व्हॉट्स अ‍ॅपद्वारे फसवणूक करणाऱ्या दिल्लीच्या टोळीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:47 PM2018-08-03T12:47:47+5:302018-08-03T12:51:13+5:30

व्हॉट्स अ‍ॅपद्वारे बक्षीस लागल्याचे सांगून शिक्षिकेला ५ लाख २९ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील सराईत टोळीचा छडा लावण्यात येथील शाहूपुरी पोलिसांना गुरुवारी यश आले.

The Delhi gang is cheated by the Whatsapp app | व्हॉट्स अ‍ॅपद्वारे फसवणूक करणाऱ्या दिल्लीच्या टोळीचा छडा

व्हॉट्स अ‍ॅपद्वारे फसवणूक करणाऱ्या दिल्लीच्या टोळीचा छडा

Next
ठळक मुद्देव्हॉट्स अ‍ॅपद्वारे फसवणूक करणाऱ्या दिल्लीच्या टोळीचा छडामहिला आरोपीस अटक : शाहूपुरी पोलिसांची तत्परता

कोल्हापूर : व्हॉट्स अ‍ॅपद्वारे बक्षीस लागल्याचे सांगून शिक्षिकेला ५ लाख २९ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील सराईत टोळीचा छडा लावण्यात येथील शाहूपुरी पोलिसांना गुरुवारी यश आले.

या प्रकरणी या टोळीतील महिला आरोपी लक्ष्मी छबीलाल गुरुंग (वय ४२, रा. डब्ल्यू गरीब वस्ती, रामा रोड, मोतीनगर, दिल्ली) हिला अटक करण्यात आली असून, तिला दिल्ली पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

तिला १२ आॅगस्टअखेर पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सायबर क्राइममध्ये अशा गुन्ह्यास ‘फिशिंग’ असे म्हटले जाते. अशा गुन्ह्यात आरोपी हे वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळी बनावट अकाऊंट व बनावट सिमकार्डस वापरत असल्याने गुन्ह्यांची उकल होणे अवघड असते; परंतु पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या कुशलतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे.

या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांत ४१३/२०१८ अन्वये भा.दं.वि.सं. कलम ४२०, ४१९ व ४०६, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ७७ (ड) हा गुन्हा २७ जुलैला दाखल झाला आहे. या फसवणुकीनंतर संबंधित शिक्षिकेस चांगलाच मानसिक धक्का बसल्याने पोलिसांनी त्यांचे नाव उघड केलेले नाही.

आपला मोबाईल नंबर लकी असून, तुम्हाला ज्वेलरी, मोबाईल, लॅपटॉप आणि ब्रिटिश पाउंड असे बक्षीस लागले आहे. तुम्ही बॅँकेच्या खात्यावर पैसे भरा, असे आमिष दाखवून या शिक्षिकेला गंडा घातला. अज्ञात भामट्यावर शाहूपुरी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

बक्षीस लागल्याच्या आनंदात संबंधित शिक्षिकेने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तो सांगेल त्याप्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यांवर ही रक्कम भरली. पैसे भरल्यानंतर संबंधित व्यक्ती फोन घेण्यास टाळाटाळ करू लागली. त्यानंतर त्याच्या दोन्ही मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद ठेवण्यात आल्याचे कंपनीकडून सांगितले जाऊ लागले. म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक मोरे यांनी तपासाची सूत्रे आपल्या हातात घेतली व विनाविलंब संबंधित बँकांशी पत्रव्यवहार करून लाभार्थींची खाती गोठविण्यास सांगितले.

ज्या खात्यावर पैसे भरण्यास सांगितले होते, त्या बँकेच्या शाखा ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात, त्या पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून या खात्यावरील व्यक्ती व्यवहार करण्यास आल्यावर ताब्यात घेण्यास सांगितले.

त्यानुसार ३१ जुलैला संशयित लक्ष्मी गुरुंग ही महिला आरोपी दिल्लीतील मोतीनगर भागातील कॅनरा बँकेच्या शाखेत लाभार्थी खात्यातील पैसे काढण्यासाठी आली. पूर्वसूचना असल्याने बँकेच्या व्यवस्थापकांनी स्थानिक कीर्तिनगर पोलीस ठाण्यास व शाहूपुरी पोलीस ठाण्यासही त्याबाबत कळविले. त्या अनुषंगाने आवश्यक ती कागदपत्रे तयार करून व न्यायालयाची परवानगी घेऊन शाहूपुरीचे पोलीस पथक रवाना झाले.

कीर्तिनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नागेश्वर नाईक यांनी त्या महिलेस अटक केली व तिथे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्या महिलेचा ताबा कोल्हापूर पोलिसांना दिला. शाहूपुरी पोलिसांनी तिला अटक करून येथील न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली.

देशव्यापी जाळे..

सोशल मीडियाचा वापर करून विविध आमिषे दाखवून किंवा बँकेतील अकौटंटला जोडलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी विचारून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती देशभर असल्याचे चौकशीत स्पष्ट होत आहे. त्यामुळे तपासासाठी विविध राज्यांत पथके रवाना करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

आणखी गुन्ह्याची शक्यता...

फसवणूक प्रकरणी दिल्ली येथील संशयित लक्ष्मी गुरुंग हिच्यावर दिल्ली येथेही अशाच प्रकारे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तिच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

 

Web Title: The Delhi gang is cheated by the Whatsapp app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.