प्रसिद्ध पुरुष ‘हवेत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 04:09 PM2018-02-26T16:09:55+5:302018-02-26T16:09:55+5:30

लोकमतच्या वीकेण्ड सदरात प्रा.अनिल सोनार यांचे हसु भाषिते सदर

Famous men 'in the air' | प्रसिद्ध पुरुष ‘हवेत’

प्रसिद्ध पुरुष ‘हवेत’

Next

त्या देहूच्या तुकाराम वाण्याने सांगून ठेवलंय, ‘प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे.’ तर चाफळ खोºयातल्या ठोसरांच्या नारायणाने बजावलंय, ‘यत्न तो देव जाणावा.’ बहुधा, परमेश्वराची पूर्वसंमती न घेताच कोणी तरी स्वानुभव घोषित करून टाकलाय की, ‘प्रयत्नांती परमेश्वर’ अशा वचनांचा परिणाम म्हणून की काय, काही माणसांनी, अंगात कोणतंही कर्तृत्व नसताना, स्वप्रसिद्धीच्या प्रयत्नांना स्वतला वाहून घेतलेलं असतं. एकदा का ते ह्या प्रयत्नांत यशस्वी झाले की आजन्म ते त्या प्रसिद्धीच्या हवेतच तरंगत असतात. मग स्वत:च्या नावापुढे स्वत:च श्रेष्ठ कवी, सुप्रसिद्ध साहित्यिक, जगप्रसिद्ध माजी संमेलनाध्यक्ष (एक तासीय विश्व साहित्य संमेलन मौजे टेंभुर्णी) इत्यादी बिरुदावली लावून समाधान पावत असतात. आपण चेष्टेचा विषय झालेलो आहोत, हे त्याच्या ‘कानी’ही नसते. कारण-

हवेत तरंगणारे
ऐकण्याच्या मन:स्थितीत असत नाहीत,
म्हणूनच तर विमानांना कधी
कुणीही भोंगे लावत नाहीत.
ह्याचं असं घडतं कारण -
काही माणसं जन्मजात
छान सुप्रसिद्ध असतात,
सुप्रसिद्ध असण्याबाबत
तर स्वयंसिद्ध असतात.
आईला ‘कळा’ येण्याआधी
हेच बातमी पाठवतात
हे जन्मल्याची बातमी येते
नंतर हे जन्माला येतात.
स्वत:चं असं काही नसताना
हे बिनचूक सर्वकाही असतात,
कोणत्याही कार्यात नसले तरी
बातमीत मात्र सतत असतात.
कर्तृत्वाच्या बळावरती
गुणवान माणसं मोठी होतात,
बातम्यांचा पाऊस पाडत हे
प्रसिद्धीतून मोठे होतात.
प्रसिद्धीतून मोठे होणे
वाटते तितके सोपे नसते,
त्यासाठी अंगामध्ये
कोडगेपण आवश्यक असते.
घरातून हाकलल्यासारखे
सभास्थळीच असावे लागते,
लेखन डिसेंट्री लागल्यासारखे
सतत ‘पेपरात’ रहावे लागते.
असा माणूस रोज सकाळी
पेपरावर स्वत:ला बघतो,
प्रयत्नपूर्वक बालपणीची
सवय निष्ठेने जपतो.
सतत दृष्टीस पडत राहून
सुपरिचितही होतो,
सुपरिचित हा उद्याचा
सुप्रसिद्धही असतो.
सुप्रसिद्ध झाल्यावर माणूस
आपोआप मान्यवर होतो,
वयाने ज्येष्ठ असला तर मग
कसलाच वांदा नसतो.
‘ ज्येष्ठ’त्वापाशी ‘श्रेष्ठ’त्व हे
अनुप्रासातून धाऊन येते,
अशा रितीने सिद्धीशिवाय
प्रसिद्धी फळास येते.
अर्थात, प्रसिद्धीच्या हवेत तरंगण्यात यास्त्ती होणं हे येरा-गबाळ्याचे काम नोहे. त्यासाठी मेंदूत पशूसंमेलन जागृत ठेवावे लागते. प्रसंगी लांडग्यासारखे लबाड, कोल्ह्यासारखं लालची, सापासारखं कणाहीन, वटवाघळासारखंं मुत्सद्दी, कुत्र्यासारखं लाचार, गाढवासारखं मद्दड, तर मांजरीसारखं निर्लज्जही होता यावं लागतं. तात्पर्य काय की-
ओढता येतात पाण्यावर रेघा,
बांधता येतात किल्ले हवेत,
‘ येन केन प्रकारेण
प्रसिद्ध पुरुष ‘हवेत.’

 

Web Title: Famous men 'in the air'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.