फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सोय न केल्याने मोडले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:47 AM2019-07-05T00:47:09+5:302019-07-05T00:50:01+5:30

पाहुण्यांची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली नाही, मुलाला सोन्याची चेन व ब्रेसलेट घातले नाही, या कारणांमुळे ऐन साखरपुड्यावेळी लग्न मोडून वराकडील सर्वजण निघून गेल्यामुळे नियोजित वधूने बदनामी

The wedding was not broken by the convenience of a five star hotel | फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सोय न केल्याने मोडले लग्न

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सोय न केल्याने मोडले लग्न

googlenewsNext
ठळक मुद्देसाखरपुडा मोडून वर गेला निघून : ठाण्याच्या सहाजणांविरुद्ध गुन्हा

कोल्हापूर : पाहुण्यांची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली नाही, मुलाला सोन्याची चेन व ब्रेसलेट घातले नाही, या कारणांमुळे ऐन साखरपुड्यावेळी लग्न मोडून वराकडील सर्वजण निघून गेल्यामुळे नियोजित वधूने बदनामी झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी दिली.

पोलिसांनी नियोजित वर सुनील पंडितराव शिंदे (रा. माणिक निवास, ए विंग्ज अपार्टमेंट, खारगाव, काळवा, ठाणे, वेस्ट) याच्यासह त्याचे वडील, दोन बहिणी व त्यांचे जावई अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

मुलगा सुनील शिंदे याच्यासह त्याचे वडील पंडितराव देवीबाराव शिंदे, भाऊ अनिरुद्ध शिंदे, बहीण शीतल अरुण गलांडे, स्वाती रोहित साळवी, मेहुणे रोहित साळवी (सर्व रा. ठाणे, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, शाहूपुरीतील उच्चशिक्षित मुलीचा विवाह सुनिल शिंदे यांच्याशी ठरला होता. त्यामध्ये मुलीकडेच साखरपुडा व लग्न करण्याचे ठरले होते. मुलीच्या घरच्यांनी मुलीला स्वखुशीने १५ तोळे सोने घालण्याचे चर्चेत ठरले होते. दोन्हीकडील पाहुण्यांच्या संमतीने दि. २६ जून रोजी साखरपुडा करण्याचे ठरले. साखरपुड्याच्या आदल्या दिवशी ठाण्यातील वराकडील १२ पाहुणे कोल्हापुरात आले. त्या पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था मध्यवर्ती बसस्थानकावरील हॉटेलमध्ये केली होती; पण त्याच दिवशी सायंकाळी वराचा भाऊ अनिरुद्ध शिंदे, बहीण शीतल गलांडे, स्वाती साळवी व तिचा पती रोहित साळवी हे मुलीच्या घरी आले. त्यांनी आमचा अपमान झाल्याचा मुद्दा उचलून धरला.

पाहुण्यांची सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये का केली नाही? असा जाब मुलीच्या वडिलांना विचारला. आम्ही मुलीला १० तोळे सोन्याचे दागिने घालणार आहोत. वराला साखरपुड्यात तुम्ही सोन्याची चेन आणि ब्रेसलेट घातले पाहिजे, असा हट्ट धरला. यावेळी मुलीच्या वडिलांनी पाहुण्यांना हाता-पाया पडून समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी वराकडील मंडळींनी वादावादी केली. दर्जेदार हॉटेलमध्ये सोय न करता तुम्ही आमचा अपमान केला; त्यामुळे लग्न मोडणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर पुढील काही दिवसांत मध्यस्थांनी दोन्हीही कुटुंबांत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण वराकडील लोकांनी लग्न मोडल्याचा निरोप दिला. त्यानंतर अशा पद्धतीने बदनामी केल्याबद्दल मुलीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात वर मुलासह सहाजणांविरुद्ध तक्रार दाखल केली.
---------
मुलीच्या नातेवाइकांची तारांबळ...
साखरपुड्या दिवशी सकाळी मुलीच्या भावाने हॉटेलवर जाऊन पाहुण्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दुपारी घरी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना सर्व पाहुणे जमले होते. त्याचवेळी वराकडील हॉटेलवरील पाहुणे हे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला येण्याऐवजी ठाण्याकडे रवाना झाले. पाहुणे निघून गेल्याचे समजताच मुलीच्या नातेवाइकांची तारांबळ उडाली. त्यांनी वराच्या वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी तो उचलला नाही.


उच्चशिक्षित मुलगी..
संबंधित मुलगी उच्चशिक्षित असून ती सध्या विद्यापीठात पीएच डी करत आहे.

 

 

Web Title: The wedding was not broken by the convenience of a five star hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.