कोल्हापूरच्या महापौरपदी स्वाती यवलुजे, उपमहापौरपदी सुनील पाटील, महापौर, उपमहापौरांना ४८ मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:50 AM2017-12-22T11:50:05+5:302017-12-22T11:56:27+5:30

संख्याबळाच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी स्वाती सागर यवलुजे यांची तर उपमहापौरपदी सुनील सावजी पाटील यांची बहुमताने निवड झाली. ही निवडणूक आज, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिवसेना नगरसेवकांचा पाठिंबा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच मिळाला.

Swati Yavaluje as mayor of Kolhapur, Sunil Patil as Deputy Mayor, 48 votes for mayor, deputy mayor | कोल्हापूरच्या महापौरपदी स्वाती यवलुजे, उपमहापौरपदी सुनील पाटील, महापौर, उपमहापौरांना ४८ मते

कोल्हापूरच्या महापौरपदी स्वाती यवलुजे, उपमहापौरपदी सुनील पाटील, महापौर, उपमहापौरांना ४८ मते

Next
ठळक मुद्दे शिवसेनेच्या चारही सदस्यांनी केले काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदानपन्हाळा दर्शन करुन सर्व नगरसेवक पोहोचले थेट सभागृहात

कोल्हापूर : संख्याबळाच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी स्वाती सागर यवलुजे यांची तर उपमहापौरपदी सुनील सावजी पाटील यांची बहुमताने निवड झाली. ही निवडणूक आज, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिवसेना नगरसेवकांचा पाठिंबा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच मिळाला.



या दोघांचीही बहुमताने निवड होणे ही केवळ औपचारिक बाब होती.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हात वर करून या निवडीवर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे शिवसेनेचे चारही सदस्यांनी सत्तारूढ गटाच्या बाजूने मतदान केले. महापौरपदासाठी काँग्रेसच्या स्वाती यवलुजे यांना सत्तारुढ गटाची ४४ आणि शिवसेनेची चार अशी ४८ अशी मते पडली, तर भाजपच्या मनिषा अविनाश कुंभार यांना अपेक्षेप्रमाणे ३३ मते पडली.उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील सावजी पाटील यांचीही निवड झाली. ताराराणी आघाडीचे कमलाकर यशवंत भोपळे त्यांच्या विरोधात होते.

 

अशी झाली निवडणूक

महापौर - स्वाती सागर यवलुजे (काँग्रेस) विरुद्ध मनिषा अविनाश कुंभार (भाजप)
उपमहापौर - सुनील सावजी पाटील (राष्ट्रवादी) विरुद्ध कमलाकर यशवंत भोपळे (ताराराणी आघाडी)

सभागृहात झालेले मतदान

- स्वाती यवलुजे व सुनील पाटील - ४४ + ४ = ४८
- मनिषा कुंभार व कमलाकर भोपळे - ३३


राष्ट्रवादीच्या हसिना फरास व काँग्रेसचे अर्जुन माने यांनी अनुक्रमे महापौर व उपमहापौरपदाचे राजीनामे गेल्या मंगळवारी सभागृहात सादर केले होते. सभागृहाने त्यांचे राजीनामे मंजूर केल्यानंतर नवीन पदाधिकारी निवडणुकीची प्रक्रिया नगरसचिव कार्यालयामार्फत राबविण्यात आली.

सहलीवरुन आलेले सर्व सदस्य थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोचले. तत्पूर्वी महापौरपदाच्या उमेदवार स्वाती यवलुजे आणि उपमहापौरपदाचे उमेदवार सुनील पाटील यांनी महानगरपालिकेतील गणपतीचे दर्शन घेतले. निवड निश्चित असल्यामुळे त्यांनी तिरंगी फेटे बांधूनच महानगरपालिकेच्या आवारात प्रवेश केला. सत्तारुढ गटाच्या सर्वच सदस्यांनी फेटे बांधले होते.



जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता महापौर निवडीची कार्यवाही सुरु करण्यात आली. खेमणार यांनी महापौर निवडीसंदर्भातील नियमावली वाचून दाखविली. त्यानंतर माघार घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला.

या कालावधीत कोणीही माघार घेतली नसल्याने प्रत्यक्ष मतदान घेण्यास प्रारंभ करण्यात आला. यादरम्यान सभागृहात स्थानापन्न झालेल्या मावळत्या महापौर हसीना फरास यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी त्यांची सभागृहातच तपासणी केली.

महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर अडीच वर्षांसाठी महापौरपद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने पहिली दोन वर्षे अनुक्रमे अश्विनी रामाणे व हसिना फरास यांना संधी मिळाली. आता उर्वरित पाच महिन्यांच्या कालावधीसाठी ही निवड होणार आहे, तरीही प्रतिष्ठेच्या पदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच झाली.

नामनिर्देशनपत्र भरण्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत ही रस्सीखेच झाली. अखेर स्वाती सागर यवलुजे यांनी बाजी मारली. उमा बनछोडे व दीपा मगदूम यांची नावे मागे पडली. बनछोडे यांना आपले नाव जाहीर होईल, असा ठाम विश्वास होता, परंतु शेवटच्या क्षणी त्यांचे नाव मागे पडल्याने त्यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या कारभारी नगरसेवकांना चांगलेच सुनावले होते. बनछोडे यांची नाराजी अखेर दोन दिवसांनी दूर झाली; पण त्या सहलीवर मात्र गेल्या नाहीत.

सभागृहातील आपले निर्विवाद बहुमत राखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेच्या चार नगरसेवकांचेही सहकार्य मिळविले आहे. गेल्यावर्षीपासून शिवसेनेला परिवहन सभापतिपद देण्यात आले असून त्याचे पहिले लाभार्थी नियाज खान ठरले. खान यांची मुदत फेब्रुवारीत संपणार असून त्यांच्यानंतरही हे पद शिवसेनेच्या राहुल चव्हाण देण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेची चार मते यावेळी देखील कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली.

पन्हाळा दर्शन करुन सर्व नगरसेवक पोहोचले थेट सभागृहात

भाजप-ताराराणी आघाडीचे नेते उगाच काही भानगडी करायला नकोत यासाठी खबरदारी म्हणून कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना चार दिवस गोव्याची सहल घडवून आणली. या सहलीत उमा बनछोडे यांच्यासह सात-आठ नगरसेवक सहभागी झाले नव्हते. दीपा मगदूम याही प्रकृतीच्या कारणास्तव गोव्याला गेल्या नसल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी रात्री हे सर्व नगरसेवक गोव्याहून पन्हाळ्यावर पोहोचले. आज, शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सर्व नगरसेवक ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयावर पोहोचले आणि तेथून थेट महानगरपालिका सभागृहात आले. शिवसेना नगरसेवकांचा पाठिंबा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच मिळाला.

 

Web Title: Swati Yavaluje as mayor of Kolhapur, Sunil Patil as Deputy Mayor, 48 votes for mayor, deputy mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.