माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करा, हमाल पंचायतचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे
By इंदुमती सूर्यवंशी | Published: February 26, 2024 04:06 PM2024-02-26T16:06:04+5:302024-02-26T16:07:05+5:30
कोल्हापूर : माथाडी कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी करा, कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार असलेले विधेयक विनाविलंब मागे घ्या, गोंधळ निर्माण ...
कोल्हापूर : माथाडी कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी करा, कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार असलेले विधेयक विनाविलंब मागे घ्या, गोंधळ निर्माण करणारे पणन संचालकांचे परिपत्रक तात्काळ मागे घ्या, बाजार समित्यांचे केंद्रीकरण करणारे २०१८ सालचे विधेयक मागे घ्या अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदाेलन सुरु करण्यात आले. न्याय्य हक्कासाठी या कष्टकऱ्यांनी रस्त्यावर उतरून शासनाचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
माथाडी कामगारांच्या मागण्यांसाठी हमाल पंचायतचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव हे मुंबईत आंदाेलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरातील कामगारांनीदेखील बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यात जिल्ह्यातील २०० हून अधिक माथाडी कामगार सहभागी झाले. माथाडी कामगारांच्या पाल्यांना माथाडी मंडळात प्राधान्याने नोकरी द्या, गोदामातील माथाडी कामगारांची थकबाकी माथाडी मंडळात भरावे, महागाई निर्देशांकाची रक्कम गोदामातील माथाडी कामगारांना देण्यात यावी, माथाडी मंडळात नोकरभरती सुरु करून त्यात कामगारांच्या मुला-मुलींची प्राधान्याने भरती करावी, जिल्ह्यातील सर्व सिमेंट कंपन्यांच्या गोडावूनमध्ये कायद्याची अंमलबजावणी व्हावी,
माथाडी मंडळाकडे नोंद असणाऱ्या, हमालीची रक्कम न देणाऱ्या आस्थापनावर फौजदारी गुन्हे दाखल करा, विमा योजनेचा लाभ कामगारांना मिळावा अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी उपाध्यक्ष नाथा राजगे, सचिव कृष्णात चौगले, गाेरख लेडव, रुद्राप्पा तेली, नेताजी गोडसे, हबीब मुजावर, मोहिदहुसेन सय्यद, भिकाजी पाटील, जनार्दन येडगे, परमेश्वर काकडे, साताप्पा जाधव, अनिल बारड यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.