भाजपमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:24 PM2019-04-14T22:24:10+5:302019-04-14T22:26:00+5:30

नंदुरबारमध्ये निष्ठावंत डॉ.सुहास नटावदकर यांची उमेदवारी, धुळ्यात आमदारकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरलेले अनिल गोटे, जळगावात तिकीट कापाकापी, व्यासपीठावर ज्येष्ठ नेत्यांची हाणामारी, पोलीस स्टेशनपर्यंत वाद पोहोचणे या बाबींमधून भाजपची डोकेदुखी वाढली आहे. ‘संकटमोचका’चा प्रभाव या तीन मतदारसंघात का पडला नाही, हा पक्षश्रेष्ठींसाठी चिंतेचा विषय राहणार आहे. तिकडे रावेरमध्ये एकनाथराव खडसे उपचार घेऊन परतले, ही जमेची बाजू म्हणावी लागेल.

The disaster management test in the BJP | भाजपमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी

भाजपमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी जुळवून घेण्यात यश; मात्र भाजपचे अंतर्गत मतभेद विकोपालाराष्टÑीय मुद्यांसोबत दुष्काळ, पाणीटंचाई, चाराटंचाई मुद्दे ठरताहेत प्रभावी; सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या रणनीतीत बदल






मिलिंद कुलकर्णी

जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण ही दोन महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या गिरीश महाजन यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘संकटमोचक’ ही नवीन जबाबदारी दिली आहे. आंदोलनांमधून मार्ग काढण्यात ते वाकबगार आहेत. त्यासोबतच निवडणुकांमध्ये हमखास यश मिळवून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. जळगाव, धुळे आणि नगर महापालिका निवडणुकीत करिष्मा दिसला. उत्तर महाराष्टÑातील सर्व ८ जागा भाजप-शिवसेना युती जिंकेल, असा दावा त्यांनी केला आहे. पक्षांतर्गत बंडखोरी व अंतर्गत वादाचे चित्र पाहता, त्यांच्या आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी आहे.
खान्देशातील चारही जागा २०१४ मध्ये जिंकणाºया भाजपची यंदा उमेदवारीपासूनच दमछाक झाली. कोणत्याही ठिकाणी सहजपणे उमेदवारी निश्चित झाली नाही. पक्षातील अंतर्गत वाद प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात समोर आले. बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जळगावमधील कामक्रीडा, तिकीट कापाकापी, जलसंपदामंत्र्यांवर षडयंत्राचा आरोप, कोल्ड ब्लडेड मर्डरसारख्या शब्दांचा वापर, जलसंपदामंत्र्यांच्या कार्यालयावर आमदार समर्थकांचा मोर्चा, पक्षाच्या व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष व समर्थकांनी माजी आमदाराला बेदम मारहाण, सगळा वाद पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांनी एकमेकांविरुध्द फिर्यादी या सगळ्यातून भाजपच्या ‘पार्टी विथ द डिफरन्स’ या प्रतिमेच्या चिंधड्या उडाल्या आहेत.
भाजपमध्ये सामूहिक निर्णयप्रक्रिया संपुष्टात आल्यापासून असे पतन सुरु झाले आहे. जो नेता असेल त्याच्या मर्जीने पक्ष चालत राहिला. पक्षश्रेष्ठीदेखील ‘फोडा आणि झोडा’ या रणनीतीचा वापर करीत स्वत:चे महत्त्व वाढवत राहिले आणि स्थानिक नेत्यांचे पंख कापत राहिले. पूर्वी एकनाथराव खडसे यांचा एकछत्री अंमल होता, त्यांनीही एककल्ली कारभार केला. डॉ.बी.एस.पाटील, अरुण पांडुरंग पाटील या विद्यमान आमदारांचे तर हरिभाऊ जावळे या विद्यमान खासदारांचे तिकीट कापले होतेच. महाजन यांनीही तेच केले. अडीच वर्षे प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यावर राज्य करणारे चंद्रकांत पाटील तर निवडणुका जाहीर झाल्यापासून फिरकलेच नाहीत. मात्र उमेदवारी देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे समोर आलेच. गोटे यांचे बंड अपेक्षित होते. परंतु, डॉ.सुहास नटावदकर यांचे बंड आणि कुवरसिंग वळवी, डॉ.नरेंद्र पाडवी या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे त्यांना असलेले समर्थन हे भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. पक्षविस्तारासाठी ‘इनकमिंग’ महत्त्वाचे असले तरी मूळ ‘मावळे’ घराबाहेर पडले तर सत्ता जाताच ‘कावळे’ उडून जातील, मग हाती काय राहील?
सत्तेमुळे आलेल्या अवगुणांचा मोठा फटका भाजपला सध्या बसत आहे. शतप्रतिशत, मासबेस, इलेक्टीव मेरिट या संकल्पना स्विकारत पक्ष यश मिळवित असला तरी निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जात नाही. युतीधर्म म्हणून शिवसेनेशी जुळवून घेण्यात यश आले असेल, मात्र पक्षातील कार्यकर्ते नाराज असतील तर मतदान केंद्रापर्यंत मतदारांना कसे पोहोचविणार, पक्षाचा विचार जनतेपर्यंत कोण पोहोचविणार? सतरंज्या उचलण्याची कामे, कढीपत्त्यासारखा होणारा उपयोग आता कार्यकर्त्याच्या ध्यानात येऊ लागला आहे. केवळ नरेंद्र मोदी, भाजप चांगला आहे असे म्हणून जनता तुम्हाला मतदान करेल, असे नाही ते सभोवताली बघत असतात हे लक्षात घ्यायला हवे.

Web Title: The disaster management test in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.