कोणताही व्यवसाय करताना लाजू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:53 AM2017-08-21T00:53:20+5:302017-08-21T00:53:23+5:30

Do not be shy at any business | कोणताही व्यवसाय करताना लाजू नका

कोणताही व्यवसाय करताना लाजू नका

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोणताही व्यवसाय छोटा अथवा मोठा नसतो; त्यामुळे व्यवसाय करताना लाजू नका, असे आवाहन दुबईतील अल अदिल ग्रुपचे अध्यक्ष, ‘मसाला किंग’ डॉ. धनंजय दातार यांनी रविवारी येथे केले.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती, तर महापौर हसिना फरास प्रमुख उपस्थित होत्या. येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये झंवर ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे संस्थापक, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांना ‘कोल्हापूर उद्योगरत्न’ पुरस्कार डॉ. दातार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मेनन ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे संस्थापक, ज्येष्ठ उद्योजक राम मेनन यांच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार उद्योजक विजय मेनन, सचिन मेनन यांनी स्वीकारला. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरणानंतर अमित हुक्केरीकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून डॉ. दातार यांनी आपल्या जीवनप्रवासातील विविध पैलू उलगडले. डॉ. दातार म्हणाले, मुंबईत असताना मला लहानपणापासून दुबईचे आकर्षण होते. याचे कारण की, माझ्या परिसरातील काही लोक दुबईला जाऊन आल्यानंतर त्यांचे राहणीमान नजरेत भरणारे होते. यावर मग, श्रीमंत होण्याचे माझे स्वप्न साकारण्यासाठी मी वयाच्या २० व्या वर्षी दुबई गाठली. भाषा, आर्थिक, आदी विविध स्वरूपांतील अडचणींवर मात करून आणि बुद्धीचा योग्य वापर करून व प्रामाणिकपणे कार्यरत राहून यशाचे शिखर गाठले. व्यवसाय करताना आपल्या स्पर्धकाबाबत ‘मार नाही, तर मर’ या वृत्तीने कार्यरत राहावे. रागावर नियंत्रण ठेवण्यासह जास्तीत जास्त नफा मिळविणे हे ध्येय ठेवून कार्यरत राहणे महत्त्वाचे ठरणार आहे. व्यवसाय सुरू करताना नवउद्योजकांनी भिऊ नये. सर्व धर्मांचा आदर करावा. ‘मी भारतीय’ हा दृष्टिकोन ठेवून काम करावे.
शाहू छत्रपती म्हणाले, विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘सॅटर्डे क्लब’चे चांगले काम सुरू आहे. मसाला तयार करण्यासाठी भारतातील कच्चा शेतमाल लागतो. त्यामुळे दातार यांनी शेतकरी वर्गाकडे लक्ष द्यावे.
ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर म्हणाले, माझा संपूर्ण परिवार माझ्या व्यवसायात आहे. एका कौटुंबिक वातावरणात आम्ही कार्यरत असल्याने आमचा व्यवसाय वाढला आहे. उद्योग क्षेत्रातील ‘टॅलेंट’ पुढे आणण्यासह नवउद्योजकांना बळ देण्याचे काम ‘सॅटर्डे क्लब’ करीत आहे. उद्योजक सचिन मेनन म्हणाले, उद्योगक्षेत्रात आजपर्यंत माझ्या वडिलांनी केलेल्या कामगिरीची पोहोचपावती या पुरस्कारातून मिळाली आहे. सॅटर्डे क्लबची संकल्पना तरुण उद्योजकांना उपयुक्त, मार्गदर्शक ठरणारी आहे. सॅटर्डे क्लबचे विश्वस्त अजित मराठे म्हणाले, ‘एकमेकां सा' करू, अवघे होऊ श्रीमंत’ या ब्रीदवाक्यानुसार क्लब कार्यरत आहे. महाराष्ट्रीय लोकांची मानसिकता बदलण्यासह नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्याचे काम क्लब करतो.
या कार्यक्रमास ‘क्रिडाई’चे अध्यक्ष महेश यादव, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, , वंदना दातार, दिशा पाटील, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, ‘मॅक’चे अध्यक्ष संजय जोशी, ‘गोशिमा’चे अध्यक्ष सूरजितसिंग पवार, ‘सीआयआय’चे योगेश कुलकर्णी,‘केईए’चे बाबासाहेब कोंडेकर,‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, अभय अवस्थी, शिरीष शुक्ल, अवधूत चिकोडी, कैलाश
मेढे, नरेंद्र बगाडे, लुमाकांत नलवडे, आदी उपस्थित होते. ‘सॅटर्डे क्लब’चे अध्यक्ष हर्षवर्धन भुर्के यांनी प्रास्ताविक केले. शुभदा पवार यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकृष्ण पाटील यांनी आभार मानले.
आईने दिलेले बक्षीस सर्वांत मोठे
आईच्या मंगळसुत्रासह सर्व दागिने गहाण ठेवून मिळालेल्या पैशांतून दुबईत छोटे दुकान सुरू केले. याचवर्षी इराण-कुवेत युद्ध झाले. युद्ध सुरू झाल्याने व्यवसाय कसा चालणार याचे मला टेन्शन आले. मात्र, युद्धस्थितीमुळे दुबईतील अनेकांनी अन्नधान्याचा साठा करणे सुरू केले. त्यामुळे माझ्या मालाची चौपट दराने विक्री झाली. त्यामुळे मला चांगला नफा मिळाला. त्यातून आईचे सर्व दागिने घेऊन साडेतीन वर्षांनंतर मी भारतात आलो. ते आईला परत दिल्यानंतर तिने माझ्या गालावर जो हात फिरविला, तो मायेचा स्पर्श माझे आजपर्यंतच्या आयुष्यातील सर्वांत मोठे बक्षीस असल्याचे डॉ. दातार यांनी यावेळी सांगितले.
आजारपण ठरला ‘टर्निंग पॉर्इंट’
आजारपण हे आयुष्यातील ‘टर्निंग पॉर्इंट’ ठरल्याबाबत डॉ. दातार यांनी सांगितले की, व्यवसाय वाढवला, मात्र, स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. त्यातून मला पित्ताचा त्रास सुरू झाला. विविध उपचार, उपाय करूनदेखील संबंधित त्रास कमी होत नव्हता.आजारपणात पाच वर्षे गेली. तब्येत सुधारल्यानंतर पूर्णपणे जीवनशैली बदलली. मिळविलेल्या पैशांतून मनमुराद आयुष्य जगण्याचे ठरविले.
डॉ. दातार म्हणाले...
जग जिंकण्याची जिद्द स्वत:मध्ये निर्माण करा. नकारात्मक विचार दूर ठेवा.
शिक्षण कमी असले, तरी बुद्धीच्या जोरावर व्यवसायात यश मिळवा.
व्यवसाय म्हटले की, समस्या येणारच. त्यातील पाच ते सात टक्के समस्या सुटतात. काही ठिकाणी बाजू काढून पुढे जायचे असते.
ग्राहकाला समाधानी ठेवा, कोणतेही काम करा पण त्याला मान असावा

Web Title: Do not be shy at any business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.