Maratha Kranti Morcha कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत बंद, रॅली, रस्तारोको, निषेध सभा, निदर्शनांचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:57 PM2018-07-24T15:57:36+5:302018-07-24T16:07:38+5:30

औरंगाबाद येथे मराठा समाजातील कार्यकर्त्याने घेतलेल्या जलसमाधीनंतर राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही उमटले.

Maratha Kranti Morcha shutdown in Kalkadit, rally, road block, protest rally, demonstrations in Kolhapur district | Maratha Kranti Morcha कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत बंद, रॅली, रस्तारोको, निषेध सभा, निदर्शनांचा धडाका

Maratha Kranti Morcha कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत बंद, रॅली, रस्तारोको, निषेध सभा, निदर्शनांचा धडाका

Next
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत बंद, रॅली, रस्तारोको, निषेध सभा, निदर्शनांचा धडाकाकुरुंदवाडमध्ये एसटीवर दगडफेक, कोल्हापुरात ठिय्या सुरु

कोल्हापूर : औरंगाबाद येथे मराठा समाजातील कार्यकर्त्याने घेतलेल्या जलसमाधीनंतर राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही उमटले.

सर्वत्र मोटारसायकल रॅली, रस्तारोको, निषेध सभा, निदर्शने यामुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला. नागरीकांनी दैनंदिन सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेऊन काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहिली आणि सरकार विरुध्दचा आपला रोष देखिल व्यक्त केला. जयसिंगपूरजवळ एका एस.टी.बसवर झालेली दगडफेक आणि कुरुंदवाड शहरात टायर्स पेटविण्याचा प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला.


नागरीकांनी दैनंदिन सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेऊन काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहिली

सोमवारी औरंगाबाद येथे घडलेली घटना आणि पाठोपाठ राज्यातून उमटत असलेल्या प्रतिक्रियांचे लोण कोल्हापुरातही उमटणार याची जाणीव पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर सर्वत्र कडेकोट बंदोबस्त वाढविण्यात आला, तसेच रातोरात मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना नोटीसाही बजावल्या गेल्या. परंतु त्याची दखल न घेता कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून बंदला उत्स्फुर्तपणे सुरुवात झाली.

कुरुंदवाडमध्ये सकाळी रस्त्यांवर टायर्स पेटवून, रस्तारोको करुन मराठा आंदोलकांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला.

शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा, प्रमुख रस्त्यावरील दुकानदार, व्यावसायिक आपल्या दारात थांबून होते, परंतु त्यांचे दुकाने उघडण्याचे धाडस झाले नाही. काही ठिकाणी अर्धवट शटर्स उघडे ठेऊन व्यवहार सुरु ठेवले खरे पण नंतर मोटरसायकल रॅली निघाली तसे कडकडीट बंद पाळावा लागला. रिक्षा वाहतुक पूर्णपणे बंद झाली. मात्र एसटी, केएमटी बससेवा सुरळीत सुरु होती. पण प्रवासी नसल्याने दुपारनंतर बस फेऱ्या आपोआपच कमी झाल्या.


कुरुंदवाडमध्ये मराठा आंदोलकांनी रस्तारोको करुन  संताप व्यक्त केला.

सकल मराठा समाजाच्या सुमारे तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरात मोटरसायकल रॅली काढली. जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देऊन शहर दणाणून गेले. प्रमुख मार्गावरुन फिरुन ही रॅली ऐतिहासिक दसरा चौकात समाप्त झाली. तोपर्यंत तेथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनातही हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, महाविद्यालयीन तरुण जमा झाले होते.

मुरगुड परिसरात एस.टी. वाहतुक बंद ठेवण्यात आली.

श्रीमंत शाहू महाराज, महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, संजय मंडलिक, बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस यांच्यासह अनेक नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. दिवसभर हे ठिय्या आंदोलन सुरु होते.


नवे पारगांव येथे सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले.

जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यात सकाळी संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. कुरुंदवाडमध्ये सकाळी एका एस. टी. बस वर दगडफेक झाली, तर गावातील रस्त्यांवर टायर्स पेटवून, रस्तारोको करुन मराठा आंदोलकांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला.

शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

दगडफेक झाल्याने सांगलीहून कोल्हापूरला जाणाऱ्या अनेक बसेस जयसिंगपूर स्थानकात थांबविण्यात आल्या. उदगांव, जयसिंगपूर येथे रॅली काढण्यात आली.गडहिंग्लज येथे निदर्शने झाली, नूलमध्ये निषेध सभा झाली. कोल्हापूर - गारगोटी रस्त्यावर बिद्री येथे रस्तारोको झाल्याने मार्गावरील वाहतुक बंद झाली.

इचलकरंजी शहरात कार्यकर्त्यांनी निषेध रॅली काढली, त्यानंतर संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पेठवडगांव येथे निषेध सभा झाली. नवे पारगांव येथे सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले. मुरगुड परिसरात एस.टी. वाहतुक बंद ठेवण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात बंद शांततेत पार पडला.

बेमुदत ठिय्या आंदोलन

ऐतिहासिक दसरा चौक येथे मंगळवारपासून सुरु झालेले ठिय्या आंदोलन बेमुदत सुरु ठेवण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घ्यायची नाही, असा ठाम निर्धारही करण्यात आला. आतापर्यंत मुक आंदोलने केली, सरकारला जाग आली नाही, यापुढे ‘ठोक’ आंदोलन केले जाईल. तरीही दखल घेतली नाही तर मात्र एक दिवस मराठा तरुण हातात तलवारी देखिल घेऊ न रस्त्यावर उतरेल, असा सज्जड दमही यावेळी देण्यात आला.

 

Web Title: Maratha Kranti Morcha shutdown in Kalkadit, rally, road block, protest rally, demonstrations in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.