‘माध्यमिक’मुळे चौथा मजला पुन्हा चर्चेत

By admin | Published: November 14, 2016 12:12 AM2016-11-14T00:12:13+5:302016-11-14T00:12:13+5:30

जिल्हा परिषद : प्रत्येक कामात ‘हात’ मारण्याची कला; विभाग लाचखोरीने डागाळला

Fourth floor discusses 'middle' again in the discussion | ‘माध्यमिक’मुळे चौथा मजला पुन्हा चर्चेत

‘माध्यमिक’मुळे चौथा मजला पुन्हा चर्चेत

Next

 
कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणाऱ्या माध्यमिक शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांची पदे मंजूर करण्यासाठी कार्यरत असलेला कोल्हापूर जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग लाचखोरीने डागाळला आहे. चंद्रकांत सावर्डेकर यांना रंगेहात पकडले गेल्याने एवढी मोठी रक्कम घेताना यातील मोठे मासे कसे गळाला लागणार, हा खरा प्रश्न आहे. एकीकडे कोल्हापूरची जिल्हा परिषद ग्रामविकास, जलव्यवस्थापन, स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम यामध्ये देशभरात अव्वल ठरत असताना माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या बदनामीमध्ये मोलाचा वाटा उचलत आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण देणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मान्यता, वैद्यकीय लेखे, मुख्याध्यापक पदासाठीची मंजुरी, शिक्षण सेवक नियुक्ती, शिक्षण सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर कायमस्वरूपी मान्यता यासारखी अनेक कामे या विभागाकडून केली जातात. मात्र, सहावा वेतन आयोग घेणाऱ्या माध्यमिक शिक्षकांच्या पगाराच्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी इथली यंत्रणा तरबेज झाली
आहे.
गेली काही वर्षे भरतीला बंदी असतानाही त्यातून पळवाटा काढून मंजुरी देण्यापासून ते भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यापासूनची कोणतीही फाईल येथे वजन वापरल्याशिवाय हलत नाही, असा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचा अनुभव आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार टीकेचा धनी झाला आहे. महिन्याभरापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत तर जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांनी एका सुरात माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या कार्यपद्धतीविषयी जाहीरपणे तक्रार केली होती. सावर्डेकरांनी जी लाच घेतली तीसुद्धा मुख्याध्यापक पदाच्या मंजुरीच्या प्रस्तावावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची सही घेण्यासाठी घेतल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाचा हा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. (पूर्वार्ध)
जिल्हा परिषदेमधील चौथ्या मजल्यावरील माध्यमिक शिक्षण विभाग हा नेहमीच तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे चर्चेत असतो. या विभागातील लिपिक विनायक पाटील आणि वरिष्ठ सहाय्यक लिपिक विकास लाड यांना याआधीच लाचप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत सावर्डेकर यांनी नव्या नोटांच्या स्वरूपात राज्यात पहिल्यांदा लाच स्वीकारण्याचा मान मिळविल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘माध्यमिक शिक्षण’च्या कारभाराची चर्चा सुरू झाली आहे. याच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या सर्व प्रकारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्यानेच कर्मचाऱ्यांचे हे धाडस वाढले आहे यात शंका नाही.
 

Web Title: Fourth floor discusses 'middle' again in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.