संगीत नाटकात कोल्हापूरची पिछाडी , राज्य संगीत नाट्य स्पर्धा : प्रवेशिका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:16 AM2018-02-08T01:16:05+5:302018-02-08T01:16:41+5:30

कोल्हापूर : एकेकाळी ‘संगीत रंगभूमीची पंढरी’ असलेले कोल्हापूर आता या कलेत पुरते पिछाडीवर आले आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्वांपासूनची संगीत नाटकांची परंपरा गेल्या काही वर्षांत खंडित झाली

 In the play of music, the backwardness of Kolhapur, state music drama competition: no entry | संगीत नाटकात कोल्हापूरची पिछाडी , राज्य संगीत नाट्य स्पर्धा : प्रवेशिका नाही

संगीत नाटकात कोल्हापूरची पिछाडी , राज्य संगीत नाट्य स्पर्धा : प्रवेशिका नाही

Next

इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : एकेकाळी ‘संगीत रंगभूमीची पंढरी’ असलेले कोल्हापूर आता या कलेत पुरते पिछाडीवर आले आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्वांपासूनची संगीत नाटकांची परंपरा गेल्या काही वर्षांत खंडित झाली असून, कोल्हापूर केंद्रावरील केशवराव भोसले नाट्यगृहात प्रथमच सुरू असलेल्या राज्य संगीत नाट्यस्पर्धेत कोल्हापुरातील एकाही संघाने सहभाग घेतलेला नाही.

‘सांगलीला नाट्यपंढरी’ म्हटले जात असले तरी त्याची बीजे कोल्हापुरात रूजली. दीडशे वर्षांपूर्वी या कलेला राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय दिला. बालगंधर्व ही शाहू महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली देणगी. संगीत नाटकांसाठी त्यांनी आताच्या केशवराव भोसले नाट्यगृहाची निर्मिती केली. गायन समाज देवल क्लबसारखी संस्था त्या काळी बहरात होती. संगीत नाटके विशेषत: रात्री सुरू व्हायची व पहाटेपर्यंत चालायची. चार ते पाच तास नाटकांचे प्रयोग व्हायचे. काळानुरूप नाटकांमध्येही बदल होत गेले आणि पद्य नाटकांची जागा गद्य नाटकांनी घेतली. कोल्हापुरात प्रायोगिक रंगभूमीवर अनेक नवनवीन प्रयोग होत आहेत. (पान ३ वर)

भरघोस रकमेची बक्षिसे
संगीत नाटकांच्या बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. एकूण संघातून प्रथम तीन क्रमांक निवडले जातात. त्यांना अनुक्रमे दीड लाख, एक लाख आणि ५० हजार रुपयांचे पारितोषिक आहे. दिग्दर्शनासाठी (अनुक्रमे प्रथम व द्वितीय) ५० व ४० हजार, लेखनासाठी ४० व ३० हजार, संगीत दिग्दर्शन, तसेच नेपथ्यासाठी ३० व २० हजार, साथसंगतसाठी २० व १० हजार रुपयांचे बक्षीस आहे. अभिनयासाठीही दोन महिला व दोन पुरुषांना रौप्यपदक व १० हजार रुपये दिले जातात. निर्मितीखर्च १० हजार दिला जातो.


काळानुरूप बदलांची गरज
पौराणिक कथा, राजमहाल, अरण्य या लेखकांच्या गाजलेल्या कलाकृतींपलीकडे ही नाटके गेली नाहीत. गायन येणारे कलाकार, शास्त्रीय संगीताची बैठक, अभिनय आणि लाईव्ह संगीत, असे या स्पर्धेचे निकष असल्याने त्या कसोटीवर उतरणेच संघांना अशक्य वाटते. आजच्या संदर्भाने आधुनिक बदलांसह त्यांत नवीन प्रयोग होणे अपेक्षित आहे.


कोकण, गोव्याची आघाडी
कोकणने मात्र संगीत नाटकांची परंपरा अजूनही जपली आहे. आजही तेथे मोठ्या प्रमाणात संगीत नाटकांचे प्रयोग होतात. गोवा कलाअकादमीने संगीत नाटकांना प्रोत्साहन दिले. तेथील शासनही याकडे संवेदनशीलतेने पाहते. परिणामी, यंदाच्या स्पर्धेतही गोव्यातील सर्वाधिक १२ संघांनी सहभाग घेतला आहे. त्यानंतर रत्नागिरी, मुंबई, पुण्याचा नंबर लागतो.

 

आम्ही नाट्य परिषदेतर्फे वर्षातून दोनदा संगीत नाटके दाखवितो. आता कलाकारांना चित्रपट, मालिकांची दारे खुली असल्याने ते संगीत नाटकांकडे वळत नाहीत. त्यांना या नाटकांविषयी आवड निर्माण होईल, अशी चळवळ राबविली पाहिजे.
- प्रफुल्ल महाजन (संचालक, अ. भा. मराठी नाट्यपरिषद)


संगीत नाटके म्हणजे जुन्या पिढीतील कलाकार आणि प्रेक्षक असेच एक चित्र आहे. संगीत रंगभूमीचा केवळ इतिहास सांगण्याने काहीच होणार नाही. आजचे चित्र बदलण्यासाठी संगीत नाटकांत नवे प्रयोग झाले पाहिजेत.
- श्रीकांत डिग्रजकर, गायन समाज देवल क्लब

Web Title:  In the play of music, the backwardness of Kolhapur, state music drama competition: no entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.