व्हेलमाशाची 'उलटी' इतकी महाग का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 01:48 PM2018-10-04T13:48:32+5:302018-10-04T13:57:46+5:30

इजिप्तमध्ये याचा प्राचीन काळापासून वापर केला जात आहे. चीनमध्ये हा पदार्थ ड्रॅगनच्या थुंकीमधून बाहेर येतो असा समज होता. युरोपमध्ये प्लेगच्या साथीमध्ये अ‍ॅम्बरग्रीसचे गोळे जवळ बाळगले तर प्लेगपासून रक्षण होते असे मानले जाई. मध्ययुगात युरोपमध्ये याचा वापर डोकेदुखी, सर्दी, अपस्मार यांच्यावर उपचारासाठी केला जात असे.

Why the whale-fish 'vomit' is so expensive? what is Ambergris | व्हेलमाशाची 'उलटी' इतकी महाग का?

व्हेलमाशाची 'उलटी' इतकी महाग का?

googlenewsNext

मुंबई- कालच व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघांना अटक झाली आहे. पण उलटीसारखा त्याज्य पदार्थ हे लोक का विकत असतील आणि तो कोण विकत घेत असेल याबाबत फारशी माहिती नसते. व्हेल माशाची ही उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो. त्याला अ‍ॅम्बरग्रीस असं म्हणतात. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. या गोळ्य़ाला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी किंमत मिळते. त्याला पांढुरका पिवळा रंग असतो.

 आता या गोळ्याला इतकी किंमत का असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर म्हणजे, सुगंध. या दगडासारख्या गोळ््याला कस्तुरीसारखा गोडसर वास असतो. त्यामुळे त्याचा वापर उच्च प्रतीच्या अत्तराच्या निर्मितीसाठी केला जातो. मात्र आजही ही उलटी म्हणजे नक्की काय याचा विचार संशोधक करत आहेत. व्हेल माशाच्या पित्ताशयातून विविध प्रकारची द्रव्ये त्याच्या आतड्यामध्ये जातात आणि तेथे अ‍ॅम्बरग्रीसची निर्मिती होत असावी असे समजले जाते. या पदार्थाची निर्मिती होण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. काही शास्त्रज्ञांच्या मते स्क्वीड (एक प्रकारचा समुद्री जीव) खाल्ल्यावर त्याची चोच व्हेल माशाला टोचू लागते. त्यामुळे व्हेल मासा त्याच्याभोवती या द्रव्याचे संचयन करतो.         

काही अ‍ॅम्बरग्रीसमध्ये अशा टोकदार वस्तू सापडल्या आहेत. हे सुगंधी द्रव्य बाळगणे अनेक देशांमध्ये बेकायदेशीर मानले जाते. स्पर्म व्हेलची संख्या कमी होत चालल्यामुळे ते बाळगणे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. बहुतांशवेळा अ‍ॅम्बरग्रीसला कुत्रे शोधून काढतात त्यामुळे काही कुत्र्यांना खास प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून शोध घेतला जातो. दक्षिण अफ्रिका, ब्राझील, मादागास्कर, मालदीव, भारत, आॅस्ट्रेलिया, न्यू झीलंड, बहामा या देशांच्या किनाऱ्यावर हे सुगंधी गोळे सापडले आहेत. हा पदार्थ तयार होण्यासाठी लागणारा काळ, त्याचा सुवास, तो दुर्मिळ असणे आणि शोधायला मुश्कील असणे या कारणांमुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आणि किंमत मिळालेली आहे. जगभरात त्याचे लिलाव करुन लाखो डॉलर्सची किंमत वसूल केली जाते. गेली अनेक वर्षे हा पदार्थ स्पर्म व्हेलच्या तोंडाद्वारे बाहेर फेकला जाणारा पदार्थ असावा असा अंदाज होता मात्र काही तज्ज्ञांच्या मते हा गोळा त्याच्या गुदद्वारावाटे बाहेर फेकला जात असावा.
    इजिप्तमध्ये याचा प्राचीन काळापासून वापर केला जात आहे. चीनमध्ये हा पदार्थ ड्रॅगनच्या थुंकीमधून बाहेर येतो असा समज होता. युरोपमध्ये प्लेगच्या साथीमध्ये अ‍ॅम्बरग्रीसचे गोळे जवळ बाळगले तर प्लेगपासून रक्षण होते असे मानले जाई. मध्ययुगात युरोपमध्ये याचा वापर डोकेदुखी, सर्दी, अपस्मार यांच्यावर उपचारासाठी केला जात असे.

Web Title: Why the whale-fish 'vomit' is so expensive? what is Ambergris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.