पंतप्रधान योजनेत लोकांपेक्षा विमा कंपन्यांचाच फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:14 AM2018-09-04T11:14:47+5:302018-09-04T11:16:33+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतील पंतप्रधान जीवनज्योती व सुरक्षा योजनेतून लोकांपेक्षा विमा कंपन्यांचेच खिसे जास्त भरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

Insurance companies benefit from the Prime Minister's scheme | पंतप्रधान योजनेत लोकांपेक्षा विमा कंपन्यांचाच फायदा

पंतप्रधान योजनेत लोकांपेक्षा विमा कंपन्यांचाच फायदा

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान योजनेत लोकांपेक्षा विमा कंपन्यांचाच फायदाखातेदार मात्र १० लाख ९५ हजार

विश्वास पाटील 

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतील पंतप्रधान जीवनज्योती व सुरक्षा योजनेतून लोकांपेक्षा विमा कंपन्यांचेच खिसे जास्त भरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याची लीड बँक असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या ४६ शाखांतून गेल्या चार वर्षांत जीवनज्योती योजनेतून १२३, तर सुरक्षा योजनेतून फक्त ४५ लोकांनाच कसाबसा लाभ झाला आहे. त्यामुळे योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात किंवा तिचे लाभ मिळवून देण्यात बँका कमी पडत असल्याचे चित्र पुढे आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात वर्षाला होणारे नैसर्गिक व अपघाती मृत्यू व प्रत्यक्षात आर्थिक लाभ मिळालेली संख्या यांचा ताळमेळ लावला तर खातेदारांपैकी अर्ध्यातील अर्धा टक्के लोकांनाही याचा लाभ मिळत नाही. याउलट विमा हप्त्यापोटी कंपन्यांकडे जमा होणारी रक्कम मात्र जास्त आहे.

पंतप्रधानांनी जनधन योजनेंतर्गत या दोन योजना सुरू केल्या. त्यातील जीवनज्योती योजना ही १८ ते ५० वयोगटातील खातेदारांसाठी आहे. तिचा वार्षिक हप्ता ३३० रुपये आहे. ही आयुर्विमा योजना आहे. त्यामुळे त्याचा २ लाख रुपये लाभ हा खातेदाराच्या निधनानंतरच वारसांना मिळतो.

या बँकेत या योजनेतील ३५ हजार ९०६ खाती आहेत. योजनेचा कालावधी ३१ मे ते १ जून असा आहे. त्याअंतर्गत २०१५-१६ ते २०१८-१९ पर्यंत १२४ खातेदारांचे प्रस्ताव पाठविले व त्यातील १२३ मंजूर झाले.

पंतप्रधान सुरक्षा योजना ही १८ ते ७० वयोगटातील खातेदारांसाठी आहे. बँक खात्यातून वर्षाला फक्त १२ रुपये कपात करून अपघाती निधन झाल्यास २ लाख रुपयांची मदत देणारी ही चांगली योजना आहे. बँक आॅफ इंडियामध्ये ७३ हजार ३९ लोकांनी ही खाती उघडली आहेत. परंतु चार वर्षांत ४८ खातेदारांचेच प्रस्ताव सादर झाले व त्यातील ४५ खातेदारांनाच त्याचा लाभ मिळाला.

याचा दुसरा अर्थ असा आहे की, बँक आॅफ इंडियाच्या जिल्ह्यात ४६ शाखा आहेत व त्या शाखांच्या अंतर्गत चार वर्षांत फक्त एकाच व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला आहे. बँक आॅफ इंडिया ही अग्रणी बँक असल्याने तिच्या शाखांचे जाळे जास्त आहे. तरीही या दोन्ही योजनांचे लाभार्थी फक्त १६८ असतील, तर अन्य बँकांचे त्याहून अगदीच कमी असतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

खातेदार मात्र १० लाख ९५ हजार

कोल्हापूर जिल्ह्यांत ३५ राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या ४०१ शाखांचे जाळे आहे. तर ग्रामीण बँकांच्या ८ शाखांचे जाळे आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १९१ शाखा आहेत. जिल्ह्यांत जनधन योजनेतील एकूण ११ लाख ४१ हजार खाती आहेत. त्यातील पंतप्रधान सुरक्षा योजनेची ७ लाख २६ हजार व जीवनज्योती योजनेची ३ लाख ६९ खाती असल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने यांनी दिली.

सर्व बँकांकडील या दोन योजनेत किती खातेदारांना लाभ मिळाला, याची माहिती लीड बँकेकडेही उपलब्ध नाही. अग्रणी बँक अथवा जिल्हा प्रशासनानेही ती एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

बँक आॅफ महाराष्ट्रकडून प्रतिसाद नाही

महाराष्ट्राची लीड बँक असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रकडे राज्यातील किती खातेदारांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळाला याची चौकशी केली. परंतु वारंवार फोन करून प्रतिसाद मिळाला नाही. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने टोल फ्री नंबर दिला आहे. परंतु त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध नाही.
 

 

Web Title: Insurance companies benefit from the Prime Minister's scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.