बीटपासून साखर उत्पादन फायद्याचे;आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:59 PM2018-12-02T22:59:34+5:302018-12-02T23:00:46+5:30

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क आंबोली (जि. सिंधुदुर्ग) : बीटपासून साखर उत्पादन करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याने त्यास प्राधान्य ...

Information about the sugar production benefit from Beat; At the meeting of Vasantdada Sugar Institute in Amboli | बीटपासून साखर उत्पादन फायद्याचे;आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत माहिती

बीटपासून साखर उत्पादन फायद्याचे;आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत माहिती

googlenewsNext

विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबोली (जि. सिंधुदुर्ग) : बीटपासून साखर उत्पादन करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याने त्यास प्राधान्य देण्याचा निर्णय रविवारी येथील प्रादेशिक ऊस प्रजनन केंद्रात झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)च्या नियामक मंडळाच्या सभेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार होते. सध्या जगात बीटच्या बियाण्यांचे ‘सेसव्हेन्डरहॅव’ ही एकच बेल्जियमची कंपनी उत्पादन करते, तिच्यावर अवलंबून राहावे लागू नये यासाठी ‘व्हीएसआय’ने बियाणे उत्पादनांचा कार्यक्रम हाती घ्यावा, अशी सूचना पवार यांनी केली.
साखर हंगामाचा कालावधी कमी झाल्याने कारखान्याची यंत्रणा जास्त महिने बंद राहते. बीटचे उत्पादन करून त्यापासून आणखी एक-दोन महिने कारखाने सुरू ठेवता येतील. बीट हे रब्बी हंगामात येणारे आणि चांगला नफा देणारे पीक असल्याने शेतकºयांनाही त्याचा चांगला फायदा होऊ शकतो आणि या पिकाला पाणी कमी लागत असल्याने कमी पाण्याच्या प्रदेशातही ते घेता येऊ शकते म्हणून उसाबरोबरच आंतरपीक म्हणूनही बीट उत्पादनास प्रोत्साहन दिले जावे असे या सभेत ठरले. त्यासाठी शेतकºयांची मानसिकता तयार करण्याचे काम साखर कारखाने व व्हीएसआयच्या पातळीवर करण्यात यावे अशा काही सूचना या बैठकीत पवार यांनी केल्या.
पवार यांची तिसरी पिढी असलेले रोहित पवार, पार्थ व जय पवार हेदेखील सभेस उपस्थित होते. त्यांनी हा विषय बारकाईने समजून घेतला. बैठकीस कल्लाप्पाण्णा आवाडे, विजयसिंह मोहिते--पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, बबनराव शिंदे, मदन भोसले, इंद्रजित मोहिते, यशवंतराव गडाख, विशाल पाटील, गणपतराव तिडके, बी. बी. ठोंबरे, प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे व प्रदीप घोडके यांनी नवीन वाणांची माहिती दिली.

सद्य:स्थिती काय?
महाराष्ट्रात आता कर्मयोगी अंकुशराव टोपे साखर कारखाना जालना, राजारामबापू वाळवा व कर्नाटकात रेणुका शुगर्स येथे बीटपासून साखर उत्पादन करणारे कारखाने प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले. आता राजारामबापू येथील प्रकल्प बारामती अ‍ॅग्रो येथे हलविण्यात आला असून तिथे अधिक व्यापक प्रमाणात हा प्रयोग करण्यात येणार आहे. तिथे शेतकºयांना प्रतिटन ९९७ ते १५०६ पर्यंत निव्वळ नफा मिळाल्याची माहिती देण्यात आली.
बीटपासून साखर उत्पादन करायचे असल्यास सध्याच्या कारखान्यांत ‘डिफ्युजर’ बसवावा लागेल. हे पीक भाजीपाल्यासारखे कष्टाचे आहे, म्हणून ते करण्यासाठी शेतकºयाला तयार करावे लागेल. ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले तरच त्याचे एकसारखे गाळप करणे शक्य आहे. वेळेत गाळप झाले नाही तर बीट मऊ पडते व त्याचा चोथा तयार होतो, या अडचणी चर्चेत पुढे आल्या. परंतु त्याचे उत्पादन आपल्याकडे चांगले येऊ शकते, साखर उतारा चांगला असतो व शेतकºयांचा विचार करता ते फायदेशीर ठरणारे आहे यावर सर्वांचे एकमत झाले.
पंजाब दौरा
पंजाबमधील राणा शुगर्स हा कारखाना २०१४ पासून बीट लागवड करतो. गेल्या हंगामात आठ हजार एकरांवर बीट लागवड करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. त्यांनी यशस्वी लागवड कशी केली हे पाहण्यासाठी व्हीएसआयचे एक पथक तातडीने पंजाबला जाणार आहे. त्यानंतर बीट व उसापासून साखर निर्मिती करणारा कारखाना पाहण्यासाठी इजिप्तलाही शिष्टमंडळ जाणार आहे.

Web Title: Information about the sugar production benefit from Beat; At the meeting of Vasantdada Sugar Institute in Amboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.