मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी होईल : डॉ. अतुल जोगळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:17 AM2017-12-29T00:17:09+5:302017-12-29T00:19:47+5:30

 Cataract-free Maharashtra campaign will be successful: Dr. Atul Joglekar | मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी होईल : डॉ. अतुल जोगळेकर

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी होईल : डॉ. अतुल जोगळेकर

googlenewsNext

राज्यातील १७ लाख नागरिकांवर शस्त्रक्रिया होणार

शिक्षणाचा अभाव, स्वच्छतेसाठी नसलेला आग्रह, डॉक्टरांकडे जाण्याऐवजी स्वत: प्रयोग करण्याचा स्वभाव, यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. आरोग्याबाबत आपली अनास्था जगजाहीर आहे. दुखणे टोकाचे होईपर्यंत त्याकडे लक्ष न देणे हा आपला स्वभाव असल्याने नेत्रोपचार हा त्यामानाने किरकोळ समजला जातो. मात्र, या परिस्थितीत आता बदल व्हायला लागला आहे. दृष्टी कमी होण्याचे अनेक तोटे लक्षात येत असल्याने नागरिकही सजग होत आहेत. महाराष्ट्र शासनाने ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ हे अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. अतुल जोगळेकर यांच्याशी हा थेट संवाद.

प्रश्न : नेत्रोपचारांबाबत आपल्याकडे किती जागरुकता आहे?
उत्तर : प्रगतिशील देशांच्या नागरिकांच्या तुलनेत आपल्याकडे एकूणच आरोग्याच्या दक्षतेबाबत हवी तितकी जागरुकता नाही. नेत्रोपचाराबाबत फारशी वेगळी अवस्था नाही. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांत या मानसिकतेत फरक पडत चालला आहे. दृष्टी कमी झाली तर त्याचे तोटे किती मोठे आहेत, याची जाणीव आता नागरिकांना होत आहे. त्यामुळे ही जागरुकता येण्यास चांगली सुरुवात झाली आहे.
प्रश्न : नेत्रोपचार दवाखान्यांचे पुरेसे प्रमाण आहे का ?
उत्तर : अजूनही तालुका पातळीवर नेत्रोपचाराबाबत आधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असे दवाखाने नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हळू-हळू तसे दवाखाने होत आहेत. मात्र, अजूनही तीन तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणीच असे दवाखाने आहेत. शासकीय दवाखान्यांमध्येही या सोयी आहेत. मात्र, त्यात अजूनही सुधारणेला वाव आहे.

प्रश्न : नेत्रोपचारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका कितपत आहे?
उत्तर : आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक बाबी शक्य झाल्या आहेत. डोळ्यांचा तिरळेपणा घालविणे, कमी करणे आता शक्य झाले आहे. अगदी चष्म्याचा नंबर घालविण्यापासून ते डोेळ्यांच्या पडद्यांच्या आजारांपर्यंत सर्व उपचार आता शक्य झाले आहेत. संरक्षण दलामध्ये जाणाºया युवक-युवतींना अनेकवेळा किरकोळ नंबर असतो. त्यामुळे चष्मा लागतो. परिणामी, त्यांचे करिअर पणाला लागते. अशावेळी त्यांच्या बुबुळाचे आकारमान लेसरद्वारे बदलून त्यांचा चष्माही घालविता येतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्येही फायदा होतो. आता स्वत:च्या सादरीकरणाला मोठे महत्त्व आल्याने त्यादृष्टीनेही नेत्रोपचार करता येणे शक्य झाले आहे.

प्रश्न : मोतीबिंदू होणे म्हणजे नेमकी काय प्रक्रिया आहे?
उत्तर : आपल्या डोळ्यांमध्ये नैसर्गिक लेन्स असतात. वयोमानानुसार ही पारदर्शक असणारी लेन्स अपारदर्शक होत जाते. परिणामी, दृष्टी कमी होते. याला आपण आपल्या भाषेत ‘मोतीबिंदू पिकणं’ असं म्हणतो. पूर्वी वयाच्या साठीनंतर अशा प्रकारचे रुग्ण सर्रास आढळायचे. मात्र, आता वयाच्या चाळीशीनंतर मोतीबिंदू अपारदर्शक होण्यास सुरुवात होते.

प्रश्न : इतक्या कमी वयामध्ये या लेन्स अपारदर्शक होण्याचे कारण काय?
उत्तर : बदललेली जीवनशैली, बदललेला आहार. आपण विषुवृत्तीय प्रदेशामध्ये राहत असल्याने येथे असणारा तीव्र प्रकाश, अल्ट्रा व्हायलेट किरणांचा होणारा परिणाम, अशा कारणांमुळे आता वयाच्या चाळीशीपासूनचे रुग्ण दृष्टी कमी झाल्याने आमच्याकडे येतात.

प्रश्न : मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया कशा केल्या जातात?
उत्तर : दोन प्रकारे या शस्त्रक्रिया केल्या जातात. एक म्हणजे साधी शस्त्रक्रिया. त्यामध्ये बुबळाचा ८ मिलीमीटरचा छेद घेतला जातो आणि मोतीबिंदू काढला जातो आणि तिथे कृत्रिम लेन्स बसविली जाते. अशाप्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पूर्वीप्रमाणे दिसण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी जातो. दुसरी पद्धत आहे ती फेको पद्धत. त्यामध्ये अल्ट्रासॉनिक पॉवर वापरून अडीच ते तीन मिलीमीटरचा बुबळावर छेद घेऊन मोतीबिंदूचे आत छोटे तुकडे करून ते बाहेर काढले जातात. यामध्ये रुग्ण सात दिवसांत पूर्ववत पाहू शकतो. साध्या शस्त्रक्रियेपेक्षा ही शस्त्रक्रिया थोडीशी महाग आहे.

प्रश्न : ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ हे अभियान शासनाने का सुरू केले असे वाटते?
उत्तर : सध्या महाराष्ट्रामध्ये मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील, असे १७ लाख नागरिक आहेत. हे प्रमाण याही पुढे वाढतच जाणार आहे. शासकीय यंत्रणा, धर्मादाय दवाखाने, खासगी डॉक्टर, विविध राजकीय पक्ष, संघटना, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत गेली काही वर्षे सातत्याने अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचे काम सुरू असूनही एवढ्या मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. हा ताण याहीपुढे वाढतच जाणार आहे. त्यामुळेच एका विशेष अभियानाद्वारे या सर्व नागरिकांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी एक अभियान म्हणून ही मोहीम सुरू केली आहे.

प्रश्न : या अभियानाबाबत तुमचे मत काय?
उत्तर : शासनाने या अभियानासाठी या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करून ठेवलेले डॉ. तात्याराव लहाने यांना प्रमुख नेमले आहे. त्यांच्याशी मी बोललोही आहे. महाराष्ट्रातील सर्व नेत्रोपचारतज्ज्ञांना सोबत घेऊन हे मोठे काम करण्याचे त्यांचे नियोजन आहे. आम्हीही सर्वजण या कामासाठी तयार आहोत. त्यामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य असून त्यामध्ये योगदान देण्यास आम्ही बांधील आहोत.
- समीर देशपांडे

Web Title:  Cataract-free Maharashtra campaign will be successful: Dr. Atul Joglekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.