महाडिकांना एक मतही कमी पडू देणार नाही: हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:43 AM2019-04-12T00:43:05+5:302019-04-12T00:43:21+5:30

कागल : कागल तालुक्यातून धनंजय महाडिक यांना विरोधी उमेदवारापेक्षा एक मतही कमी पडू देणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही आमदार ...

Mahadik will not allow a single vote to fall: Hasan Mushrif | महाडिकांना एक मतही कमी पडू देणार नाही: हसन मुश्रीफ

महाडिकांना एक मतही कमी पडू देणार नाही: हसन मुश्रीफ

googlenewsNext

कागल : कागल तालुक्यातून धनंजय महाडिक यांना विरोधी उमेदवारापेक्षा एक मतही कमी पडू देणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली. पवार यांच्यामुळेच मी राजकारणात उभा आहे, या वयातही तुम्ही प्रचंड कष्ट घेत आहात, घाम गाळत आहात, तुमचे कष्ट आणि घाम वाया जाऊ देणार नाही, असे सांगताना मुश्रीफ भावुक झाले.
कागलच्या गहिनीनाथ गैबी चौकात धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, कागलची काळजी पवारसाहेबांना नेहमीच असते; पण साहेब, काळजी करू नका. मी गाव टू गाव दौरा केला आहे. गेल्या लोकसभेला महाडिक यांना मताधिक्य देऊ शकलो नसलो तरी मतदारसंघात कार्यकर्त्यांनी मोठे
काम केले. आता कोणत्याही परिस्थितीत कागलमधून धनंजय महाडिक यांना एक मतही कमी पडणार नाही. त्यासाठी कार्यकर्ते हाडाची काडे व रक्ताचे पाणी करतील, असा मी शब्द देतो, तुम्ही निश्चिंत राहा.
खासदार महाडिक म्हणाले, पाच वर्षांत मतदारसंघात आठ हजार कोटींची विकासकामे आणली आणि मग तुमच्यासमोर आलो. माझ्यावर टीका करणाऱ्यांचे कर्तृत्व काय आहे? स्व. सदाशिवराव मंडलिक हे माझ्याशी अनेक वेळा चर्चा करायचे. आपले वारसदार म्हणून माझ्याकडे ते पाहात होते. आपले गुणी बाळ किती कर्तृत्ववान आहे, हे माहीत असल्यानेच त्यांनी हसन मुश्रीफ यांना वारसदार म्हणून पुढे आणले. कागलमधील तीन गट एकत्र आले आहेत. आमचा उमेदवार कसाही असू दे; तो निवडून देणारच अशी चर्चा आहे; पण मित्रांनो, ही निवडणूक ग्रामपंचायत, सोसायटीची नाही. देश कोणाच्या हातात सोपवायचा याबाबतची लढाई आहे. विरोधी उमेदवार भेटतील का? तुमच्या समस्या जाणून घेतील का? याचा विचार करा. ते प्राध्यापक आहेत, त्यांनी माझ्यासोबत गांधी मैदानात येऊन अर्धा तास इंग्रजी व हिंदीत भाषण करावे, मग जनता ठरवू दे कोणाला संसदेत पाठवायचे. केवळ अपप्रचार करून दुसºयाच्या बदनामीचा उद्योग चालू आहे. कोणाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा आपला स्वभाव नाही; तरीही कोणाची मने दुखावली असतील तर पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. हसन मुश्रीफ यांचे हात बळकट करण्यासाठी मला साथ द्या. उद्याच्या विधानसभेला याच चौकात मुश्रीफ यांच्या विजयासाठी सभा घेतो. हिंमत असेल तर संजय मंडलिक यांनी विधानसभेला कोणाच्या पाठीशी राहणार, हे जाहीर करावे.
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, प्रा. जालंदर पाटील, प्रा. मच्छिंद्र सकटे, ए. वाय. पाटील, डी. जी. भास्कर, विश्वासराव देशमुख, वसंतराव चव्हाण, विजय सातवेकर, देवानंद पाटील, बळवंत माने, विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
शरद पवार यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गहिनीनाथ गैबीचे दर्शनही त्यांनी घेतले. महापौर सरिता मोरे, आमदार संध्यादेवी कुपेकर, पी. एन. पाटील, के. पी. पाटील, कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, सभापती राजश्री माने, भैया माने, युवराज पाटील, नविद मुश्रीफ, आदी उपस्थित होते.

राजू शेट्टी हे आमचे विराट कोहली
खासदार राजू शेट्टी यांच्याशी आजही मतभेद आहेत आणि राहतील. आमच्या छाताडावर बसून त्यांनी एफआरपी घेतली. उद्याही ते आमच्या छाताडावर बसणार असले, तरी शेतकऱ्यांसाठी झटणारे नेतृत्व असल्याने आम्ही त्यांच्या मागे ठामपणे राहणार आहोत. ते आमचे विराट कोहली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
घोषणांनी परिसर दणाणला
मुश्रीफ यांचे नाव घेतल्यानंतर कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत होते. शरद पवार हे मुश्रीफ यांचे कौतुक करीत असताना तर कार्यकर्त्यांनी गैबी चौक डोक्यावर घेतला. भगवे फेटे हवेत उडवीत त्यांनी दाद दिली.
सकटेंच्या कवितांना आठवलेंची आठवण
प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कवितेने केली. ‘पुरोगामी महाराष्ट्रात एकच आहे तलवार, त्या तलवारीचे नाव शरद पवार. शरद पवार नावाची आज आहे धार, याच ताकदीवर विरोधकांना करायचे गप्पगार!’ त्यांच्या या कवितेच्या ओळींनी उपस्थितांना रामदास आठवलेंची आठवण झाली.

Web Title: Mahadik will not allow a single vote to fall: Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.