भुसावळ येथे घराला शॉर्ट सर्किटने आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:43 PM2019-01-30T22:43:55+5:302019-01-30T22:45:23+5:30

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील साईजीवन सुपरशॉपीसमोरील गंगाराम प्लॉट भागातील प्रवीण पाटील यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना ३० रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली.

Short circuit fire house at Bhusawal | भुसावळ येथे घराला शॉर्ट सर्किटने आग

भुसावळ येथे घराला शॉर्ट सर्किटने आग

googlenewsNext
ठळक मुद्देसुमारे ५० हजारांचे नुकसाननगरसेवक कोठारी व धांडे यांच्या सतर्कतेने अनर्थ टळलावीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने आग लागल्याचा आरोप

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील साईजीवन सुपरशॉपीसमोरील गंगाराम प्लॉट भागातील प्रवीण पाटील यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना ३० रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत घरातील सुमारे ५० हजार रुपयांचे सामान जळून खाक झाले. नगरसेवक निर्मल कोठारी व नितीन धांडे यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
जामनेर रोडवरील साईजीवन सुपर शॉपीसमोर राहत असलेले आयुध निर्माणीतील सेवानिवृत्त कर्मचारी प्रवीण नाना पाटील हे कुटुंबासह वरणगाव येथे अंत्ययात्रेसाठी सकाळी गेले होते. तेथून ते ११.३० वाजेच्या सुमारास घरी परतले. ते घरात गेले असता मागील बाजूस असलेल्या स्टोअर रुममध्ये आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथील वॉशिंग मशीनसह लाकडी कपाटदेखील जळालेले होते. आग लागल्याचे लक्षात येताच नगरसेवक निर्मल कोठारी व समाजसेवक नितीन धांडे, भानुदास पाटील, प्रथमेश गुलईकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत स्वत: आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी त्यांची पत्नी व लहान मुलगी घरात होती. त्यांना तत्काळ घराबाहेर सुरक्षित काढून पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व आग विझविण्यात आली. या आगीत घरातील अंदाजे २८ हजार रुपये किमतीचे वॉशिंग मशीन तसेच लाकडी कपाटातील महत्वाची कागदपत्रे व काही सामान जळाले. घराच्या समोरुन महावितरणची प्रमुख वीजवाहिनीची लाईन गेली आहे. याबाबत वारंवार संबंधित विभागाला कळवूनसुध्दा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही आग लागल्याचा आरोप प्रवीण पाटील यांनी यावेळी केला.

Web Title: Short circuit fire house at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.