कोल्हापूर : दोन हजारांची लाच घेताना पोलीस नाईक अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:25 PM2018-12-12T14:25:44+5:302018-12-12T14:28:18+5:30

राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करता जामिनावर सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच घेताना पोलीस नाईकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

Kolhapur: Police naik arrested after taking a bribe of two thousand | कोल्हापूर : दोन हजारांची लाच घेताना पोलीस नाईक अटक

कोल्हापूर : दोन हजारांची लाच घेताना पोलीस नाईक अटक

Next
ठळक मुद्देदोन हजारांची लाच घेताना पोलीस नाईक अटकराजारामपुरी पोलीस ठाण्यातच सापळा

कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करता जामिनावर सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच घेताना पोलीस नाईकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

संशयित संजय लोभाजी नैताम (वय ३८, रा. जुनी पोलीस लाईन, कसबा बावडा, मूळ रा. किनवट, जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस ठाण्यातच झालेल्या कारवाईने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी, विक्रम शिवाजी पुजारी-कांबळे (३६, रा. पाटील गल्ली, टेंबलाईवाडी) हे उत्तम सावंत यांच्या घरी भाड्याने राहतात. त्यांचे वडील शिवाजी परशुराम कांबळे यांनी दीड वर्षापूर्वी चुलतभाऊ संदीप वसंत कांबळे यांच्याकडून ३० हजार रुपये हातउसने घेतले होते.

पैशांची परतफेड करण्याच्या कारणावरून संदीप कांबळे व शिवाजी कांबळे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी संदीप कांबळे हा त्याच्या घराच्या वास्तुशांतीची पत्रिका देण्यासाठी विक्रमच्या वडिलांच्या घरी गेला असता त्यांनी रागाने पत्रिका टाकून दिली होती. त्यातून दोघांमध्ये वादावादी होऊन हाणामारी झाली होती. त्यानुसार संदीप कांबळे यांनी पुजारी, त्यांचे आई-वडील, पत्नी यांच्याविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या गुन्ह्यात अटक न करता जामीन करण्यासाठी पोलीस नाईक संजय नैताम याने विक्रमकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार विक्रमने लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीश गोडे यांची भेट घेऊन तक्रार केली.
त्याप्रमाणे मंगळवारी दुपारी दोन सरकारी पंचांसमक्ष लाचेची खात्री केल्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात सापळा लावून संशयित नैतामला रंगेहात पकडले.

अचानक ‘एसीबी’चा गराडा स्वत:भोवती पडताच नैताम भांबावून गेला. त्याला काहीच बोलता आले नाही. शांतपणे उभे राहून तो पंचनाम्यासाठी पथकाला सहकार्य करीत होता. तो वर्दीवरच लाच घेताना सापडल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस शरद पोरे, नवनाथ कदम, कृष्णात पाटील, आदींनी केली.

आठ वर्षांची सेवा

संजय नैताम हा २०१० मध्ये पोलीस दलात भरती झाला. २०१४ मध्ये तो राजारामपुरी पोलीस ठाण्यात नाईक पदावर रुजू झाला. त्याने आठ वर्षे सेवा बजावली आहे. कारवाईने त्याचा चेहरा पूर्णत: पडला होता. ज्या पोलीस ठाण्यात रुबाब मारला, त्याच ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. रात्री त्याला पोलीस ठाण्याच्या कोठडीतच ठेवले होते. 
 

 

Web Title: Kolhapur: Police naik arrested after taking a bribe of two thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.