‘मँचेस्टर’, कारंडे गटाचा सावध पवित्रा

By admin | Published: October 20, 2016 01:23 AM2016-10-20T01:23:02+5:302016-10-20T01:23:02+5:30

इचलकरंजी नगरपालिका : भाजपप्रणीत शहर विकास आघाडी, कॉँग्रेस पर्याय; प्रभागनिहाय चाचपणीनंतर भूमिकेचा निर्णय

'Manchester', Cautious posture of the Karande group | ‘मँचेस्टर’, कारंडे गटाचा सावध पवित्रा

‘मँचेस्टर’, कारंडे गटाचा सावध पवित्रा

Next

इचलकरंजी : येथील नगरपालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस किंवा शहर विकास आघाडीबरोबर समझोता करण्यासाठी मॅँचेस्टर आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गट यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. भाजपप्रणीत शहर विकास आघाडी व कॉँग्रेस असे दोन पर्याय असले तरी प्रभागनिहाय परिस्थितीची चाचपणी करून निर्णय घेण्याची भूमिका दोघांचीही आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व प्रभागांत उमेदवार उभे करण्याची तयारी भाजप व शहर विकास आघाडीची आहे. कोल्हापूरप्रमाणे पॅटर्न राबविण्याची घोषणा आमदार सुरेश हाळवणकर यांनी तीन दिवसांपूर्वी जाहीर केली आहे, तर राष्ट्रवादीतील जांभळे गटाने कॉँग्रेसकडे प्रभाग क्रमांक १, ४, ५, ६ व ८ या ठिकाणी जागा लढविण्यासाठी केलेल्या मागणीवर कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अद्याप निर्णय देण्यात आलेला नाही. पक्षश्रेष्ठींबरोबर विचारविनिमय करून हा विषय निर्गत होईल, असे कॉँग्रेसकडून सांगण्यात आले.
मॅँचेस्टर आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी दोन तास बैठक झाली. बैठकीमध्ये आघाडीकडून लढविण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या प्रभागनिहाय स्थितीचा विचार करण्यात आला. मॅँचेस्टर आघाडीचे उमेदवार ज्या प्रभागात उभे राहणार आहेत, तेथे काही ठिकाणी शहर विकास आघाडी, तर काही ठिकाणी कॉँग्रेसचे उमेदवार अनुकूल आहेत. त्यामुळे मॅँचेस्टर आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर नवीनच पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे बुधवारच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. तरीसुद्धा आज, गुरुवारचा दिवस थांबून उद्या, शुक्रवारी पुन्हा व्यापक बैठक घेण्यात येईल आणि अंतिम निर्णय देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती आघाडीचे अध्यक्ष सागर चाळके यांनी दिली.
राष्ट्रवादीतील कारंडे गटाची बैठक बुधवारी सायंकाळी विक्रमनगर येथे झाली. बैठकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, नगरसेवक विठ्ठल चोपडे व माजी नगरसेवक उदयसिंह पाटील उपस्थित होते. या गटाच्या बैठकीतसुद्धा प्रभागनिहाय उमेदवार उभे करण्याकरिता असणाऱ्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. कॉँग्रेसबरोबर करावयाची आघाडी नैसर्गिक असली तरी निवडणुकीनंतर जांभळे गटाबरोबर पुन्हा संघर्ष करावा लागेल, तर शहर विकास आघाडीबरोबर युती करताना त्यांच्या नगराध्यक्षपदासाठी असलेल्या उमेदवाराच्या कमळ चिन्हाचा प्रचार करावा लागेल, अशी अडचण निर्माण झाली आहे.
त्यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीची राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याबरोबर आज चर्चा करावी आणि उद्या, शुक्रवारी व्यापक बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा, असे निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)


कॉँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदावरून संघर्ष?
नगरपालिका निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचा उमेदवार शहर कॉँग्रेस समितीकडून ठरविला जावा, अशी भूमिका माजी मंत्री आवाडे यांच्या गटाची आहे, तर माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्याकडून त्यांचे पुत्र संजय आवळे यांची उमेदवारी प्रदेश कॉँग्रेसकडून लादली जाईल. मात्र, कॉँग्रेस अंतर्गत असलेल्या या दोन गटांत विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत असल्यामुळे पुन्हा आवाडे व आवळे या दोन गटांत संघर्ष होण्याची चिन्हे असल्याची येथील राजकीय क्षेत्रात चर्चा आहे.

Web Title: 'Manchester', Cautious posture of the Karande group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.