मध्यरात्रीपर्यंत रंगला जल्लोष...

By admin | Published: January 1, 2017 12:40 AM2017-01-01T00:40:48+5:302017-01-01T00:40:48+5:30

‘शांतता दौड’ आज : रंकाळा प्रदक्षिणा, काव्यवाचन, दुग्धपान

Dangled till midnight ... | मध्यरात्रीपर्यंत रंगला जल्लोष...

मध्यरात्रीपर्यंत रंगला जल्लोष...

Next

कोल्हापूर : डी.जे.च्या ठेक्यावरील बेधुंद नृत्य, गप्पांमध्ये रंगलेल्या पंगती, फटाक्यांची आतषबाजी अशा जल्लोषी वातावरणात सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचा स्वागत सोहळा मध्यरात्रीपर्यंत रंगला. शनिवारी रात्री आठ वाजल्यापासूनच अनेकांनी उद्याने, पंचगंगा घाटासह हॉटेल्समध्ये ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी, कुटुंबीयांसमवेत गर्दी केली होती. नववर्षाच्या स्वागतासाठी आज, रविवारी शांतता दौड, रंकाळा प्रदक्षिणा असे विविध विधायक उपक्रम होणार आहेत.
यावर्षीचा ‘थर्टी फर्स्ट’ वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी अनेकांनी आठवड्यापासूनच नियोजन केले होते. ग्रुप पार्ट्या, कौटुंबिक भोजन, मेजवान्यांची रंगत शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पंचगंगा घाट, राजाराम बंधारा, कळंबा तलावाचा परिसर, टेंबलाई टेकडी, रंकाळा उद्यान, पद्माराजे उद्यान, नाळे कॉलनी उद्यान, आदी ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. रात्री आठ वाजल्यापासून मित्रमंडळी, कुटुंबीय हे गटागटाने बगीच्यासह मेजवानीच्या ठिकाणी जमले. येथे संगीताची साथ, हसत-खेळत, नृत्य आणि विनोदाच्या संगतीने रात्री उशिरापर्यंत थर्टी फर्स्टची पार्टी रंगली. शहरातील काही ग्रुपच्या वतीने थर्टी फर्स्टचे नियोजन केले होते. त्यांनी आकर्षक विद्युत रोषणाईसह डीजे, विविध देशी-विदेशी खाद्यपदार्थांची सोय केली होती, तर काहींनी घरीच मित्रमैत्रिणींना बोलावून गच्चीवर नववर्षाचे स्वागत करण्यास प्राधान्य दिले. नववर्षाचे विधायक पद्धतीने स्वागत करण्यासाठी आज, रविवारी वाय. एम. सी. ए. व सिटीझन फोरमतर्फे सकाळी सात वाजता न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्च ते स्टेशन रोड, घोरपडे गल्ली, बसंत-बहार रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, आदित्य कॉर्नर, सासने मैदान या मार्गावरून ‘शांतता दौडी’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता रंकाळा टॉवर येथे शारदा आर्टस्चे चित्रकार सुनील पंडित यांचे ‘व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक’ होणार आहे. (प्रतिनिधी)


नववर्षाच्या पूर्वसंध्येला असेही उपक्रम
शनिवारी पहाटे रंकाळाप्रेमी धोंडिराम चोपडे यांनी आरोग्य जपण्याचा संदेश देत रंकाळा प्रदक्षिणा घातली. त्यांनी २२.५ किलोमीटर चालत रंकाळा तलावास पाच फेऱ्या मारल्या. यावेळी त्यांना डॉ. अमर आडके, एम. पी. शिंदे, अजित मोरे, नाना गवळी, डॉ. विश्वनाथ भोसले यांची साथ मिळाली.
शहरात सायंकाळी काव्यवाचन, दुग्धपान असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. ‘अक्षरदालन’ आणि ‘निर्धार’ यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमात जिल्ह्यातील नामवंत कवी, कवयित्रींनी काव्यवाचन केले.
गंगावेश येथील शाहू उद्यानात हास्य क्लब व योगा क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात नगरसेवक शेखर कुसाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. अनेकजण अक्कलकोट, शिर्डी येथे रवाना झाले.
पोलिसांचा रस्त्यावर रात्रभर खडा पहारा
शिवाजी पूल, तावडे हॉटेल, कावळा नाका, कसबा-बावडा, दसरा चौक, कळंबा नाका, वाशी नाका, सायबर चौक, उमा टॉकीज, गंगावेश, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, माउलीचा पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, येथे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी पोलिस करीत होते. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्यासह तीन हजार पोलिस जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. पन्हाळा, आंबोली, विशाळगड, गगनबावडा या पर्यटनस्थळांवरही पोलिस कसून तपासणी करीत होते.

Web Title: Dangled till midnight ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.