स्वाभिमानीचे काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान

By admin | Published: August 26, 2016 10:22 PM2016-08-26T22:22:04+5:302016-08-26T23:34:15+5:30

भाजपला उमेदवार शोधावे लागणार : शिवसेनेचा कस लागणार, विधानसभेची पुन्हा रंगीत तालीम _ जिल्हा परिषदेचे

Challenge of self-respecting Congress-NCP | स्वाभिमानीचे काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान

स्वाभिमानीचे काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान

Next

पडघमसंदीप बावचे --जयसिंगपूर --जिल्हा परिषदेच्या सत्तेत पाच सदस्यांच्या बळावर बांधकाम सभापतिपद मिळविलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिरोळ तालुक्यातील मतदारसंघात पकड निर्माण केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा कस लागणार असून, भाजपला उमेदवार शोधावे लागणार आहेत. उमेदवार निवडताना आणि सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षातील नेत्यांची दमछाक उडणार आहे.
शिरोळ तालुक्यात आठ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. यामध्ये दानोळी, नांदणी, उदगाव, आलास, शिरोळ, यड्राव, टाकळी व अब्दुललाटचा समावेश आहे. तर त्याअंतर्गत पंचायत समितीचे सोळा मतदारसंघ येतात. गत २०१२च्या निवडणुकीत शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी असा सामना झाला होता. या निवडणुकीत स्वाभिमानीने आठपैकी पाच जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या होत्या. दोन काँग्रेसला तर एक राष्ट्रवादीला जागा मिळाली. तर पंचायत समितीच्या सोळा जागापैकी आठ जागा स्वाभिमानी, सहा जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील उमेदवारांची नावे अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत निश्चित नव्हती. अखेरच्या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढविण्याची वेळ आली.
पंचायत समितीवर पहिल्यांदाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने झेंडा फडकाविला. यानुसार पक्षाने सदस्यांना सोयीनुसार सभापतिपद देऊन मर्जी राखली आहे. पक्षातील बहुमत ठेवण्यासाठी अपक्षांची मदत घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुका पंचायत समितीत स्वाभिमानीची सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेससोबत स्वाभिमानीची आघाडी आहे. पाच सदस्यांचा पाठिंबा देऊन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापतिपद स्वाभिमानीने काबीज केले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून स्वाभिमानी वगळता सर्व पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते एकत्र आले होते. निवडणुकीत शिवसेनेचे उल्हास पाटील यांना बहुजनांचा आमदार करण्यात या आघाडीतील नेतेमंडळींचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. मात्र, शिरोळ तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत अंतर्गत गटबाजीमुळे विधान परिषद, गोकुळ दूध संघ, केडीसीसी बँक, जयसिंगपूर बाजार समिती, ग्रामपंचायत, गावपातळीवरील सेवा संस्था निवडणूक या भोवती स्थानिक कार्यकर्ते विरोधासाठी विरोध ही भूमिका घेताना दिसून आले होते.
सर्वच पक्षातील पक्षनिरीक्षकांकडून तालुक्यातील राजकीय घडामोडींचा अंदाज घेतला जात आहे. तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार म्हणून उल्हास पाटील यांनी करिश्मा घडविला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार पाटील यांचा कस लागणार आहे. भाजपची वाटचाल अजूनही तालुक्यात गतिमान झालेली दिसून येत नाही. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच पक्षीय पातळीवर या निवडणुका होतील, असे संकेत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी पक्षातील सदस्य सध्या जिल्हा परिषद पदावर आहेत. यामध्ये समावेश होण्यासाठी शिवसेनेला प्रयत्नांची पराकाष्टा येणाऱ्या निवडणुकीत करावी लागणार आहे.


पक्षांचे नेतृत्व : शिवसेना म्हणून आमदार उल्हास पाटील यांच्याकडे नेतृत्व आहे. काँग्रेसकडून गणपतराव पाटील, अनिल यादव, राष्ट्रवादीकडून डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. अशोकराव माने तर भाजपकडून डॉ. संजय पाटील नेतृत्व करण्याचे संकेत आहेत. निवडणुकीत शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीचा देखील समावेश नाकारता येत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सावकार मादनाईक पुढे येणार असून, यावरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची व्यूहरचना ठरणार आहे.


इच्छुक कामाला लागले
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तालुक्यातील आठ मतदारसंघांची पुनर्ररचना होणार आहे. यामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद गावाच्या गृहरचनेप्रमाणे गट तयार करण्यात येणार आहेत. शिरोळ येथे नगरपालिका स्थापन होणार की नाही याबाबत सध्या संभ्रमावस्था बनली आहे. शिरोळ मतदारसंघातील गावे अन्य मतदारसंघांना जोडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या परिस्थितीचा आढावा घेवून विविध पक्षाचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.
जिल्हा परिषद सदस्य, कंसात पक्ष
दानोळी - सुरेश कांबळे (स्वाभिमानी), नांदणी - नीता परीट (स्वाभिमानी), उदगाव - सावकार मादनाईक (स्वाभिमानी), आलास - सुनंदा दानोळे (स्वाभिमानी), सैनिक टाकळी - सीमा पाटील (स्वाभिमानी), शिरोळ - इंद्रायणी माने-पाटील (राष्ट्रवादी), यड्राव - विकास कांबळे (काँग्रेस), अब्दुललाट - दादासाहेब सांगावे (काँग्रेस).


पंचायत समिती सदस्य, कंसात पक्ष
नांदणी - युनुस पटेल (स्वाभिमानी), अब्दुललाट - अश्विनी कांबळे (अपक्ष), दानोळी - सर्जेराव शिंदे (काँग्रेस), कोथळी - अनंतमती पाटील (स्वाभिमानी), चिपरी - शामला भोसले (राष्ट्रवादी), उदगाव - बाबूराव पाटील (राष्ट्रवादी), अर्जुनवाड - वसंत हजारे (स्वाभिमानी), आलास - कमरोद्दीन पटेल (स्वाभिमानी), गणेशवाडी - वैशाली देवताळे (स्वाभिमानी), शिरोळ पश्चिम - दरगू गावडे (काँग्रेस), शिरोळ पूर्व - अनिता माने (स्वाभिमानी), यड्राव - मंगल कांबळे (काँग्रेस), शिरढोण - शीला पाटील (स्वाभिमानी), घोसरवाड - विजित शिंदे (राष्ट्रवादी), हेरवाड - सुवर्णा अपराज (स्वाभिमानी), सैनिक टाकळी - सुशील कांबळे (अपक्ष).

Web Title: Challenge of self-respecting Congress-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.