कोल्हापुरातून पहिल्यांदाच रात्रीच्या विमानाचे ‘तिरूपती’कडे उड्डाण; मंत्री उदय सामंत कुटुंबियांसह रवाना

By संतोष.मिठारी | Published: November 13, 2022 10:26 PM2022-11-13T22:26:14+5:302022-11-13T22:29:41+5:30

नाइट लँडिंग सुविधेचा वापर सुरू, रात्री ८ वाजून ४६ मिनिटांनी त्यांच्या विमानाने तिरूपतीच्या दिशेने उड्डाण केले

First night flight from Kolhapur to 'Tirupati'; Minister Uday Samant left with his family | कोल्हापुरातून पहिल्यांदाच रात्रीच्या विमानाचे ‘तिरूपती’कडे उड्डाण; मंत्री उदय सामंत कुटुंबियांसह रवाना

कोल्हापुरातून पहिल्यांदाच रात्रीच्या विमानाचे ‘तिरूपती’कडे उड्डाण; मंत्री उदय सामंत कुटुंबियांसह रवाना

Next

कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा टप्पा असलेली नाइट लँडिंग सुविधा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध झाली. या सुविधेचा प्रत्यक्षात वापर रविवारी झाला. रात्री ८ वाजून ४६ मिनिटांनी याविमानतळावरून पहिल्यांदाच रात्रीचे उड्डाण तिरूपतीला जाणाऱ्या खासगी विमानाचे झाले. उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे कुटुंबीय तिरूपतीला या विमानाने रवाना झाले.

‘डीजीसीए’च्या परवानगीनंतर आणि एपीआय प्रणालीवर विमानतळाची माहिती प्रसिद्ध झाल्याने विमानतळ व्यवस्थापनाने दि. ३ नोव्हेंबरपासून विस्तारित धावपट्टीचा वापर आणि नाइट लँडिंग सुविधेचा प्रारंभ केला. मात्र, नाइट लँडिंग अथवा टेकऑफसाठी कोणत्याही विमान कंपनी अथवा खासगी विमान वापरकर्त्यांनी परवानगी मागितली नव्हती. मंत्री सामंत यांनी तिरूपतीला जाण्यासाठी रविवारी विमानाचे नाईट टेकऑफ करणार असल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनाला शनिवारी दिली. त्यानुसार व्यवस्थापनाने तयारी केली.

मुंबईहून रविवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास मंत्री सामंत यांचे विमान कोल्हापुरात आले. त्यानंतर रात्री ८ वाजून ४६ मिनिटांनी त्यांच्या विमानाने तिरूपतीच्या दिशेने उड्डाण केले. व्हीएसआर कंपनीचे लिअरजेट ४५ या प्रकारातील ते आठ आसनी विमान होते.

कोल्हापुरातील नाइट लँडिंग सुविधेमुळे येथील विमानसेवेची गती वाढणार आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर त्याचा प्रारंभ करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. उद्योजक, व्यावसायिक आणि विविध विमानकंपन्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. -उदय सामंत, उद्योगमंत्री

सेवा देण्यास विमानतळ सज्ज

नाइट लँडिंग सुविधेचा रविवारी प्रत्यक्षात वापर झाला. या सुविधेचा पहिल्यांदाच वापर होणार असल्याने एअर फिल्डवरील लाईटिंग, वीजेचा पुरवठा, धावपट्टी, सुरक्षितता, आदींची तपासणी केली. विमानाचे सुरक्षितपणे आणि वेळेत टेकऑफ झाले. सुरक्षित सेवा देण्यास विमानतळ सज्ज असल्याचे कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले.
 

Web Title: First night flight from Kolhapur to 'Tirupati'; Minister Uday Samant left with his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.