शंकर-पार्वतीच्या वास्तव्याने पुनित श्री क्षेत्र वडणगे, कोल्हापूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 02:01 PM2024-03-08T14:01:37+5:302024-03-08T14:01:37+5:30

कोंबड्याला पुजणारे एकमेव गाव

Kolhapur is the only village in Maharashtra to have two separate temples of Shankar and Parvati | शंकर-पार्वतीच्या वास्तव्याने पुनित श्री क्षेत्र वडणगे, कोल्हापूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर

शंकर-पार्वतीच्या वास्तव्याने पुनित श्री क्षेत्र वडणगे, कोल्हापूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर

कोल्हापूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या करवीर तालुक्यातील वडणगे येथे दरवर्षी महाशिवरात्री यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. आज, शुक्रवारी या यात्रेला प्रारंभ होत आहे. शंकर आणि पार्वतीची दोन स्वतंत्र मंदिरे असणारे महाराष्ट्रातील हे एकमेव गाव असल्याने या दिवशी तालुक्याबरोबरच जिल्हा व राज्यातून येणारे भाविक पहाटेपासूनच दर्शनाला गर्दी करतात. ‘करवीर महात्म्य’ ग्रंथात उल्लेख असणाऱ्या भगवान शंकर-पार्वतीच्या वास्तव्याने पुनित झालेल्या श्री क्षेत्र वडणगे ग्रामक्षेत्राला विशेष महत्त्व आहे.

येथील शिव-पार्वती तलाव पूर्वी ‘संबकेश्वर तळे’ म्हणून ओळखला जात होता. फार वर्षांपूर्वी संबकेश येथील राजा गौतमी याने वडणगे येथे वास्तव्य केले होते. या तलावाशेजारीच शंकर आणि पार्वती यांची श्रद्धास्थाने आहेत.

महाशिवरात्रीच्या दिवशी या देवतांचे दर्शन घेणे पवित्र मानले जाते. भगवान शंकर-पार्वती यांचे वास्तव्य आणि मंदिराबाबत अनेक दंतकथा सांगितल्या जातात. फार वर्षांपूर्वी गुणवंती नामक एका शिवभक्त स्त्रीला लिंगेश्वर प्रसन्न झाले आणि त्याचवेळी येथे लिंगेश्वराची स्थापना झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. एके दिवशी पार्वतीने शंकराला नदी ओलांडून प्रवेश करून भक्तांना तारक मंत्राने आशीर्वाद देण्याविषयी विनंती केली. साक्षात अंबाबाई येथे वास्तव्यास असून, मला येथून जाण्याची गरज नाही, असे शंकराने सांगितले. तेव्हा पार्वतीला प्रचिती दाखविण्यासाठी भगवान शंकरांनी मृत ब्राह्मणाचे रूप धारण केले. पार्वतीने स्त्रीरूप धारण करून जो कोणी अश्वमेध यज्ञ करेल त्याचे शव चितेवर ठेवणे शक्य होईल, असे सांगितले.

ब्रह्म वैदूने पंचगंगेत स्नान करून ब्रह्मदेवाची पूजा आणि विष्णूचे स्मरण केले. शव उचलताच विष्णूरूप दिसून आले. दरम्यान, तिसरा प्रहर झाल्याने भगवान शंकराला जाग आली आणि पार्वती त्याच गावात स्वतंत्र धावा करत राहिली. त्याचवेळी कोंबडा आरवल्याने भगवान शंकर-पार्वतीचे वास्तव्य येथेच राहिले, अशी आख्यायिका सांगितली जाते.

शंकर आणि पार्वती या दोन मंदिरांच्या मध्यभागी कोंबड्याचे दुर्मिळ असे शिल्प आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर-पार्वतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. आसपासच्या खेड्यांबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येतात. यात्रेदिवशी पहाटे शंकर आणि पार्वती यांच्या मूर्तीला ग्रामस्थांतर्फे अभिषेक घालण्यात येतो. शंकराच्या मंदिरातील पिंडी काळ्या पाषाणाची आहे. अतिशय देखणे आणि सुरेख असे मंडपाचे काम केले असून, ८८ फूट उंचीच्या शिखरावर देवदेवतांच्या व संतांच्या आकर्षक व सुबक मूर्ती कौशल्याने कोरलेल्या आहेत. बदलत्या काळात यात्रेच्या मूळ स्वरूपाला धक्का न लागू देण्याची जबाबदारी ग्रामस्थ घेतात.

यात्रेदिवशी पार्वती गल्लीच्या मार्गावर दुतर्फा तसेच मरगाई मंदिर चौक परिसरात दुकाने थाटली जातात. महाशिवरात्री उत्सवाबरोबरच श्रावण सोमवार, नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. नवरात्र काळात पालखीला खांदा देण्याचा व इतर मान गावातील बराले, माने, चेचर, संकपाळ, दिंंडे, सासने, जंगम या कुटुंबांना आहे. यावेळी देवीची वेगवेगळ्या रूपांत सालंकृत पूजा बांधली जाते. श्रावणातील शेवटच्या सोमवारी मंदिरात श्री सत्यनारायणाची महापूजा घातली जाते. याशिवाय मंदिरात भजन, ग्रंथवाचन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण असे कार्यक्रम वर्षभर सुरूच असतात. पार्वती मंदिर परिसरात होणारा दीपोत्सवही डोळ्यांचे पारणे फेडणारा साजरा होतो.

येथील प्राचीन कालीन संबकेश्वर तलाव सुमारे ३२ एकरांत विस्तारलेला असून, अलीकडच्या काळात तो ‘शिव-पार्वती तलाव’ या नावाने परिचित आहे. प्राचीन काळी गावात संबकेश येथील गौतमी राजाने काही काळ वास्तव्य केले होते. त्याच काळात या तलावाची खोदाई झालेली होती, असे काही उल्लेख ग्रंथात आढळतात. अशी पौराणिक संदर्भ असलेली वडणगेची यात्रा उत्साहात साजरी होत आहे.

कोंबड्याला पुजणारे एकमेव गाव

‘कोंबडा’ या पाळीव पक्ष्याला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु भारतातील वडणगे हे एकमेव गाव असे असावे की, ज्याठिकाणी कोंबड्याच्या प्रतिकृतीची पूजा होते. करवीरच्या भ्रमणासाठी शंकर-पार्वती गावात आले असताना तिसरा प्रहर झाल्याने कोंबडा आरवला, असा उल्लेख प्राचीन ग्रंथात आहेत. कोंबड्यामुळेच केवळ वडणगे गावात शिव-पार्वती कायमचे वास्तव्यास राहिले म्हणून या कोंबड्याच्या प्रतिकृतीची पूजा केली जाते.

Web Title: Kolhapur is the only village in Maharashtra to have two separate temples of Shankar and Parvati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.