कोल्हापुरात साकारतेय चित्रपट संशोधन केंद्र

By Admin | Published: April 20, 2017 06:32 PM2017-04-20T18:32:40+5:302017-04-20T18:32:40+5:30

भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राचा उपक्रम

Films Research Center, Kolhapur | कोल्हापुरात साकारतेय चित्रपट संशोधन केंद्र

कोल्हापुरात साकारतेय चित्रपट संशोधन केंद्र

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

इंदुमती गणेश,

कोल्हापूर , दि. २0: मराठी चित्रपटसृष्टीची गंगोत्री ही बिरुदावली मिळालेल्या कोल्हापुरात संशोधकांना किंवा रसिकांना मात्र चित्रपटसृष्टीची एकत्रित माहिती कुठेही मिळत नाही. एकेकाळी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ दिलेल्या या कोल्हापुरचा चित्रपट इतिहास आता संशोधन केंद्राच्या रुपाने उपलब्ध होणार आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक कें द्राच्यावतीने हे संशोधन केंद्र साकारण्यात येत आहे.

चित्रपटसृष्टीत भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, भारताचे पहिले सुपरस्टार, पहिले पोस्टर पेंटींग, प्रभातची सुरवात असे सगळे पहिले वहिले घडले ते कोल्हापुरात. आनंदराव पेंटर आणि कलामहर्षि बाबूराव पेंटर यांच्यापासून सुरु झालेल्या या उगमानंतर भालजी पेंढारकर, अनंत माने, व्ही. शांताराम, पुढे प्रभातची स्थापना, संस्थानचा राजाश्रय मिळाल्याने आकाराला आलेले शालिनी सिनेटोन आणि कोल्हापूर सिनेटोन म्हणजे आत्ताचा जयप्रभा स्टुडिओ अशा अनेक प्रवाहांनी समृद्ध बनवले.

लेखकांपासून ते दिग्दर्शक, कलावंत, नेपथ्य, रंग-वेशभूषा, तंत्रज्ञ असा स्वतंत्र उद्योग येथे उभा राहिला. त्यावेळी कोल्हापुर हेच चित्रपटसृष्टीचे प्रमुख केंद्र होते त्यामुळे १९३३ ते १९७५-८० हा काळ कोल्हापुरातील चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानला जातो. दुर्देवाने कोल्हापूरच्या या उज्वल इतिहासाची एकत्रित माहिती कोठेही उपलब्ध नाही.

एखाद्या चित्रपट व्यावसायिकाला, रसिकाला किंवा अभ्यासकांना कोल्हापुरच्या चित्रपटसृष्टीची माहिती तुकड्यांच्या स्वरुपात मिळते. किंवा जुन्या पिढीतील कलाकार किंवा दिग्दर्शकांशी संपर्क साधावा लागतो. त्यांच्याकडेही केवळ माहिती असते. कागदपत्रे, कृष्णधवल छायाचित्रे, जुने चित्रपट यांचे कमी अधिक प्रमाणात संकलन केलेले असते. त्यामुळे पुरेशी माहिती मिळत नाही.

रसिकांची ही अडचण दुर करत त्यांना कोल्हापुरचा हा इतिहास एकाच छताखाली उपलब्ध व्हावा यासाठी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राने पुढाकार घेतला आहे. केंद्राच्यावतीने गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूर चित्रपट संशोधन केंद्र साकारले जात आहे. त्यासाठी केंद्राचे श्रीकांत डिग्रजकर व चित्रपटसृष्टीच्या अभ्यासक कविता गगराणी या त्याकाळातील स्क्रीप्ट, छायाचित्रे, चित्रपट, वर्तमानपत्रे, मासिके यांच्यासह विविध साहित्यांचे संकलन करत आहेत.

काय असेल संशोधन केंद्रात?

जुन्या काळातील चित्रपटांचे स्क्रीप्ट, कलाकार, निर्माते-दिग्दर्शकांमध्ये होणारे करारपत्र, दुसऱ्या दिवशीच्या शुटींगच्या नोटिस, वेळा, तालमी, १९३३ ते ७५ या काळातील चित्रपटांची कलाकार, दिग्दर्शक व चित्रपटातील प्रसंगांची छायाचित्रे, चित्रपट, चित्रपटसृष्टीवर आधारित पुस्तके, मासिक, दिवाळी अंक, वर्तमानपत्रांची कात्रणे हा सगळा इतिहास येथे असणार आहे. शिवाय या सर्व दस्तऐवजांचे डिजीटा़यझेशन करण्यात येणार आहे. रसिकांच्या इच्छेनुसार त्यांची इच्छा असेल तो चित्रपट पाहण्याचीदेखील सोय येथे असेल.

मुलाखतीतून इतिहासाची मांडणी

जुन्या पिढीतील चित्रपट व्यावसायिक म्हणजे या क्षेत्राचा चालता बोलता इतिहास मानले जातात. नव्या पिढीला त्यांच्याकडून कोल्हापुरच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास कळावा यासाठी ज्येष्ठांच्या मुलाखती घेण्याचे काम सध्या सुरु आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, सुभाष भुर्के, त्यागराज पेंढारकर यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यापूर्वी माई पेंढारकर, चंद्रकांत मांडरे यांच्या मुलाखतीदेखील उपलब्ध आहेत.

भालजींचे स्वतंत्र दालन

संशोधन केंद्राचे काम सुरु असताना भालजी पेंढारकरांची सर्वाधीक माहिती मिळाली आहेत. कोल्हापूर सिनेटोन (जयप्रभा स्टुडिओ) हस्तांतरणाची कागदपत्रे, भालजींचे चित्रपट, चित्रपटांची प्रसंगांची छायाचित्रे, करारपत्रे, स्क्रीप्ट यांचे संकलन असलेले स्वतंत्र दालन येथे साकारण्यात येत आहे.

कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास कायमस्वरुपी जपला जावा, नव्या पिढीला कोल्हापुरने चित्रपटक्षेत्राला दिलेल्या सुवर्णकाळाची माहिती मिळावी या उद्देशाने संशोधन केंद्र सुरु करण्यात येत आहे. ज्या नागरिकांकडे ही माहिती किंवा छायाचित्रे उपलब्ध आहेत त्यांनी संस्थेशी संपर्क साधल्यास केंद्राच्या कामाला गती मिळेल.

श्रीकांत डिग्रजकर

कोल्हापूरला फार मोठी चित्रपट परंपरा लाभली आहे. त्याची जपणूक व नव्या पिढीला मार्गदर्शन मिळण्यासाठी चित्रपट संशोधन केंद्र मोलाचे सहाय्यभूत ठरणार आहे.

प्रा. कविता गगराणी

Web Title: Films Research Center, Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.