कोल्हापूर विभागात बारावीच्या साडेसात लाख उत्तरपत्रिका तपासणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 07:11 PM2018-02-27T19:11:29+5:302018-02-27T19:11:29+5:30

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार टाकला आहे. तो आठव्या दिवशीही कायम राहिला. या आंदोलनामुळे कोल्हापूर विभागातील बारावीच्या सुमारे साडेसात लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत.

Without scrutiny in the Kolhapur section about 14 lakhs of post-XII examination | कोल्हापूर विभागात बारावीच्या साडेसात लाख उत्तरपत्रिका तपासणीविना

कोल्हापूर विभागात बारावीच्या साडेसात लाख उत्तरपत्रिका तपासणीविना

Next
ठळक मुद्देकोल्हापूर विभागात बारावीच्या साडेसात लाख उत्तरपत्रिका तपासणीविनाकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बहिष्कार कायम

संतोष मिठारी

कोल्हापूर : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार टाकला आहे. तो आठव्या दिवशीही कायम राहिला. या आंदोलनामुळे कोल्हापूर विभागातील बारावीच्या सुमारे साडेसात लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत.

नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अर्धवेळ शिक्षकांना सेवासंरक्षण, पूर्णवेळ शिक्षकांना लाभ द्यावा. दि. २ मे २०१२ नंतरच्या पायाभूत रिक्त पदांवर विद्यार्थिहितासाठी नियुक्त शिक्षकांच्या मान्यता, वेतन नियुक्ती दिनांकापासून मिळावे, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन स्वतंत्र करावे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. महासंघाने याअंतर्गत बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार घातला आहे.

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली. पहिल्या पेपरदिवशीच नियामकांनी उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापन कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याची नोटीस शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिवांना देऊन आंदोलन सुरू केले. यानंतर मंगळवारअखेर बारावीचे आठहून अधिक पेपर झाले आहेत.

यावर्षी कोल्हापूर विभागातील सुमारे एक लाख २९ हजार ९३९ परीक्षार्थी आहेत. या बहिष्कार आंदोलनामुळे सुमारे साडेसात लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन लवकर सुरू झाले नाही, तर त्याचा परिणाम निकालावर होणार आहे.

तोडगा निघण्याची शक्यता

विद्यार्थिहित लक्षात घेऊन उत्तरपत्रिका मूल्यमापनाबाबत सहकार्य करण्याचे आवाहन शिक्षण मंडळाने शिक्षकांना केले आहे. शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबईत शिक्षणमंत्र्यांसमवेत महासंघाच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाली. बुधवारी पुन्हा चर्चा होणार आहे. यातून तोडगा निघण्याची शक्यता आहे.

 

प्रलंबित मागण्यांबाबत शासनाची राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा सुरू आहे. मागण्यांच्या पूर्ततेबाबत सरकारने लेखी पत्र दिल्याशिवाय बहिष्कार मागे घेतला जाणार नाही. याबाबत उद्या, गुरुवारपर्यंत कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
- प्रा. अविनाश तळेकर,
राज्य कार्याध्यक्ष, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

 

बारावीचे आजअखेर आठहून अधिक पेपर झाले आहेत. बहिष्कार आंदोलनामुळे अद्यापही उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे कामकाज सुरू झालेले नाही. या आंदोलनाबाबत नियामक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने दिलेल्या निवेदनांची माहिती वरिष्ठ कार्यालयाला दिली आहे.
- पुष्पलता पवार,
कोल्हापूर विभागीय सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
 

 

Web Title: Without scrutiny in the Kolhapur section about 14 lakhs of post-XII examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.