पंचगंगा प्रदूषण रोखण्यात सुधारणा

By admin | Published: June 19, 2015 12:32 AM2015-06-19T00:32:41+5:302015-06-19T00:36:07+5:30

चोक्कलिंगम् : ‘एसटीपी’ पूर्ण क्षमतेने सहा महिन्यांत सुरू

Improvement in preventing Panchganga pollution | पंचगंगा प्रदूषण रोखण्यात सुधारणा

पंचगंगा प्रदूषण रोखण्यात सुधारणा

Next

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण रोखण्यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आपण पूर्णत: समाधानी नसलो तरी या कामात सुधारणा मात्र नक्की झाल्या आहेत, असा दावा पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. शहरातील सर्व प्रकारच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास अद्याप सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असेही चोक्कलिंगम् यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी चोक्कलिंगम् कोल्हापुरात आले होते. बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मागीलवेळी मी जेव्हा आलो होतो, त्यापेक्षा यावेळी सुधारणा झाली असल्याचे आपणाला पाहायला मिळाले. मनपाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) पाणी बाहेर पडणार आहे, तेथून पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्याच्या एसटीपीमधून पन्नास टक्के पाण्यावर प्रक्रिया होत असून तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करायचा झाला तर त्यासाठी आणखी सहा महिने लागणार आहेत.
प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे, असे आमचे मत असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाण्यात बीओडीचे प्रमाण जास्त असल्याचे सांगतात. त्यामुळे संयुक्तपणे पाहणी करून बीओडी तपासणीसाठी नमुने घेण्यास सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)



मनपा आणखी एक एसटीपी उभारणार
दुधाळी नाला अडविण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून या नाल्याच्या जवळच एक १७ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. लवकरच त्याचे काम पूर्ण होईल शिवाय लाईन बाजार व बापट कॅम्प येथे सांडपाणी उचलण्याकरिता पंपिंग स्टेशन उभारले जाणार असून, त्याच्यासाठीच्या जागा संपादनाची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना मनपाला दिल्या आहेत, असे सांगून चोक्कलिंगम् म्हणाले की, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी प्रक्रिया करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जुलै महिन्यापर्यंत पूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया करायची आहे. सध्या केवळ पंचवीस टक्के सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते. त्यासाठी उपलब्ध यंत्रणेची पाहणी करून एप्रिल २०१६ पर्यंत मुदत देणे शक्य आहे का, याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्णय घेण्यास सांगितले.


इचलकरंजीतील कामावर
लक्ष ठेवा
इचलकरंजी शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकण्यात येत असून, या कामाची गती फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे या कामांवर लक्ष ठेवून सतत आढावा घ्यावा, कामावर लक्ष ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, आदी उपस्थित होते.

साखर कारखान्यांनी क्षमता वाढवावी
साखर कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया आहेत का, असतील तर ते पूर्ण क्षमतेचे आहेत का याची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या कारखान्यांकडे पुरेशा क्षमतेचे प्रक्रिया केंद्र नसेल त्यांनी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी पूर्ण क्षमतेची करावीत, अशा सूचना देण्यात आल्याचेही चोक्कलिंगम् यांनी सांगितले.


जिल्हा परिषदेला निधी मिळण्यात अडचणी
जिल्हा परिषदेने नदीकाठावर असणाऱ्या ३४ गावांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता १०८ कोटींचा प्रस्ताव तयार करून तो कें द्र सरकारकडे पाठविण्यात आला असला तरी त्याला निधी मिळण्यात अडचणी आहेत. त्यामुळे दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असणाऱ्या पाच ते दहा गावांची निवड करून त्यांना डीपीडीसीमधून किंवा ‘नाबार्ड’कडून निधी घेऊन यंत्रणा उभी करता येईल का, याचा विचार आम्ही करत आहेत, असे चोक्कलिंगम् यांनी सांगितले.

Web Title: Improvement in preventing Panchganga pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.