आम्ही सैन्य भरतीसाठी आलोय.... हॉटेलमालक म्हणाला 'मग पोटभर खा अन् फुकट जेऊन जा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 03:48 PM2019-02-26T15:48:25+5:302019-02-26T15:49:12+5:30

कोल्हापूरमध्ये सैन्य भरतीच्या परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी तब्बल दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावली आहे.

We are here for the recruitment of the army .... hotel owner serve free food for students in kolhapur | आम्ही सैन्य भरतीसाठी आलोय.... हॉटेलमालक म्हणाला 'मग पोटभर खा अन् फुकट जेऊन जा'

आम्ही सैन्य भरतीसाठी आलोय.... हॉटेलमालक म्हणाला 'मग पोटभर खा अन् फुकट जेऊन जा'

कोल्हापूर : शहरतील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी निवड चाचणी मेळाव्यास सोमवारी प्रारंभ झाला आहे. त्यासाठी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार राज्यांतूनही मुले आली आहेत. तर गोंदिया, यवतमाळपासून सैन्यभरती होण्यासाठी मुले कोल्हापुरात दाखल झाली आहे. या मुलांना येथील एका हॉटेलमालकाने सुखद धक्का दिला आहे. सैन्य भरतीसाठी आलेल्यांना चक्क मोफत जेवण येथील हॉटेल मालकाने दिले. त्यामुळे ही मुलेही भावूक झाली. 

कोल्हापूरमध्ये सैन्य भरतीच्या परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी तब्बल दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावली आहे. रविवारपासून रात्रभर फुटपाथवर झोपलेल्या या मुलांनी सकाळपासून जवळच्या हॉटेलात तुडुंब गर्दी केली होती. मात्र, आपल्या खिशाचा सल्ला घेऊनच ही मुले हॉटेलमध्ये शिरत होती. त्यावेळी तेथील हॉटेलमालक म्हणाला, ''आधी आत या, पोटभर खा, असतील तर पैसे द्या नाहीतर फुकट जेऊन जा.."

त्यावर, ती मुले म्हणाली, अहो, काका, काही हॉटेल्सनी आमची गर्दी पाहून रेट दुप्पट केले आहेत. म्हणूनच काल रात्री 170 अन् 200 रुपयांनी  थाळी जेवलोय. म्हणूनच आधी रेट विचारतोय. त्यावर पुन्हा एकदा या हॉटेलमालकाने मुलांना सांगितलं. "पैशाची काळजी करुच नका. आमची साधी थाळी 70 रुपयालाच मिळेल. तेही असतील तर द्या... नाहीतर फुकट खा.. काहीच प्रॉब्लेम नाही, पण उपाशीपोटी राहू नका. हॉटेल मालकाच्या या उत्तराने ही मुले अगदी भारवून गेली. त्यानंतर, या हॉटेलवर मुलांची मोठी गर्दीही झाली. त्यामुळे या गर्दीसाठी जेवणाचे नियोजन करणे हॉटेल मालकाला अशक्य बनले होते. त्यावेळी त्याने आपल्या मित्रांची, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पुण्याहून आलेल्या काही मित्रांची मदत घेऊन या भावी सैनिकांची भूक भागविण्याचं काम केलं.

हॉटेल खमंग... खाऊया आनंदे... याचे मालक सुधांशू यांनी निस्वार्थपणे सैन्यात भरतीसाठी आलेल्या तरुणांना जेवण वाढले. सकाळपासून 400 जणांना जेवण आणि 300 जणांना नाश्ता त्यांनी दिला. मात्र, आपल्या गल्ल्यात किती पैसे जमा झालेत आणि किती जणांनी पैसे दिलेत, हे अजिबात पाहिले नाही. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही तरुण पोरं सैन्यात भरती होतात, हे पाहूनच मला आनंद झाल्याचं हॉटेलमालक सुधांशू यांनी म्हटलंय. 

कोल्हापूर येथील 109 इन्फंट्री (टी. ए.) मराठा लाईट इन्फंट्री बटालियनतर्फे नियोजन केलेल्या भरती मेळाव्यात प्रादेशिक सैन्य भरतीसाठी शिपाई (जनरल ड्युटी), शिपाई क्लार्क, शिपाई (चीफ), शिपाई (स्पेशल चीफ), शिपाई (हाऊसकीपर), शिपाई (हेअर ड्रेसर) या पदांसाठी 2 मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या मेळाव्यात 18 ते 42 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना भरतीत सहभागी होता येणार आहे. पहाटे तीन वाजल्यापासूनच टेंबलाईवाडी येथील बीएसएनएल चौक येथे गर्दी होऊ लागली. पहिल्या दिवशी फक्त कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि बेळगाव जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया होती. मात्र, महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील उमेदवारांनी हजेरी लावल्याने मोठा गोंधळ उडाला. एकाचवेळी दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतल्याने पुढे जाण्यावरून उमेदवारांमध्ये ढकलाढकलीचा प्रकार होऊ लागल्याने गोंधळात अधिकच भर पडली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सौम्य लाठीहल्ला करून परिस्थिती नियंत्रणात आणली. 
 

 

Web Title: We are here for the recruitment of the army .... hotel owner serve free food for students in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.