मोहोळजवळ कंथेवाडीचे तिघे ठार

By admin | Published: June 28, 2015 01:03 AM2015-06-28T01:03:02+5:302015-06-28T01:04:05+5:30

दहा जखमी : जीपला ट्रकची धडक; तुळजापूरला देवदर्शनासाठी जाताना दुर्घटना

Three of kantewadi kills three at Mohall | मोहोळजवळ कंथेवाडीचे तिघे ठार

मोहोळजवळ कंथेवाडीचे तिघे ठार

Next

मोहोळ : पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन तुळजापूरच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपला येथून दीड किलोमीटर अंतरावर समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने तीन भाविक ठार झाले, तर १० जण जखमी झाले.
हा अपघात शनिवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास तांबोळे फाट्याजवळ घडला़ जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे़ या अपघातातील मृत व जखमी भाविक हे कंथेवाडी (ता़ राधानगरी, जि़ कोल्हापूर) येथील आहेत़ सुनीता तानाजी डवर (वय ३५), छाया लहू पाटील (४०), लक्ष्मण सुरेश पाटील (२६) अशी मृतांची नावे आहेत.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंथेवाडी येथील डवर व पाटील परिवारातील १३ लोक देवदर्शनासाठी शुक्रवारी (दि. २६) पंढरपूर येथे आले होते़ पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास या भाविकांनी पंढरपूर सोडले़ अवघ्या ४५ मिनिटांत मोहोळ शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर आले असता, त्यांच्या जीपला (एम. एच. १४ पी ६४९१) मोहोळहून पंढरपूरकडे निघालेल्या ट्रकची (एम़ एच़ १३ आऱ ४५६६) समोरासमोर जोरदार धडक बसली़ या भीषण अपघातात सुनीता तानाजी डवर (वय ३५) या जागीच ठार झाल्या, तर सोलापूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना चालक लक्ष्मण सुरेश पाटील (२६) व छाया लहू पाटील (४०) या दोघांचा मृत्यू झाला़
या अपघातात बाबूराव कृष्णा पाटील (५५), स्नेहा लहू पाटील (२०), आदेश लहू पाटील ( १८), तानाजी ज्ञानदेव डवर (४२), संजय बाबूराव डवर (३३), मयुरी शिवाजी डवर (११), सुहास संजय डवर (३), शिल्पा संजय डवर (२७), श्वेता शिवाजी पाटील (१९), सुभाबाई बाबूराव पाटील (५०) हे गंभीर जखमी आहेत़ यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे़ जखमींवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
स्थानिक नागरिकांची मदत
ट्रकच्या धडकेने जीपचा चक्काचूर झाला आहे़ पहाटे ५़४५ वाजता अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरातील वस्तीवरील लोक जागे झाले़ या अपघातातील किरकोळ जखमी अवस्थेत असणारी स्नेहा पाटील यांनी जवळच असलेल्या गायकवाड वस्तीवर हा प्रकार सांगितला़ तेव्हा गायकवाड वस्तीवरील लोकांनी तातडीने जखमींना बाहेर काढले़ आणि पोलिसांना कळविले.
अपघातानंतर ट्रकचालक गाडी सोडून पळून गेला़ ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा़ पोलीस निरीक्षक काकासाहेब व्यवहारे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Three of kantewadi kills three at Mohall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.