‘दान पावलं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:40 PM2019-05-12T23:40:07+5:302019-05-12T23:40:12+5:30

इंद्रजित देशमुख माउलींनी सांगितलेल्या दैवी गुणांमधील दान हा गुण अंगी असणं हे खूप मोठ्या सामर्थ्याचं लक्षण आहे. कारण दान ...

'Dan Paaval' | ‘दान पावलं’

‘दान पावलं’

googlenewsNext

इंद्रजित देशमुख
माउलींनी सांगितलेल्या दैवी गुणांमधील दान हा गुण अंगी असणं हे खूप मोठ्या सामर्थ्याचं लक्षण आहे. कारण दान करायला अंत:करण खूप विशाल असावं लागतं. अंत:करणाने संकुचित असले की दान करता येत नाही. म्हणजेच अंत:करणाच्या विशालपणाचे मूळ दान या सहसंवेदी व सहजीवी भाविकतेत लपलेलं आहे. या दातृत्वदर्शी भूमिकेतील कायिक योगदानाचा स्वभाव व्यक्त करताना आमचे तुकोबाराय म्हणतात की,
‘जे का रंजले गांजले।
त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा।
देव तेथेचि जाणावा।।’
तुकोबारायांनी या अभंगातून व्यक्त केलेल्या या आपले म्हणण्याच्या स्नेहापाठीमागे स्वत:च्या सगळ्या आवेश आणि अभिनिवेष यांना बाजूला सारून निव्वळ आणि निव्वळ दुसऱ्यासाठी योगदानाचं समर्पण करणं अपेक्षित आहे. या समर्पणाद्वारे ज्याने सगळ्यांना आपलं संबोधलं आहे तोच खरा साधू किंवा तोच खरा देव असतो असं महाराजांना म्हणायचं आहे. या आपले म्हणण्यातील प्रामाणिकतेसाठी कोणत्याच साधनाची किंवा संपन्नतेची गरज असत नाही, गरज असते ती फक्त अंगीभूत स्नेहाची आणि त्या स्नेहाच्या पाझरण्याची.
औरंगजेबाचा दाराशुको नावाचा एक भाऊ होता. तो खूप मोठा दाता होता. दारात आलेल्या प्रत्येक याचकाचं तो फुल ना फुलाची पाकळी देऊन समाधान करीत होता. ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे
‘जेथे संपत्ती आणि दया।
दोन्ही वस्ती आली एकचि ठाया।
तेथे जाण धनंजया।
विभूती माझी’
असं त्यांचं जगणं होतं. आपल्याजवळ नुसती संपत्ती असून उपयोगाचं नाही तर त्या संपत्तीबरोबर दयाही असली पाहिजे आणि त्या संपत्तीचं विनियोजन करताना दयाभूत अंत:करणाने त्यातील काही भाग गरज असणाºया याचकांना दान दिला पाहिजे तरच त्या संपत्तीच्या धारकतेत खरं समाधान नांदू शकतं, अन्यथा नाही असं त्याचं मत होतं. या विचारावर आणि त्याच विचारानुसार आचारावर ठाम असलेल्या दाराशुकोनं सगळ्यांचं भलं चिंतन्यासाठी कधीच कुठल्याच याचकाला आपल्या दारातून मोकळ्या हातानं परत पाठविलं नव्हतं. पण, सत्तापिपासूवृत्तीने भारावलेल्या अनाठायी राजकीय महत्त्वाकांक्षेत सरळमार्गी दाराशुकोला कैदेत जावं लागलं आणि त्यातून त्याला देहदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली. देहदंडाची शिक्षा देण्यासाठी त्याला वधस्तंभाकडे नेलं जात असताना सभोवताली प्रचंड गर्दी आसवे ढाळीत उभी होती. कारण आजवर त्या जनतेने बादशाही साम्राज्यवादाला चिकटून निव्वळ सत्ता आणि सत्ताविस्तार करणारे खूप बादशहा पाहिले होते; पण आपल्या जनतेच्या पायवाटी स्वत:चं हृदय अंथरूण जनतेच्या जीवनवाटेवर सुख पसरू पाहणारा दाराशुकोसारखा अनोखा राजा पाहिला नव्हता. भारतीय विशाल तत्त्वज्ञान आणि त्याच्या उपांगांचा सखोल अभ्यास असणारा दाराशुको मरण आणि मरणाची भीती याबद्दल कधीच बेदखल होऊन आत्मरंगात रंगून गेला होता. आता जगावं असं अजिबात वाटत होतं, पण जगलो असतो म्हणजेच हा देह हयात राहिला असता तर या देहाच्या माध्यमातून अजूनही खूप काही दान करता आलं असतं याचं शल्य मात्र त्याच्या चेहºयावर जाणवत होतं. इतक्यात त्या प्रचंड गर्दीतून कुणीतरी ओरडलं की, ‘ऐ दारा तू सारी उम्र देते आया और आज फकीर बन गया। बोलो आज क्या दोगे हमारे लिये?’ त्या गर्दीतून आलेला तो आवाज ऐकून दाराशुको थोडं थबकला. त्यावेळी कुणाला काही द्यावं असं त्याच्याकडे अजिबात काही नव्हतं. दिला तर देता येईल असा फक्त देह त्याच्याजवळ होता; मात्र तोही या राजसत्तेने देहदंडासाठी ताब्यात घेतला होता. हे सगळं विचित्र वातावरण असताना रक्तात भिनलेली दानत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जोपासू पाहणाºया दाराशुकोने स्वत:च्या कमरेवर असणारे एकमेव कटीवस्त्र काढलं आणि त्या आवाजाच्या दिशेनं भिरकावलं आणि सांगितलं ‘ये लो मै ये भी दे सकता हूँ!’
दाराशुकोची आभाळाला खाली झुकायला लावणारी आणि सागराला मर्यादेची सीमा आणि खोली दाखवू पाहणारी ही असीम दानत पाहून समोर उपस्थित प्रचंड जमावाच्या अंगावर स्तब्धतेचा एकच रोमांच उभा राहिला आणि जनता दाराशुकोचा जयजयकार करू लागली. सत्तेसाठी धडपडून मेलेल्यांना इतिहास ज्या आदराने जोपासत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने इतिहास अशा दानशूरांना आजवर पूजत आहे. त्याचं एकच कारण आहे की, त्यांनी त्यांच्या काळात जे योगदान दिलंय ते दान सर्वकालीन अमूल्य दान आहे. कारण त्यांनी दिलेल्या तत्कालीन योगदानाची तुलना आजच्या कशाशीच होऊ शकत नाही. या सगळ्यांची दानत पाहून आम्हीही थोड्या अधिक प्रमाणात योगदान देण्याचा प्रयत्न करावा असं वाटायला हवं. कधीतरी कुणाला तरी दान देण्याच्या हेतूने आमचे हात पुढे करायला शिकलं पाहिजे. इतरांकडून घेत राहिलो तर फक्तसुखी होऊ आणि इतरांना देत राहिलो तर समाधानी होऊ, अपेक्षा आहे सगळेचजण आपल्याला जमेल अशा ज्या-त्या क्षेत्रात जमेल तितके योगदान देऊया आणि खूप खूप समाधानी होऊया.
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)

Web Title: 'Dan Paaval'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.