७३ टोळ्यांतील ४७९ गुंडांवर ‘मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:32 AM2018-05-14T00:32:38+5:302018-05-14T00:32:38+5:30

73 gangs of 'Mokka' | ७३ टोळ्यांतील ४७९ गुंडांवर ‘मोक्का’

७३ टोळ्यांतील ४७९ गुंडांवर ‘मोक्का’

googlenewsNext

एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संघटित गुन्हेगारी टोळ्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीणमध्ये ७३ टोळ्यांतील ४७९ गुन्हेगारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील आणखी दोन सराईत टोळ्यांवर लवकरच ‘मोक्का’ कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
परिक्षेत्रात खून, घरफोड्या, लूटमारीसारख्या घटना वाढत आहेत. गुन्हेगारांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडून जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. या उपद्व्यापी गुन्हेगारी टोळ्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी ‘मोक्का कारवाई’ हा पोलिसांकडे शेवटचा पर्याय आहे. कोल्हापुरात सुरुवातीस माजी महापौर शिवाजी कवाळे यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झाली. त्यानंतर अवधूत माळवी खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार संजय वास्कर, सार्वजनिक उत्सव व निवडणुकीमध्ये उपद्व्याप करणारे गुंड शशिकांत गायकवाड, ‘एस.टी.’ गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार, पेठवडगाव येथील राज ऊर्फ राजवर्धन पाटील यांच्यासह दहा गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झाली.
जिल्हावार टोळीप्रमुख
(कंसात पोलीस ठाणे)
कोल्हापूर : अमोल अशोक माळी, सनी ऊर्फ संतोष आनंदा बगाडे, प्रवीण दत्तात्रय रावळ, किशोर सुरेश जैद ऊर्फ जिंदाल, शाम रंगराव लाखे (शहापूर), राजवर्धन बाबासो पाटील (वडगाव), अविनाश शेखर जाधव ऊर्फ जर्मनी, गुंड्या ऊर्फ मुसा अब्दुलरजाक जमादार (शिवाजीनगर-इचलकरंजी), अमोल ऊर्फ आर्याभाई संभाजी माहिते (कागल), अजय अविनाश माने ऊर्फ आज्या लातूर (राजारामपुरी).
सांगली : प्रशांत नागाप्पा पवार, सचिन रमाकांत सावंत (विश्रामबाग), विजय पांडुरंग शिंदे (संजयनगर), अभिमान ऊर्फ बाळू विठ्ठल माने (मिरज ग्रामीण), मधुकर दादासो वाघमोडे (जत), विक्रांत ऊर्फ छोट्या शंकर बाबर, रवी रमेश खत्री (सांगली शहर).
सातारा : रॉयल ऊर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा (कोयनानगर), प्रमोद ऊर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर, महेंद्र ऊर्फ महेश गजानन तपासे, आकाश ऊर्फ बाळू तानाजी खुडे, आशिष मोहन जाधव (सातारा शहर), अमित ऊर्फ सोन्या आनंदराव देशमुख (कोरेगाव), शेखर भगवान गोरे (म्हसवड), अनिल महालिंग कस्तुरे (शाहूपुरी), चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे, अमित ऊर्फ बिज्या रमेश कदम (शिरवळ), रुकल्या दशरथ चव्हाण (उंब्रज), दत्तात्रय रामचंद्र जाधव (पुसेगाव).
पुणे ग्रामीण : गणेश दीपक अग्रवाल (शिक्रापूर), राहुल चंद्रकांत पवार, गणेश सुभाष मसूरकर, कपिलदेव चंद्रवली दुबे (राजगड), सोमनाथ विष्णू राऊत, इराज्या ऊर्फ युवराज कोब्या काळे (इंदापूर), शाम रामचंद्र दाभाडे, अक्षय राजाभाऊ मुळे, अविनाश ऊर्फ बबल्या प्रकाश शिंदे (तळेगाव), सलीम ऊर्फ डी. बादशाह बाबू तांबोळी, विकी संजय बोरगावे (सासवड), सचिन अप्पा ऊर्फ भाऊसाहेब इथापे ऊर्फ शिवाजी अप्पा पाटील (यवत), राहुल ऊर्फ होम्या ऊर्फ हेमराज काळे, अंकुश ज्ञानेश्वर भोंडवे, नीलेश पांडुरंग धोत्रे, (जेजुरी), नारायण सोपान दाभाडे, अनिल रामदास अहिरे (चाकण), पित्या ऊर्फ पिंट्या अविनाश काढण्या भोसले (लोणावळा ग्रामीण), मयूर बाळासाहेब गोळे, भगवान बाबू मरगळे (पौड), ज्ञानेश्वर ऊर्फ माउली तुकाराम कोल्हे (भिगवण), अरुण मुकेश हस्तोडिया, विनोद निजप्पा गायकवाड (देहूरोड), बाक्या बंड्या काळे (दौंड), रमेश नरसिंग भोसले (शिरूर), सौरभ विलास शिंदे (लोणीकंद), रमेश धनसिंग सोनार ऊर्फ थापा (लोणीकाळभोर), विकास ऊर्फ विक्की अंकुश भिसे (वडगाव मावळ), शुभम ऊर्फ चिकण्या विष्णू जाधव (शिक्रापूर).
अशी होते ‘मोक्का’ची कारवाई
मोक्का प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिल्यानंतर संशयित आरोपींना पुणे मोक्का न्यायालयात हजर केले जाते. तेथून त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर संशयितांच्या गुन्हेगारी प्रवासावर पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून सखोलपणे तपास केला जातो. ही गुन्हेगारी टोळी समाजाला कशी घातक आहे, त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी प्रयत्न केले असतानाही ते सुधारू शकत नाहीत.
त्यांचे दिवसेंदिवस वाढते उपद्व्याप कायदा व सुव्यवस्थेला बाधक असल्याचा कागदोपत्री चौकशी अहवाल पुन्हा पुणे मोक्का न्यायालयास सादर केला जातो. त्यानंतर या आरोपींना सात किंवा चौदा वर्षे कारागृहात मुक्काम करण्याचे आदेश न्यायालयाकडून दिले जातात. ही कठोर शिक्षा गुन्हेगारांचा जीवनप्रवास संपविते; त्यामुळे या कारवाईची गुन्हेगारांच्या मनामध्ये मोठी भीती आहे.

Web Title: 73 gangs of 'Mokka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.