कोल्हापुरात महाडिक-सतेज पाटील वाद उफाळला; राजाराम कारखान्याच्या एमडींना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 11:43 AM2024-01-03T11:43:01+5:302024-01-03T11:43:55+5:30

महाराष्ट्रातील पहिलीच घटना

Mahadik-Satej Patil dispute in Kolhapur; MD of Rajaram factory beaten | कोल्हापुरात महाडिक-सतेज पाटील वाद उफाळला; राजाराम कारखान्याच्या एमडींना बेदम मारहाण

कोल्हापुरात महाडिक-सतेज पाटील वाद उफाळला; राजाराम कारखान्याच्या एमडींना बेदम मारहाण

कोल्हापूर : केवळ विरोधी गटाच्या ऊस उत्पादक सभासदांचा ऊस गळितासाठी जाणूनबुजून नेला जात नाही. नवीन ऊस नोंदी करत नाहीत, या कारणास्तव मंगळवारी (दि. २) सायंकाळी राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश जयसिंग चिटणीस (रा. हुपरी) यांना संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावरील पाटील गल्ली कॉर्नरला गाडीतून खाली ओढून अंगावरील कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रात्री खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उजव्या हातासह मानेलाही दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.

या प्रकाराने सायंकाळनंतर बावड्यात तणाव निर्माण झाला. कारखान्याच्या निवडणुकीतील माजी आमदार अमल महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे.

मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास कार्यकारी संचालक चिटणीस कारखान्यातील काम आटोपून कसबा बावडामार्गे कोल्हापूर शहराकडे जात असताना मुख्य रस्त्यावर पाटील गल्लीसमोर सुमारे पन्नासहून अधिक कार्यकर्ते व शेतकरी थांबले होते. त्यांनी चिटणीस यांची गाडी अडवली. त्यांना काही कळण्याच्या आतच गाडीतून बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यात त्यांचे कपडे फाटले. ते खाली पडले. त्यांच्या गाडीवरही लाथाबुक्क्या मारण्यात आल्या.

गाडीतून ओडताना झालेल्या झटापटीत गाडीचा दरवाजाही वाकला. चिटणीस यावेळी मोठ्याने ओरडत होते. हात जोडत होते. तशाच अवस्थेत ते गाडीत जाऊन बसल्यावर त्यांना पुन्हा ओढून मारहाण झाली. गाडीच्या चालकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु जमावाने त्याला जुमानले नाही. गाडीच्या मागील सीटवर दोघेजण होते ते घाबरून बसल्याचे चित्रीकरणामध्ये दिसत आहे.

दरम्यान, नेमकी यावेळी औद्योगिक वसाहतीमधून सुटणारी वाहने रस्त्यावर आली होती. त्यातच गळीत हंगाम सुरू असलेले उसाची वाहनेही रस्त्यावर येत होती. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. एकादा अपघात झाला की काय असे समजून बघ्यांची गर्दी वाढली. काहींनी कार्यकारी संचालक चिटणीस यांना गाडीत बसवले आणि गाडी निघून गेली. दरम्यान, घटनास्थळी शाहूपुरी पोलिसांनी काही दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या प्रकारामुळे मुख्य रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण राहिले.

गतवर्षी एप्रिलमध्ये राजाराम कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीत अनेकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. आता कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले. मात्र ऊसतोडीची तारीख ओलांडूनही केवळ विरोधक म्हणून आपला ऊस नेला जात नाही अशी भावना ऊस उत्पादक शेतकऱ्यात होती. याबाबत विरोधी गटाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर या पूर्वी दोन वेळा धडक मारून जाब विचारला; पण याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही कारखाना प्रशासनाकडून झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे मत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना संतप्त होत्या. याबाबत मंगळवारी सकाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयावर मोर्चाही काढला.

महाराष्ट्रातील पहिलीच घटना

महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीतील गेल्या ७५ वर्षाच्या इतिहासात एखाद्या कारखान्याच्या कार्यकारी संचालकास ऊस नेत नाहीत या रागातून अशा पद्धतीने मारहाण होण्याची ही पहिलीच घटना आहे. कार्यकारी संचालक चिटणीस हे मूळचे हुपरीचे आहेत. त्यांनी यापूर्वी शरद, मंडलिक, कुंभी कासारी कारखान्यात काम केले आहे. गेली काही वर्षे ते राजाराम कारखान्यात कार्यकारी संचालक आहेत.

पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर तणाव

दोन्ही गटांचे कार्यकर्ते पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रात्री ८:३० वाजेच्या सुमारास एकाचवेळी आल्याने तणाव निर्माण झाला. सुमारे तीनशे- चारशे कार्यकर्ते होते. दोन्ही बाजूंकडून घोषणा सुरू होत्या. यावेळी पोलिसांनी संभाव्य धोका ओळखून शीघ्र कृती दलास पाचारण केले व जमावाला पांगवले. विरोधी गटाचा जमाव कसबा बावड्यातील भगवा चौकात रात्री उशिरापर्यंत थांबून होता.

जादा बंदोबस्त..

मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शाहूपुरी पोलिसांनी कसबा बावड्यात शीघ्र कृती दलाची तुकडी तैनात करण्यात आली.

Web Title: Mahadik-Satej Patil dispute in Kolhapur; MD of Rajaram factory beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.