ऊसदराची कोंडी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:48 AM2017-11-06T00:48:35+5:302017-11-06T00:51:34+5:30

Uissarachi Kondi Shuttle | ऊसदराची कोंडी फुटली

ऊसदराची कोंडी फुटली

Next


कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने रविवारी झालेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत अखेर ऊसदराची कोंडी फुटली. ‘एफआरपी अधिक २०० रुपये’ असा तोडगा निघाला असून, विनाकपात एफआरपी अधिक १०० रुपये पहिली उचल मिळणार आहे. उर्वरित १०० रुपये दोन महिन्यांनंतर देण्यावर एकमत झाले. त्यामुळे आज, सोमवारपासून कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
हा तोडगा मान्य करून तो कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित असला तरी इतर जिल्ह्यांनीही त्यानुसारच पहिली उचल द्यावी, असे आवाहन स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले. शेट्टी यांनी प्रतिटन ३४०० रुपये, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी प्रतिटन ३५०० रुपये, तर ‘रयत’चे नेते व कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एफआरपी अधिक ३०० रुपयांची पहिली उचल मागितली होती. तिन्ही संघटनांनी यामध्ये लवचिकता दाखविली; पण चर्चेसाठी कोणी पुढाकार घ्यायचा, असा पेच निर्माण झाला
होता.
शनिवारी खासदार शेट्टी, प्रा. संजय मंडलिक व प्रकाश आवाडे यांची बैठकीच्या माध्यमातून तडजोडीचे पहिले पाऊल पडले. शेतकरी संघटनेची लवचिकता व कारखानदारांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन रविवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावली. बैठकीत निघालेला तोडगा मान्य नसल्याचे व आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे
रघुनाथदादा पाटील व अंकूश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी नंतर जाहीर केले.
‘एफआरपी’ व ७० : ३० चे दोन कायदे असताना प्रत्येक वर्षी साखर कारखानदारांची अडवणूक योग्य नाही. गतवर्षी एफआरपी अधिक १७५ रुपयांवर तडजोड झाली असली तरी अनेक कारखान्यांनी ‘एफआरपी’पेक्षा ६०० रुपये जादा दिले आहेत. मग हंगामाच्या सुरुवातीलाच खोडा का घालता? अशी विचारणा आमदार हसन मुश्रीफ व विनय कोरे यांनी केली. यावर हरकत घेत कायद्याची भाषा आता बोलता; मग ‘एफआरपी’ देण्याची ताकद कारखान्यांकडे नव्हती त्यावेळी ‘८० : २०’ हा फॉर्म्युला कोणी आणला? त्यावेळी तुमचा कायदा कोठे गेला होता? आम्ही दोन पावले मागे घेऊन दर मान्य केला. आता साखरेचे दर चांगले असल्याने शेतकºयांना चार पैसे जादा मिळाले तर बिघडले कोठे? अशी विचारणा खासदार शेट्टी यांनी केली. गुजरातमधील कारखाने ४४०० रुपये दर देऊ शकतात. मग तुम्हाला अशक्य का? असे रघुनाथदादा पाटील यांनी विचारले.
गुजरातमधील सोळा कारखान्यांचे सोळा दर आहेत. ४४०० रुपये दर देणारा कारखाना सभासदांना किती दराने साखर देतो, किती गाळप होते, हे पाहणे गरजेचे असून, त्या कारखान्याने गतवर्षीच एवढा दर दिल्याचे ‘शाहू’चे व्यवस्थापकीय संचालक विजय औताडे यांनी सांगितले.
मागील दरात गफलत केल्याचा आरोप ‘अंकुश’ संघटनेने केला. यावर मागील कायद्याप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे, या हंगामावर चर्चा करा, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. मंत्री पाटील यांनी साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चा करून एफआरपी अधिक २०० रुपयांवर तोडगा काढून ऊसदराची कोंडी फोडली.
बैठकीस ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री व जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे, कुंभी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके, प्रा. संजय मंडलिक, के. पी. पाटील, अशोक चराटी, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विजय देवणे, राजीव आवळे, सुरेश पाटील, पी. जी. मेढे, आदींसह संघटनांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
पालकमंत्र्यांची शिष्टाई सफल
गत हंगामातही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन बैठक बोलाविल्याने ऊसदरातून फारसा संघर्ष न होता तोडगा निघाला होता. यंदाही त्यांनीच पुढाकार घेऊन लाखो शेतकºयांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाची कोंडी फोडली. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे; परंतु आंदोलनामुळे तो ठप्प होता. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास हा तिढा सुटू शकतो, असे वृत्त ‘लोकमत’ने ३१ आॅक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

Web Title: Uissarachi Kondi Shuttle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती