कोल्हापूर: इचलकरंजी स्वतंत्र तालुका होणार? प्रस्ताव सादर करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 02:23 PM2022-08-20T14:23:37+5:302022-08-20T14:28:14+5:30

हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी व हातकणंगले असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, इचलकरंजीत तहसील कार्यालय नाही.

Ichalkaranji will be a separate taluka? Order of the Revenue Minister to submit the proposal | कोल्हापूर: इचलकरंजी स्वतंत्र तालुका होणार? प्रस्ताव सादर करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

कोल्हापूर: इचलकरंजी स्वतंत्र तालुका होणार? प्रस्ताव सादर करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

Next

इचलकरंजी : शहराला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यासह याठिकाणी तहसील कार्यालय सुरु करण्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून, इचलकरंजी आता स्वतंत्र तालुका होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हातकणंगले तालुक्याची लोकसंख्या आठ लाखापेक्षा अधिक आहे. सध्या इचलकरंजी येथे महाराष्ट्र महसूल व वन विभागाकडील शासननिर्णयानुसार अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन केले आहे. अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कक्षेत कबनूर, कोरोची, रांगोळी, रेंदाळ व पट्टणकोडोली या मोठ्या लोकसंख्येच्या गावांसह इचलकरंजी महापालिका व हुपरी नगरपालिका यांचा समावेश केला आहे. इचलकरंजी येथे उपविभागीय कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालये, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, तीन पोलीस ठाणे व इतर सरकारी आस्थापना अशी अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी व हातकणंगले असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, इचलकरंजीत तहसील कार्यालय नाही.

इचलकरंजीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा व तहसीलदार कार्यालय व्हावे, हा प्रस्ताव प्रदीर्घ काळापासून शासनाकडे प्रलंबित आहे. इचलकरंजी शहराचा भौगोलिक विकास व कामे गतीने होण्यासाठी इचलकरंजी येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाऐवजी कबनूर, कोरोची, चंदूर, तारदाळ व खोतवाडी या पाच गावांसह इचलकरंजीला स्वतंत्र तालुका म्हणून मंजुरी देऊन तहसील कार्यालय सुरू व्हावे, अशी मागणी केली होती. ती आता पूर्ण होणार आहे.

तहसीलदार कार्यालय हातकणंगलेत असले तरी त्या तुलनेत जवळपास ६० टक्के काम हे इचलकरंजीतील अप्पर तहसीलदार कार्यालयात होत आहे. त्यामुळे इचलकरंजीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळणे अत्यंत गरजेचे असून, स्वतंत्र तालुका झाल्यास येथील कामे आणखीन गतीने होण्यास मदत होणार आहे. -प्रकाश आवाडे, आमदार

Web Title: Ichalkaranji will be a separate taluka? Order of the Revenue Minister to submit the proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.