कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी शोधण्यास तपास यंत्रणांना अद्याप यश आलेले नसतानाच सनातन संस्थेने ही हत्या पैशाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त करुन तपासाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
पानसरे यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक नागरी पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे ४५ लाख ५१ हजार रुपयांची बेहिशेबी ठेवी आहेत. भाकपने या लाखो रुपयांचा तपशील निवडणूक आयोगालाही दिलेला नाही. त्यामुळे या पैशांतूनच पानसरे यांची हत्या झाल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्टÑचे समन्वयक मनोज खाड्ये, हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
अ‍ॅड. इचलकरंजीकर म्हणाले, पानसरे यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे ४५ लाख ५१ हजार ३५२ रुपयांची बेहिशेबी रक्कम ठेवली आहे. भाकपने या रकमेबाबत कोणताही तपशील निवडणूक आयोगाला दिलेला नाही. त्यामुळे या पैशांची सखोल चौकशी शासनाने अंमलबजावणी संचालनालय व सीबीआय यांच्याद्वारे करावी.
हे सर्व आरोप फेटाळून लावत हत्येच्या तपासाची दिशा बदलण्यासाठी ‘सनातन’वाद्यांचा खटाटोप सुरू आहे, असे मेधा पानसरे यांनी पत्रकारांना सांगितले. कामगार संघटनेतून जमा झालेला निधी व विमानतळ परिसरातील पक्षाची विकलेली जागा यातून आलेला निधी हा श्रमिक पतसंस्थेत ठेव रूपाने ठेवल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
पानसरे हे कामगार संघटनेचे काम पाहत होते, अनेक कामगार संघटनांचा निधी हा पक्षाच्या नावावर आलेला श्रमिक पतसंस्थेत ठेवरूपाने जमा केलेला आहे. सनातन व हिंदू जनजागृती संस्थेच्या नेत्यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे निराधार व खोटे आहेत असेही त्या म्हणाल्या.