Kolhapur: अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप उतरवायला लागणार दोन महिने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 01:41 PM2024-04-04T13:41:34+5:302024-04-04T13:42:02+5:30

चंद्रपूर येथील लाकूड येणार : त्र्यंबोली टेकडीवर होणार काम

It will take two months to take down the Garuda Mandap in Ambabai Temple in Kolhapur | Kolhapur: अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप उतरवायला लागणार दोन महिने

Kolhapur: अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप उतरवायला लागणार दोन महिने

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आवारातील गरुड मंडप उतरविण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा अवकाश आहे. हे मंडप साकारण्यासाठी सध्या चंद्रपूर येथील लाकडासाठी ऑर्डर देण्यात आली आहे. लाकूड पुढील पंधरा दिवसांत कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर त्याचे कॉलम तयार करेपर्यंत मे महिना संपणार आहे. शिवाय हे दोन महिने पर्यटकांची प्रचंड गर्दी असल्याने या काळात गरुड मंडप उतरविणे जिकिरीचे जाणार आहे.

अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप पूर्णत: उतरवून तो नव्याने साकारला जाणार आहे. मणिकर्णिका कुंडाचे मूळ स्वरूप आणून त्याचे जतन संवर्धन केले जाणार आहे. तसेच पुरातन नगारखान्याची दुरुस्ती होऊन तो नव्या दिमाखात सज्ज होणार आहे. या सगळ्या सुधारणांसाठी देवस्थान समितीला २२ काेटींचा निधी खर्च करण्याची मान्यता मिळाली आहे.

गरुड मंडपासाठी चंद्रपूर येथील लाकूड मागविण्यात आले असून ते पुढील १५ दिवसांत कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. त्र्यंबोली टेकडी येथे या लाकडाचे नक्षीकाम तसेच मोठे मोठे कॉलम (खांब) साकारले जाणार आहेत. हे स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर मंदिर आवारातील गरुड मंडप उतरवण्यास सुरुवात होईल. हे सर्व काम अतिशय नाजूक व हेरिटेज असल्याने त्याला वेळ लागणार आहे. तसेच एप्रिल व मे महिन्यात सुट्ट्यांमुळे भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्या काळात गरुड मंडपाचे बांधकाम उतरविणे शक्य नाही. त्यामुळे हे मंडप उतरवायला किमान जून उजाडावा लागेल.

मणिकर्णिका कुंडासाठीचे दगड आवारात दाखल झाले असून ते घडविण्याचे काम सुरू झाले आहे. नगारखान्याचे कामदेखील सुरू होत आहे. एकाचवेळी तीनही वास्तूंचे काम सुरू होत असून त्यासाठी किमान वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे.

साहित्याचा पुनर्वापर

गरुड मंडप उतरवत असताना त्यातील जुने लाकडी खांब किंवा अन्य साहित्य मजबूत असतील तर त्यांचा पुनर्वापर नव्या बांधणीमध्ये केला जाणार आहे. त्यादृष्टीने ही वास्तू उतरणे ही अतिशय क्लिष्ट व नाजूक बाब असणार आहे. हे काम पुरातत्वमार्फत केले जात आहे.

ड्रेनेज लाइन बाहेरून वळवली..

शहरातील ड्रेनेजची पाइपलाइन अंबाबाई मंदिर परिसरातून जात होती. हे पाणी मणिकर्णिका कुंडात जात होते; पण आता ही पाइपलाइन मंदिराबाहेरून वळविण्यात येत आहे. अंबाबाई मंदिराच्या उत्तर दरवाजापासून पूर्व दरवाजा व त्यापुढे संत गाडगे महाराज पुतळा मार्ग ही पाइपलाइन वळविण्यात येत आहे. त्यामुळे आता अंबाबाई मंदिराच्या आवारात येणारे ड्रेनेजचे पाणी बंद होणार आहे; पण हे काम वेगाने व्हावे, अशी देवस्थान समितीची मागणी आहे.

Web Title: It will take two months to take down the Garuda Mandap in Ambabai Temple in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.