टोल आंदोलनाप्रमाणे लढा उभारूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:48 AM2017-12-30T00:48:01+5:302017-12-30T00:48:09+5:30

Raise fight like toll agitation | टोल आंदोलनाप्रमाणे लढा उभारूया

टोल आंदोलनाप्रमाणे लढा उभारूया

googlenewsNext


कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले. कोल्हापुरातील टोल आंदोलनाप्रमाणे आंदोलन उभे करून या निर्णयाला विरोध करूया, असा सूर शुक्रवारी शिक्षक व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींकडून उमटला. या निर्र्णयाविरोधात आज, शनिवारी दुपारी ४ वाजता शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्याचे ठरले.
मंगळवार पेठेतील हिंदू एकता आंदोलनच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत शिक्षण वाचवा नागरी कृती समितीची स्थापना केली. या समितीचे समन्वयक म्हणून गिरीष फोंडे व रमेश मोरे यांची नियुक्ती केली.
यावेळी फोंडे म्हणाले, शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात कोल्हापूरमधून व्यापक आंदोलन उभारणे आवश्यक आहे. शिक्षक नेते प्रभाकर आरडे म्हणाले, हा प्रश्न सुटण्यासाठी न्यायालयात जाऊन चालणार नाही तर जनआंदोलन पेटविले पाहिजे. तसेच एखादी परिषद घेऊन सरकारला इशारा देऊया. प्रा. सुभाष जाधव म्हणाले, या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभारण्याची गरज असून यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभागी होण्याची गरज आहे.
संभाजी जगदाळे म्हणाले, या विरोधातील आंदोलनात सर्वसामान्य माणूस उतरल्याशिवाय ते यशस्वी होणार नाही. यावेळी चंद्रकांत यादव, शिक्षक नेते दादा लाड, राजेश वरक, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, गणी आजरेकर, राजाराम वरुटे, आदींनी सूचना मांडल्या. यावेळी अतुल दिघे, किशोर घाटगे, प्रसाद जाधव, चंद्रकांत बराले, बाळासाहेब विभूते, दिलीप माने, आदी उपस्थित होते.
आंदोलनाची जबाबदारी घ्यावी
नुसते टोलसारखे आंदोलन करू, असे म्हणून चालणार नाही तर त्यासाठी लावलेल्या यंत्रणेप्रमाणेच यंत्रणा उभी करावी लागणार आहे. आंदोलनाची जबाबदारी कुणीतरी घेऊन रोज सामान्य माणसांपर्यंत पोहोचले पाहिजे, तरच त्याला यश येईल, असे रमेश मोरे यांनी सांगितले.
३४ शाळा बंदच्या निर्णयाचा निषेध
जिल्ह्यातील ३४ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारच्या निषेधाचा ठराव फोंडे यांनी मांडला. त्याला सर्वांनुमते मान्यता दिली.
जागा धनदांडग्यांना मिळणार
या कायद्यानुसार सरकारला सार्वजनिक जागांचे खासगीकरण करून घ्यायचे आहे. यामुळे या जागा धनदांडग्यांच्या घशात जाणार आहेत, असा आरोप आरडे यांनी केला.

Web Title: Raise fight like toll agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.