नृसिंहवाडीत दत्त जयंती सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:47 AM2017-12-04T00:47:06+5:302017-12-04T00:48:45+5:30

In the Nrityhwadi Dutt jubilee celebrations enthusiasm | नृसिंहवाडीत दत्त जयंती सोहळा उत्साहात

नृसिंहवाडीत दत्त जयंती सोहळा उत्साहात

Next


नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे रविवारी दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडी व परिसर अखंड दत्त नामाने दुमदुमून गेला व ‘दिगंबरा दिगंबरा...’च्या अखंड भजनात व ‘श्री गुरुदेव दत्त...’च्या गजरात कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तिमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त मंदिरात रविवारी अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटे साडेतीन वाजता काकड आरती व षोड्शोपचार पूजा, सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा केली. दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा करण्यात आली. दुपारी तीन वाजता येथील ब्रह्मवृंदामार्फत पवमान पंचसुक्त पठण करण्यात आले. साडेचार वाजता श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायणस्वामी महाराज यांच्या मंदिरातून वाजत-गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली. हरिभक्त पारायण संदीपबुवा मांडके (रा. पुणे) यांच्या कीर्तनानंतर ठीक पाच वाजता धार्मिक वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत विधीवत श्री दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न झाला.
मंदिर परिसरात ठिकठिकाणी क्लोज सर्किट टीव्हीची व्यवस्था, दर्शनरांगेची उत्तम व्यवस्था, मुखदर्शन, तसेच सकाळी दहा ते रात्रीपर्यंत मोफत महाप्रसाद वाटप, जन्मकाळानंतर सुंठवडा प्रसाद वाटप, सूचना फलक, ध्वनिक्षेपक यंत्रणा तसेच नदीचा काठ असल्याने तीरावर नौका, पट्टीचे पोहणारे युवक, तसेच पाण्यातील इनरट्युबची व्यवस्था करण्यात आली होती. दत्त देव संस्थानचे विश्वस्त, ग्रामपंचायतचे सदस्य, शासकीय अधिकारी, जीवनमुक्ती संघटना कोल्हापूर, एस. के. पाटील व दत्त महाविद्यालय कुरुंदवाड व श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी, स्वयंसेवकांनी तसेच दत्त देव संस्थान व ग्रामपंचायतीचे कर्मचारी व स्वयंसेवकांनी अधिक परिश्रम घेऊन यात्रेचे नेटके नियोजन केले. गुरुदत्त शुगरचे माधवराव घाटगे यांनी श्री दत्त देव संस्थानला महाप्रसादासाठी दोन लाखांची देणगी दिली. दरम्यान, करवीर पीठाचे जगद्गुरू विद्यानृसिंहभारती यांनी दत्त जयंतीनिमित्त दत्त दर्शनासाठी हजेरी लावली.
श्री दत्त जन्मकाळ सोहळा उत्तमरीत्या पार पडल्याचा विश्वास दत्त देव संस्थानचे अध्यक्ष राजेश बाळकृष्ण खोंबारे व सचिव दामोदर गोपाळ संतपुजारी, सरपंच अरुंधती जगदाळे, उपसरपंच अशोक जनार्दन पुजारी यांनी व्यक्त केला.

Web Title: In the Nrityhwadi Dutt jubilee celebrations enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.