मुले म्हणतात, पिवळा भात, मी नाही खात; कारण चव नाही त्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 05:01 AM2019-07-01T05:01:24+5:302019-07-01T05:01:49+5:30

कुपोषणमुक्तीसाठी सुरुवातीला अंगणवाडीमध्ये बालकांना उसळ, वाटाणे, खिचडी, चवळी व मटकी, हरभऱ्याची उसळ दिली जायची.

The children say, yellow rice, I do not eat; Do not taste because of it! | मुले म्हणतात, पिवळा भात, मी नाही खात; कारण चव नाही त्यात!

मुले म्हणतात, पिवळा भात, मी नाही खात; कारण चव नाही त्यात!

googlenewsNext

- विलास बारी

जळगाव : मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्याच्या नावाखाली, शासनाने तीव्र कुपोषित मुलांना रेडी टू युज थेरपेटिक फूड म्हणून ‘ईझी नट पेस्ट पाकीट’ सुरू केले खरे; मात्र मुलांनाच ते आवडत नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेली पाकिटे एकतर फेकली जातात किंवा गुरांना टाकली जातात. दुसरीकडे अंगणवाड्यांमध्ये बचत गटांकडून दिला जाणारा आहारदेखील बेचव असल्याची तक्रार आहे.

कुपोषणमुक्तीसाठी सुरुवातीला अंगणवाडीमध्ये बालकांना उसळ, वाटाणे, खिचडी, चवळी व मटकी, हरभऱ्याची उसळ दिली जायची. त्यानंतर पोषण आहार शिजविण्याचा ठेका बचत गटांना दिला गेला. सध्या अंगणवाडीमध्ये ३ ते ६ वर्षे वयाच्या मुलांना एक दिवस वरणभात, तीन दिवस उपमा व शिरा आणि दोन दिवस कांदे पोहे व खिचडी देण्यात येते. मुलांच्या पोषणासाठी शासन बचत गटांना ८ रुपये अनुदान देते. त्यात ५० पैसे इंधनावर खर्च होत असून, ५० पैसे आहार तयार करणा-या बचत गटांना मिळतात. उर्वरित ७ रुपयांमध्ये तयार होणाºया आहारात कोणते पौष्टिक घटक राहणार? बेचव असणारा हा आहार बालक नाकारत आहेत. ‘पिवळा भात, मी नाही खात... का नाही खात, तर चव नाही त्यात,’ अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया बालकांची असते.

आता महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून तीव्र कुपोषित बालकांना पेस्ट स्वरूपात आहार दिला जात आहे. दिवसातून किमान तीन पाकिटे देण्यात येतात. एका पाकिटाची किंमत २५ रुपये. याप्रमाणे दिवसाला किमान ७५ रुपये एका बालकावर खर्च होतात. आधीच्या व्हीसीडीसी योजनेत राज्यातील कुपोषित मुलांना १८ कोटी रुपयांमध्ये गरम ताजा आहार मिळत होता. आता या पेस्ट पाकिटांवर सुमारे २५ कोटी रुपये सरकार खर्च करीत आहे.

ज्यांना हवे त्यांच्या वाट्याला किती?
सहा महिने ते तीन वर्षे वयाच्या अंगणवाडीतील मुलांसाठी तसेच शाळेत न जाणाºया किशोरवयीन मुली व गर्भवती मातांसाठी शासनातर्फे मुगाची डाळ, मसूरची डाळ, चवळी, हळद, मिरची व तेलाची पाकिटे दिली जातात. या पाकिटांमुळे कुपोषणमुक्तीला हातभार लागत असला, तरी हे पूर्ण अन्नघटक बाळ, किशोरवयीन मुली किंवा गर्भवतीच्या वाट्याला येतात का, असा प्रश्न आहे.

आदिवासी मुलांचा आहार हा वेगवेगळा आहे. शून्य ते ६ वर्षे हा वयोगट मुलांच्या बौद्धिक वाढीचा असतो. त्यासाठी कुपोषित बालकांना समतोल आहार देणे आवश्यक आहे. पेस्ट स्वरूपात देण्यात येणाºया आहाराची शिफारस कुणी केली? या आहारात त्रुटी असल्यास ते तपासण्याचे अधिकार कुणाला, हे सर्व निश्चित होणे गरजेचे आहे. तात्पुरत्या उपाययोजनेपेक्षा कायमस्वरूपी उपायांची गरज आहे.
- अ‍ॅड. बंड्या साने,
खोज सामाजिक संस्था, मेळघाट.

पेस्ट स्वरूपात देण्यात येणाºया या आहाराचा पूरक पोषण आहारात समावेश होतो. एका पाकिटातून बाळाला ४५ टक्के एनर्जी मिळते. बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक यात आहेत. कुपोषित बालकाच्या प्रतिकारशक्ती वाढीसाठी हे उपयुक्त आहे.
- डॉ. राजेंद्र पायघन, बालरोगतज्ज्ञ, जळगाव.

Web Title: The children say, yellow rice, I do not eat; Do not taste because of it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव