तीन आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस न आल्यास अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:04 PM2019-06-17T13:04:25+5:302019-06-17T13:04:42+5:30

उडीद-मूग, ज्वारी होणार बाद : सोयाबीन, मका, तुरीचे क्षेत्र वाढणार

 Difficulty if there is no rain in three weeks | तीन आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस न आल्यास अडचण

तीन आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस न आल्यास अडचण

Next

जळगाव : यंदा विविध कारणांनी जिल्ह्यात पावसाचे आगमन लांबले असून तीन आठवड्यात पेरणी योग्य पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांपुढील अडचणीत वाढ होणार आहे. उडीद, मूग, ज्वारीऐवजी सोयाबीन, मका, तुरीची लागवड करावी लागणार आहे. याशिवाय उत्पादनातही घट येण्याची भिती असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचीच चिंता असल्याने पावसाची प्रतीक्षा होत असताना जिल्ह्यात पावसाचे आगमन मात्र विविध कारणांनी लांबले आहे.
एरव्ही ७ जूनच्या आसपास पाऊस हजेरी लावतो. त्यामुळे शेतकरी तातडीने पेरण्या आटोपून घेतात. मात्र यंदा विविध कारणांनी पावसाचे आगमन लांबले आहे. तर शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत न झाल्याने कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. या बोंडअळीचा जीवनक्रम हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यामुळे खंडीत न झाल्याने पुर्नउत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढत आहे. हा अनुभव लक्षात घेता खरीप २०१९ मध्ये गुलाबी बोंडअळीला आळा घालावयाचा असल्याने या अळीचा जीवनक्रम खंडीत होण्यासाठी उपाययोजना म्हणून कापसाची हंगामपूर्व लागवड होणार नाही, यादृष्टीने कृषी विभागाकडून काळजी घेण्यात आली. तसेच शेतकºयांना धूळ पेरणी न करता किमान ६५ मिमी (पुरेसा) पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन केले. अर्थात अनेक शेतकºयांनी या आवाहनाला न जुमानताच काही भागात पेरणी उरकून टाकली आहे. याठिकाणी टँकरने पाणी देऊन कापूस जगविण्याची वेळ आली आहे.
तर उडीद, मूगाऐवजी मका, तुरीचे क्षेत्र वाढणार
कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उडीद, मूग लागवड ७ जुलैच्या आत पुुरेसा पाऊस झाला तरच करता येणार आहे. त्यानंतर उडीद, मुगाची लागवड करता येणार नाही. त्यातही उत्पादनात घट होण्याची भिती राहील. आधीच यंदा मूगाच्या क्षेत्रात ७ टक्के तर उडीदाच्या क्षेत्रात १६ टक्के घट होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मूगाचे सरासरी क्षेत्र ३२ हजार ३३८ हेक्टर असताना यंदा ३० हजार हेक्टरवर तर उडीदाचे सरासरी क्षेत्र ३५ हजार ७८० हेक्टर असताना यंदा ३० हजार हेक्टरवरच लागवड होण्याचा अंदाज होता.
कापसाच्या उत्पादनावरही परिणाम
७ जुलैपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यास कापूस लागवड केली तरीही उत्पानात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन आठवड्यात पेरणीयोग्य पावसाची शेतकºयांना प्रतीक्षा आहे.

 

Web Title:  Difficulty if there is no rain in three weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.