दूध संघात कोरोनामुळे प्रत्येकी हजार टन दूध पावडर व बटरचा साठा, लॉकडाऊनमुळे मागणी ‘लॉक’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 01:55 AM2020-09-02T01:55:37+5:302020-09-02T06:39:40+5:30
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, छोटे-छोटे चहा विक्रीची दुकाने बंद झाली. परिणामी दुधाची मागणी घटत गेली.
जळगाव : लॉकडाऊनमुळे हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान बंद असल्याने दुधाच्या मागणीत घट झाल्याने जिल्हा दूध संघाकडे एक हजार टन दूध पावडर व एक हजार टन बटरचा साठा शिल्लक आहे. यामध्ये जवळपास ८० ते ९० कोटी रुपये अडकले आहेत. संकलित दुधातून दररोज सरासरी ५० हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. असे असले तरी दूध उत्पादकांना मात्र त्यांची रक्कम नियमित अदा केली जात आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, छोटे-छोटे चहा विक्रीची दुकाने बंद झाली. परिणामी दुधाची मागणी घटत गेली.
मागणी घटली, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन वाढले
जिल्हा दूध संघातून जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्हा तसेच मुंबईपर्यंत दुधाचा पुरवठा केला जातो. मात्र सर्वच ठिकाणी हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, चहा विक्रीची दुकाने बंद असल्याने सर्वच ठिकाणातून दुधाची मागणी घटली आहे. संघात दररोज दोन लाख लिटर दुधाचे संकलन होत असताना मार्च-एप्रिलमध्ये केवळ एक लाख पाच हजार ते एक लाख १० हजार लिटर दुधाची विक्री होऊ लागली. अनलॉकनंतर हळूहळू मागणी वाढत जाऊन आता ती दीड लाख लिटर दुधापर्यंत पोहचली आहे. मात्र तरीदेखील अजूनही दररोज जवळपास ५० हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळातील दररोजचे ८० ते ९० हजार लिटर व आता दररोजचे ५० हजार लिटर दूध शिल्लक राहत असल्याने दूध संघाने त्यापासून दूध पावडर, बटर असे दुग्धजन्य पदार्थ तयार करणे सुरू केले.
हॉटेल सुरू होण्याची प्रतीक्षा
जिल्हा दूध संघात शिल्लक दुधापासूून दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन वाढत जाऊन संघात आतापर्यंत एक हजार टन दुधाची पावडर व एक हजार टन बटर तयार झाले आहे. मात्र अजूनही हॉटेल, मोठे रेस्टॉरंट सुरू झालेले नसल्याने पाहिजे, त्या प्रमाणात मागणी नसून हा साठा शिल्लक राहत आहे. यामध्ये दूध संघाचे ८० ते ९० कोटी रुपये अडकले आहेत. यासाठी संघाने कर्ज घेतले असून उत्पादन नियमित ठेवण्यासह दूध उत्पादकांनाही वेळेत त्यांची रक्कम अदा केली जात असल्याचे दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली. विशेष म्हणजे दूध उत्पादकांना वाढीव दर दिला असून विक्री दर मात्र ‘जैसे थे’ आहेत.
दूध संघात नियमित दूध संकलन सुरू असून मार्च-एप्रिल महिन्याच्या तुलनेत सध्या दुधाची मागणी वाढली आहे. मात्र हॉटेल व इतर व्यवहार पूर्णपणे सुरू न झाल्याने दूध शिल्लक राहत आहे. त्यापासून दूध पावडर, बटर तयार केले जात असून सर्व व्यवहार सुरू न झाल्याने त्यालाही जास्त मागणी नाही. असे असले तरी दूध उत्पादकांना वाढीव दर देण्यासह त्यांना वेळेवर त्यांची रक्कम दिली जात आहे.
- मनोज लिमये, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा दूध संघ, जळगाव