बायोडायनॅमिक खतांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 10:51 PM2017-10-13T22:51:46+5:302017-10-13T22:52:29+5:30

बचत गटाने केली निर्मिती : महागड्या खतांना भेटला पर्याय

 Production of bio-fertilizers | बायोडायनॅमिक खतांची निर्मिती

बायोडायनॅमिक खतांची निर्मिती

Next
ठळक मुद्देमहिला बचत गटाचा उपक्रमटाकाऊतून उपयोगी खतांची निर्मितीसेंद्रिय खतांची निर्मिती

रावेर : सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर करणाºया रावेर तालुक्यात शेतजमिनीला नापिकीपासून वाचवण्यासाठी तथा पशुधनाअभावी गगनाला भिडलेल्या शेणखताला कमी खर्चात बचतीचा पर्याय म्हणून मस्कावद येथील श्री उमामहेश्वर बचत गटाने बायोडायनॅमिक खताची निर्मिती केली. शेतातील टाकाऊ गाजर गवत, निंदणीचे तण, पालापाचोळा तथा निंबोळी पाल्याचा बायोडायनॅमिक डेपो उभारून निर्मिती केलेल्या बहुगुणी अशा बायोडायनॅमिक खतापासून शेतातील उभ्या पिकांना व शेतजमिनीला अत्यावश्यक असलेले पौष्टिक अन्नद्रव्य मिळते़ शेतजमिनीत निर्माण होणाºया काळ्या बुरशीचे समूळ उच्चाटन करून शेतातील उभ्या हिरव्या पिकांवर आक्रमण करणाºया आकस्मिक मर रोगावर विजय प्राप्त करणारा जणूकाही महामृत्युंजय मंत्रच बायोडायनॅमिक खताच्या माध्यमातून शेतकरीवर्गाला या उमामहेश्वर बचत गटाने दिला आहे. मस्कावद बुद्रूक, मस्कावद खुर्द व मस्कावद सीम या तिन्ही गावांमध्ये महिलांमध्ये बचत गट स्थापन करून नुसताच बचतीचा मूलमंत्र घेऊन न थांबता सेंद्रिय शेतीचा अवलंब करीत नवनवीन प्रयोग करून उत्पादनवाढीसाठी चढाओढ सुरू असते. किंबहुना या महिलाशक्तीला प्रेरणा देण्याचे व त्यांच्या बचत गटांमध्ये स्पर्धा निर्माण करून महिला सशक्तीकरण करण्याचे अनमोल कार्य शासनाच्या कृषी विभागातून निवृत्त झालेल्या कृषी मंडळ निरीक्षक ए़ टी़ फेगडे हे अविरत व निरपेक्षपणे करीत आहेत़ याबाबत महिलावर्गातून कोणीतरी खंबीर मार्गदर्शक मिळाले म्हणून समाधान व्यक्त होत आहे़
मस्कावद येथे गतवर्षीच श्री उमामहेश्वर महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. गटाने केळीपासून रवा, केळीच्या चकल्या व केळीचे पीठ बनवण्याच्या गृहउद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कमी वजनाच्या केळीच्या रव्याचा पौष्टिक, स्वादिष्ट व संतुलित आहार असलेला हलवा तुलनात्मकदृष्ट्या गव्हाच्या रव्यापेक्षा जास्त लोकांची भूक भागवण्यासाठी पूरक व माफक ठरत असल्याचा दावा या गटाने केला आहे. यावषी गटाच्या सदस्य सुवर्णा भोगे यांनी बायोडायनॅमिक खतावर आधारित हळद लागवड केली आहे. जीवनामृताच्या द्रावणात बुडवून हळदीचे बेणे लागवड करून त्याला बायोडायनॅमिक खत घातले आहे़ गोमूत्र, आंबट ताक, भाताची पेज, केळीच्या खोडातील द्रवरूप खत व बायोडायनॅमिक खताच्या द्रवरूप द्रावणाची तसेच निंबोळी अर्काची आलटून पालटून फवारणी केली आहे. भरीताचीही वांगी लावून बायोडायनॅमिक खताची जमिनीतून व फवारणीतून मात्रा देत पिके वाढविली आहेत़
या गृहोद्योगातील मिळणाºया यशात अल्पसंतुष्ट न राहता त्यांनी शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरलेले निरूपद्रवी असे गाजर गवत, निंदणीतून येणारे तण, पालापाचोळा व निंबोळी पाला यांचा संमिश्र एक फुटाचा थर त्यावर गाईच्या शेणाचा सडा असे चार थर आठ फूट लांब, तीन फूट रुंद व चार फुट उंच उभारून त्याला शेतातील मातीचा पातळ चिखल व शेणाच्या मिश्रणाच्या स्लरीच्या साह्याने चहूबाजूंनी व वरून लिपून बायोडायनॅमिक डेपो उभारण्यात आला. या डेपोत सुरुवातीपासून दोन बांबू गाडून सोडलेल्या दोन छिद्रांमधून दर आठ दिवसाआड ताक व पाण्याचे द्रावण सोडण्यात आले. ही प्रक्रिया साडेतीन महिन्यांपर्यंत सुरूच ठेवली. हवाबंद असलेल्या या बायोडायनॅमिक डेपोत ताकपाण्याची त्या कुजणारे हिरवळीच्या टाकाऊ खताशी प्रक्रिया होऊन निर्माण होणाºया उर्ध्वपातन प्रक्रियेतील वायूमुळे चहापावडरप्रमाणे साडेतीन टन बायोडायनॅमिक खताची निर्मिती करण्यात या बचत गटाने यश साध्य केले़ बचत गटाची धुरा हेमलता हर्षल सरोदे (अध्यक्ष), धनश्री प्रशांत पाटील (उपाध्यक्ष), (सचिव), सदस्य- कल्पना प्रसन्न पाटील, पूजा चौधरी, सुवर्णा भोगे, शिल्पा पाटील, सुनीता राणे, मंगला पाटील, प्रमिला पाटील या यशस्वीपणे सांभाळत आहेत.

Web Title:  Production of bio-fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.