ताराराणी आघाडीचे रत्नश शिरोळकर २०० मताने विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 10:40 AM2017-10-12T10:40:50+5:302017-10-12T10:44:50+5:30

कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क मतदार संघात झालेल्या पोट निवडणुकीत ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मतांनी विजयी झाले.

Ratnash Shirole of Tararani Aghadi won by 200 votes | ताराराणी आघाडीचे रत्नश शिरोळकर २०० मताने विजयी

ताराराणी आघाडीचे रत्नश शिरोळकर २०० मताने विजयी

Next
ठळक मुद्दे शिरोळकर यांना १३९९, तर राजेश लाटकर यांना ११९९ मते आघाडीची आकडेवारी जाहीर होताच गुलाल उधळून जल्लोष

कोल्हापूर, १२ : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क मतदार संघात झालेल्या पोट निवडणुकीत ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रसचे शहर अध्यक्ष राजेश लाटकर यांचा पराभव केला. शिरोळकर यांना १३९९ तर लाटकर यांना ११९९ मते पडली. शिवसेना उमेदवार राज जाधव यांना अवघी ८० मते पडली. गुरुवारी सकाळी निकाल जाहीर झाला.

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह तीन आमदार, महापौर, उपमहापौरांसह सर्व नगरसेवकांचा सहभाग असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथील पोटनिवडणुकीसाठी बुधवारी केवळ ५८ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत एकमेकांना राजकीय शह देण्याच्या हेतूने नेत्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला खरा, परंतु मतदारांनी मात्र मतदान प्रक्रियेत निरूत्साह दाखविल्याने मतदानानंतर विजयी कोण होणार याबाबत कमालीची उत्कंठा लागून राहिली होती.

माजी नगरसेवक नीलेश देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथे पोटनिवडणूक झाली. राज बाबूभाई जाधव (शिवसेना), रत्नेश जिन्नाप्पा शिरोळकर (ताराराणी आघाडी), पवन पांडुरंग माळी व राजेश भरत लाटकर (दोघेही अपक्ष) यांनी ही निवडणूक लढविली. या निवडणुकीत राजेश लाटकर हे राष्टÑवादीचे कार्यकर्ते तसेच शहर अध्यक्ष असूनही त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविली.

निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन प्रभागात २० हून अधिक बैठका घेऊन प्रचार केला होता. त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ व काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही प्रत्यक्ष प्रचारात घेऊन निवडणुकीची यंत्रणा गतिमान केली. बुधवारीही सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळाने हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी दिवसभरातील बराच वेळ मतदान केंद्राबाहेर थांबून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले तसेच मतदारांना विनंती केली.

ताराबाई पार्कमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय (बैलगोठा) तसेच सासने विद्यालय येथे प्रत्येक दोन-दोन मतदान केंद्रांवर राजेश लाटकर यांच्यासाठी आ. मुश्रीफ, आ. पाटील यांच्यास महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, सभागृह नेते प्रवीण केसरकर, गटनेता शारंगधर देशमुख, प्रा.जयंत पाटील यांच्यासह कॉँग्रेस राष्टÑवादीचे सर्व नगरसेवक तर ताराराणी आघाडीच्या रत्नेश शिरोळकर यांच्यासाठी आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महानगर अध्यक्ष संदीप देसाई, गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेता किरण शिराळे,नगरसेवक सुनील कदम यांच्यासह ताराराणी व भाजपचे सर्व नगरसेवक मतदान केंद्रांवर उपस्थित होते.


बुधवारी मतदान संपताना ४८९८ पैकी २८२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. व्यावसायिक, नोकरदार, उच्चशिक्षित मतदार असलेल्या या मतदारसंघातील सुमारे ४७० मतदार स्थलांतर झाले असून मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

बैलगोठा मतदान केंद्रावर वादावादी

दिवसभर चुरशीने पण शांततेत मतदान सुरू होते; परंतु बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (बैलगोठा) मतदान केंद्रावर झालेल्या किरकोळ वादामुळे काहीसे गालबोट लागले. या मतदान केंद्रावर नगरसेवक सत्यजित कदम यांच्या उपस्थितीला आमदार सतेज पाटील यांनी हरकत घेतली तसेच त्यांना १०० मीटर अंतराबाहेर काढा, असा आग्रह पोलीस अधिकारी देशमुख यांच्याकडे धरला. त्यावेळी कदम यांनी त्यांच्याकडील मतदान प्रतिनिधीचे ओळखपत्र पोलिसांना दाखविले. त्यानंतर कदम यांनी सतेज पाटील यांना बाहेर घालवा, असा आग्रह पोलिसांकडे धरला; पण पोलीस काहीच करत नाहीत म्हटल्यावर कदम यांनी त्यांच्या आघाडीच्या सर्व नगरसेवकांना केंद्राच्या आत बोलाविले. त्यानंतर पोलिसांनी आमदार पाटील यांच्यासह सर्वांनाच बाहेर जाण्यास सांगितले.

झालेले मतदान -
- पुरुष - १५१३
- महिला- १३११
- एकूण - २८२४
- टक्केवारी - ५७.६६

केंद्रनिहाय मतदान
क्रमांक पुरुष महिला एकूण
११/१ ४४२ ३२८ ७७०
११/२ ३२६ २८९ ६१५
११/३ ३८२ ३५४ ७३६
११/४ ३६३ ३४० ७०३

Web Title: Ratnash Shirole of Tararani Aghadi won by 200 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.