भाजप-शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 19:01 IST2019-04-10T18:22:19+5:302019-04-10T19:01:57+5:30
अमळनेर येथील भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की करण्यात आली.

भाजप-शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की
जळगाव - अमळनेर येथील भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जोरदार राडा झाला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यातही हाणामारी झाली. मात्र या मारहाणीमागचे नेमके कारण हे समोर येऊ शकलेले नाही. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अमळनेर येथे भाजपचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांची जाहीर प्रचार सभा प्रताप मिल परिसरात बुधवारी सायंकाळी झाली. या सभेसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी उपस्थित होते.
सभा सुरू असताना स्मिता वाघ समर्थकांनी डॉ.बी.एस.पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरवा, असे सांगत एकच घोषणाबाजी केली. यानंतर वाघ समर्थकांनी थेट व्यासपीठावर चढून डॉ.बी.एस.पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मंत्री गिरीश महाजन हे सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा त्यांनाही समर्थकांनी धक्काबुक्की केली. यानंतर बी.एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरवून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हे मारहाण नाट्य जवळपास पाच ते सात मिनिटे सुरु होते.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपानं स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. ती रद्द करून आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि भाजपाचे उन्मेष पाटील यांच्यात लढत होणार आहे. पक्षाने केलेला हा राजकीय कोल्ड ब्लडेड मर्डर आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया जळगाव लोकसभा मतदार संघातून तिकीट कापण्यात आलेल्या भाजपच्या आमदार स्मिता वाघ व त्यांचे पती पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी व्यक्त केली.