातूरात कचरा जाळणाऱ्यांवर मनपाच्या चार पथकांची नजर

By हणमंत गायकवाड | Published: March 26, 2024 07:24 PM2024-03-26T19:24:10+5:302024-03-26T19:24:50+5:30

स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पथक

Beware! Four teams of Municipal Corporation keep an eye on those who burn garbage in Latur | सावधान! लातूरात कचरा जाळणाऱ्यांवर मनपाच्या चार पथकांची नजर

सावधान! लातूरात कचरा जाळणाऱ्यांवर मनपाच्या चार पथकांची नजर

लातूर : लातूर शहरात कचरा जाळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी मनपा आयुक्तांनी शहरातील चारही झोनमध्ये स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथकांची नियुक्ती केली आहे. सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी पाच ते आठ या वेळेत चारही झोनमध्ये पथकांचा फेरफटका राहणार आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून चारही झोन मध्ये पथकांची कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत बारा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याच लोकांकडून पुन्हा कचरा जाळल्याची पुनरावृत्ती झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. चारही झोनमध्ये प्रत्येकी तिघांकडून पाचशे रुपये असे एकूण बारा व्यक्तींकडून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड कचरा जाळल्यामुळे वसूल करण्यात आला आहे.

लातूर शहरामध्ये अनेक ठिकाणी कचरा जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात आगीच्या ज्या घटना घडल्या आहेत. त्यात निम्म्यापेक्षा अधिक कचरा जळाल्याच्या घटना आहेत. यामुळे प्रदूषण होते. म्हणून महापालिकेच्या आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षकांचे पथक नियुक्त केले आहे. चारही झोनला स्वच्छता निरीक्षकांचे पथक असून त्यात तिघांचा समावेश आहे. या पथकाचा फेरफटका प्रत्येक झोनमध्ये सकाळी आणि सायंकाळी दररोज होत आहे.

स्वच्छता निरीक्षकांचे क्षेत्रनिहाय पथक...
 कचरा जाळण्यास प्रतिबंध करण्यासाठी क्षेत्रनिहाय स्वच्छता निरीक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहेत. क्षेत्र अ मध्ये स्वच्छता निरीक्षक शिवराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अमजद शेख, प्रल्हाद शिंदे, गजानन सुपेकर, प्रदीप गायकवाड यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
 या पथकाने गेल्या तीन दिवसांमध्ये तिघांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा  दंड कचरा जाळल्यामुळे वसूल केला आहे.

क्षेत्रिय कार्यालय ब अंतर्गत स्वच्छता निरीक्षक धोंडीबा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी कुटकर, श्रीकांत शिंदे, सुरेश कांबळे यांचे पथक तैनात झाले आहे. या पथकानेही गेल्या दोन दिवसांमध्ये तिघांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. एकूण दीड हजारांचा दंड वसूल केला आहे.

क्षेत्रीय कार्यालय क अंतर्गत सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रवी शेंडगे, महादेव फिस्के, सिदाजी मोरे यांचे पथक कार्यान्वित झाले आहे. या पथकाने गेल्या दोन दिवसांमध्ये तिघांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Web Title: Beware! Four teams of Municipal Corporation keep an eye on those who burn garbage in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.