अभिलाषा कबड्डीची रोल मॉडेल, महिला खेडाळूंसाठी आदर्शवत, प्रेरणादायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 02:46 AM2017-09-23T02:46:41+5:302017-09-23T02:47:07+5:30

Excellent Role Model of Kabaddi, Ideal for Women Khedal, Motivational Travel | अभिलाषा कबड्डीची रोल मॉडेल, महिला खेडाळूंसाठी आदर्शवत, प्रेरणादायी प्रवास

अभिलाषा कबड्डीची रोल मॉडेल, महिला खेडाळूंसाठी आदर्शवत, प्रेरणादायी प्रवास

Next

प्राची सोनवणे
नवी मुंबई : महाराष्ट्राची आघाडीची खेळाडू, तसेच आंतरराष्ट्रीय महिला कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे ही आजवरच्या प्रवासात महिला खेळाडूंकरिता प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरली आहे. कबड्डीच्या मैदानात उतरून महिला संघाचे प्रतिनिधित्व करत आजवर देशाला अनेक पदके मिळवून दिली आहेत. जगभरात आज कबड्डी खेळली जात असून, हा खेळ यापुढेही असाच टिकावा, याकरिता अभिलाषा विशेष मेहनत घेत आहे.
शाळेत असतानाच अभिलाषाने कबड्डीपटू होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि त्यादृष्टीने कठोर परिश्रमही घेतले. नववी ते बारावीपर्यंत सलग चार वर्षे तिने राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक पटकविले. २००६ मध्ये पहिल्यांदा कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. कबड्डी सामन्यादरम्यान डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झालेली असताना देखील न डगमगता ती मैदानात उतरली. हा प्रसंग अजूनही तिच्या डोळ््यासमोर उभा राहतो, अशी माहिती तिने ‘लोकमत’ला दिली. त्यावेळी कबड्डीच्या करिअरला पूर्णविराम मिळणार होता, मात्र कुटुंबीय, प्रशिक्षकांनी धीर दिला, तसेच खचून न जाता पुन्हा २०१० साली मैदानात उतरली. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने अभिलाषा हिला क्रीडा क्षेत्रातील मानाचा ‘अर्जुन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. २९ आॅगस्ट २०१५ रोजी नवी दिल्लीत क्र ीडा दिनाचे औचित्य साधून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिलाषा म्हात्रे हिने २०१२च्या महिला विश्वचषक स्पर्धेत, तसेच २०१४च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघात उत्तम खेळ करीत देशाचे प्रतिनिधित्व केले होते.
निवृत्त न्यायाधीश व्ही. के. बाली यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने ‘खेलरत्न’ व ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी १७ खेळाडूंची शिफारस केल्यानुसार कबड्डी क्र ीडा प्रकारामध्ये अभिलाषाची निवड करण्यात आली. २०१६ साली झालेल्या १२व्या एशियन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकविले. २०१४ साली साऊथ कोरिया येथे झालेल्या १७व्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदकाची मानकरी ठरली.
>२०१२ मध्ये बिहार येथे झालेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदक पटकविले. २०१३ साली साऊथ कोरिया येथे झालेल्या चौथ्या एशियन गेम्समध्येही सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. प्रो कबड्डी लीगमध्ये आईस दिवाज संघाची कर्णधार म्हणून अभिलाषाने उल्लेखनीय कामगिरी बजाविली.
तिचे प्रशिक्षक सुहास कदम यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन करत जिद्दीने खेळण्याकरिता विशेष प्रोत्साहन दिले. नवी मुंबई महानगरपालिकेत क्रीडाधिकारी म्हणून अभिलाषा कार्यरत आहे. कबड्डीसारख्या खेळातून आज घराघरात पोहोचता आले असून, यापुढेही कबड्डी अशीच टिकून राहावी याकरिता नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे अभिलाषाने स्पष्ट केले.
कबड्डीसारख्या क्षेत्रात महिलांनी पुढे येणे आवश्यक असून, येत्या काळात कबड्डीपटूंना स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी आणखी चांगली संधी या माध्यमातून मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत खेळातही चांगले करिअर करता येत असल्याचा मोलाचा सल्ला दिला.
>प्रशिक्षकांकडून सहकार्य
कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बळावरच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई, महाराष्ट्रासह भारताचे प्रतिनिधित्व करू शकले. कबड्डी मंडळ असो किंवा राष्ट्रीय संघ, नेहमीच चांगली वागणूक मिळाल्याची प्रतिक्रिया अभिलाषा हिने व्यक्त केली. सरावादरम्यान पुरु ष सहकारी, तसेच प्रशिक्षकांचे चांगले सहकार्य लाभले असून, मुलींचा किंवा महिलांचा संघ म्हणून कधीही सापत्न वागणूक मिळाली नाही, असेही अभिलाषाने स्पष्ट केले.

Web Title: Excellent Role Model of Kabaddi, Ideal for Women Khedal, Motivational Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.