डॉक्टर दाम्पत्याचा रुकडीत निर्घृण खून

By admin | Published: August 10, 2016 01:00 AM2016-08-10T01:00:33+5:302016-08-10T01:07:21+5:30

कारण अस्पष्ट : चोरी की मालमत्तेचा वाद?; चाकू, लोखंडी गजाचा वापर

Doctor's handcuffed bloodless blood | डॉक्टर दाम्पत्याचा रुकडीत निर्घृण खून

डॉक्टर दाम्पत्याचा रुकडीत निर्घृण खून

Next

हातकणंगले : रुकडी (ता. हातकणंगले) येथील डॉ. उद्धव दत्तात्रय कुलकर्णी (वय ७0) आणि पत्नी डॉ. प्रज्ञा उद्धव कुलकर्णी (६५) या दोघांचा रविवारी मध्यरात्री पोटावर, छातीवर आणि गळ्यावर धारदार चाकूने सपासप वार करून आणि डोक्यात लोखंडी गजाने प्रहार करून निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता शेजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी हातकणंगले पोलिसांना या घटनेची माहिती दिली. डॉ. कुलकर्णी दाम्पत्याचा खून चोरीच्या उद्देशाने झाला की मालमत्तेच्या वादातून झाला, याबाबत कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत.
घटनास्थळी रुकडी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. हातकणंगले पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे घटनास्थळी ठाण मांडून होते. हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. उद्धव दत्तात्रय कुलकर्णी हे मूळचे बागणी (ता. वाळवा) येथील रहिवासी असून, गेली ५0 वर्षे ते रुकडी येथे स्थयिक झाले आहेत. रुकडी येथील ग्रामपंचायतीनजीक चावडी चौकात मराठी अभिनेत्री आशा पाटील यांच्या घरामध्ये त्यांनी प्रथम डॉक्टरकीचा व्यवसाय सुरू केला होता. तो आजपर्यंत चालू होता. रुकडीच्या सरकारी दवाखान्यासमोर त्यांनी जागा खरेदी करून आपले स्वत:चे अश्विनी क्लिनिक (दवाखाना) सुरू केले होते. त्याना पत्नी डॉ. प्रज्ञा यांची मोलाची साथ होती. मूलबाळ नसल्याने ते दोघेच रुकडी येथे राहत्या घरीच दवाखाना चालवित होते. गोरगरिबांचा डॉक्टर म्हणून त्यांची रुकडी परिसरात ख्याती होती. मंगळवारी सकाळी रुकडी गावातील शीतल खोत हे किरकोळऔषधोपचारासाठी त्यांच्या घरी गेले. त्यांनी घराची बेल वाजविली. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी शेजाऱ्यांकडे विचारणा केली. शेजाऱ्यांनी दोन दिवस लाईट चालू आहेत; पण कोणताही आवाज नाही. बाहेरगावी गेले असतील, अशी शक्यता वर्तविली. मात्र, घरातील आणि बाहेरील सर्व लाईट चालू असल्याने शीतल खोत व शेजाऱ्यांनी हातकणंगले पोलिसांना फोनवरून माहिती देऊन घटना सांगितली. हातकणंगले पोलिस आणि ग्रामस्थांनी घरामध्ये प्रवेश करताच सर्वांच्या अंगावर शहारे उभे राहिले. डॉ. उद्धव आणि डॉ. प्रज्ञा या दोघांचे मृतदेह रुग्ण तपासणीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मृतदेह पांढरे पडून त्यामधून दुर्गंधी पसरू लागली होती. तिजोरीतील सामानही विस्कटले होते.
डॉ. उद्धव यांच्या छातीवर, पोटावर धारधार चाकूचे पाच वार आहेत. तसेच त्यांच्या डोक्यावर पाठीमागील बाजूला लोखंडी गजाने प्रहार केल्यामुळे डोके फुटले होते. ते जमिनीवर पडलेल्या जागी रक्ताच्या थारोळे साचले होते. त्यांच्या धारधार शस्त्राने गळा चिरला होता. त्यांच्या डोक्यातही लोखंडी गजाने प्रहार केले होते. रुग्ण तपासणीची खोली रक्ताने माखली होती.
डॉ. उद्धव यांनी रविवारी दूध घेतल्याचे दूधवाल्याने सांगितले. धुणे आणि भांडी काम करणारी महिला रविवारी दुपारी सर्व काम आटोपून गेली होती. यामुळे रविवारी मध्यरात्री या दाम्पत्यावर हल्ला केला असावा, अशी घटनास्थळी चर्चा होती. डॉ. कुलकर्णी यांचे भाऊ योगेश कुलकर्णी हे मिरज येथे राहतात. माहिती मिळताच ते सहकुं टुंंब रुकडी येथे आले.
श्वान पथकाकडून माग नाही
या खुनाचा उलगडा करण्यासाठी कोल्हापूर येथून श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. मात्र, घराभोवतीच घुटमळत राहिले. घटना दोन दिवस अगोदर घडल्यामुळे श्वानाकडून कोणताही माग मिळाला नाही.
—-
परिसरात नागरिकांची गर्दी
खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी रुकडी, अतिग्रे, चोकाक , माणगाव परिसरात पसरली. परिसरातील नागरिकांनी डॉ. कुलकर्णी यांच्या घरासमोर गर्दी केली. गरिबांचा डॉक्टर गेल्याची चर्चा आणि अशा प्रकारे हत्या केल्याबद्दल हळहळ व्यक्त होत होती.
—-
पोलिस अधिकारी घटनास्थळी
डॉक्टर दाम्पत्याचा खून झाल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक (गडहिंग्लज) दिनेश बारी, जयसिंगपूरचे डी. वाय. एस. पी. रमेश सरवदे, जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा इचलकरंजी, कोल्हापूर आणि हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक सी. बी. भालके घटनास्थळी ठाण मांडून होते. दुपारी दोन वाजेपर्यत सर्व अधिकारी विविध अंगानी तपास करीत होते. मात्र, या खुनाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.



इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील जावडेकर चौकात राहणाऱ्या डॉ. प्रकाश वामन कुलकर्णी (वय ६२) आणि त्यांच्या पत्नी डॉ. सौ. अरुणा प्रकाश कुलकर्णी (वय ५८) या डॉक्टर दाम्पत्याचा त्यांच्याच धरित्री क्लिनिकच्या पहिल्या मजल्यावरील निवासस्थान गळे चिरून खून करण्यात आला होता. ही संतापजनक घटना शनिवार, १९ डिसेंबर २०१५ च्या रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती. नागरीवस्तीत डॉक्टर दाम्पत्याची निर्घृण हत्या झाल्यामुळे अवघे शहर हादरून गेले होते.
रुग्णांशी स्नेभाव जपणारे डॉक्टर दाम्पत्य म्हणून या प्रकाश व सौ. अरुणा कुलकर्णी यांची ओळख होती. हल्लेखोरांनी दोघांची धारदार शस्त्राने हत्या करणाऱ्या निर्दयीपणाचा कळस केला होता. डॉ. प्रकाश यांच्यावर २७ तर डॉ. सौ. अरुणा यांच्यावर १७ वार हल्लेखोरांनी केले होते. या घटनेवेळी हे दोघेच बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर होते. रात्रीचे जेवण करण्यापूवीच ही निर्घृण घटना घडली होती. हल्लेखोरांनी घरातील इतर कोणताही वस्तूला अथवा त्यांच्या अंगावरील दागिन्यांना हात लावला नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोरही तपासाच्या दृष्टीने मोठे आव्हान निर्माण झाले होते. खुनाचे नेमके कारण शेधताना पोलिसांचीही दमछाक झाली. त्यातूनही पोलिसांनी त्यांच्या रुग्णालयातील परिचारिका व इतर दोघांना अटक केली. मात्र परिचारिका व अन्य एक जण पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालामुळे मुक्त झाले आहेत. तिसरा संशयित अर्जुन रमेश पवार (रा. इस्लामपूर) हा न्यायालयीन कोठडीत आहे. (वार्ताहर)


रक्ताळलेल्या पायांचे ठसे घरभर
डॉ. उद्धव व त्यांच्या पत्नी प्रज्ञा यांचा खून चोरीच्या उद्देशाने केला असावा, असा संशय हातकणंगले पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोरीचा बनाव झाल्याचेही घटनास्थळावरून स्पष्ट होते. तिजोरीतील कपडे आणि इतर साहित्य विस्कटलेले होते. खून करून चोरटे तिजोरीकडे गेल्याचे रक्ताच्या डागांवरून दिसते. कारण चोरट्यांच्या रक्ताळलेल्या पायांचे ठसे संपूर्ण घरभर दिसत होते.

सुपारी देऊनखुनाची शक्यता
या दाम्पत्यांनी आपली मालमत्ता आणि घर आपल्या बहिणीचा मुलगा सोहन नंदकुमार वाळिंबे यांच्या नावे केले आहे. मालमत्ता भाच्याच्या नावे केल्यामुळे त्यांच्या मालमत्तेच्या वादातून सुपारी देऊन खून झाला असावा, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Doctor's handcuffed bloodless blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.