कोल्हापूरची केळी परदेशात

By admin | Published: January 2, 2015 11:43 PM2015-01-02T23:43:52+5:302015-01-03T00:17:14+5:30

कुंभोजच्या शेतकऱ्यांचे उत्पादन : ‘संजीवनी अ‍ॅग्रो’च्या मदतीने रवाना, पहिल्यांदाच संधी

Kolhapur banana abroad | कोल्हापूरची केळी परदेशात

कोल्हापूरची केळी परदेशात

Next

भोमगोंडा देसाई : कोल्हापूर :जिल्ह्यातील कुंभोज (ता. हातकणगंले) येथील अरविंद पाटील, अनिल नकाते यांच्या शेतातील २१ टन केळी संयुक्त दुबईला पाठविण्यात आली. त्या बाजारपेठेतून मागणी आल्यानंतर तमदलगे (ता. शिरोळ) येथील संजीवनी अ‍ॅग्रो संस्थेतर्फे ही केळी पाठविण्यात आली. कोल्हापुरी चप्पल आणि गुळानंतर आता येथील केळीही सातासमुद्रापार जात आहेत.
जिल्ह्यात मुख्य व्यापारी पीक म्हणून उसाचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि बाजारपेठेची हमी यांमुळे शेतकरी उसाला पहिली पसंती देतो. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत चांगला दर मिळत नसल्यामुळे अलीकडे शेतकरी केळी पीक घेण्याकडे वळतो आहे. शासनाचा कृषी विभागही केळी पिकाच्या लागवडीपासून ते त्याला बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंत प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे मदत करीत आहे.
पिकविण्यापासून विकण्यापर्यंत वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सार्वजनिक, खासगी भागीदारी योजनेंतर्गत संजीवनी अ‍ॅग्रो संस्थेची निवड फेब्रुवारी २०१४ मध्ये केली आहे. या संस्थेकडे केळी उत्पादन घेणारे साडेसातशे शेतकरी संबंधित आहेत. तालुकानिहाय शेतकऱ्यांचे गट तयार करून बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. या संस्थेतर्फे कर्नाटक, हरियाणा, जम्मू, दिल्ली, राजस्थान या राज्यांतील बाजारपेठांत केळी पाठविली आहेत. आता दुबईच्या बाजारपेठेकडेही ती रवाना झाली .
श्री. पाटील, नकाते हे शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून केळींचे उत्पादन घेतात. या दोन्ही शेतकऱ्यांची सध्या आठ एकर क्षेत्रावर केळी आहेत. ‘जी नाईन’ जातीची केळी त्यांनी लावली आहेत. या दोन शेतकऱ्यांची केळी दुबई येथील व्यापाऱ्यास पहिल्यांदा इंटरनेटच्या माध्यमातून दाखविली. त्यांनी पसंती दिली. त्यामुळे गुरुवारी २१ टन केळीचा कंटेनर रवाना झाला. तो मुंबईतून समुद्रमार्गे दुबईपर्यंत पोहोचणार आहे.


‘संजीवनी’सारख्या संस्थेच्या मदतीने बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. कोल्हापूरची केळी पहिल्यांदाच दुबईला गेली. यामध्ये कृषी विभागाचा मोठा वाटा आहे.
- मोहन आटोळे,
जिल्हा कृषी अधीक्षक


केळी दुबईला पाठविल्याने चार पैसे अधिक मिळणार आहेत. कृषी विभाग व संजीवनी संस्था यांच्यामुळे दुबई बाजारात आमच्या शेतातील केळी जात आहेत, याचा अभिमान आहे.
- अनिल नकाते, शेतकरी

संजीवनी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. शासनाच्या योजना पोहोचविल्या जात आहेत. मागणी आल्यानंतर दुबईला केळी पाठविली आहेत. उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, कानपूर येथूनही केळ्यांना मागणी आली आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ती पाठविता आलेली नाहीत.
- चेतन पाटील, चेअरमन, संजीवनी अ‍ॅग्रो

Web Title: Kolhapur banana abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.