खान्देशच्या खाद्य संस्कृतीचे वेगळेपण अधोरेखित करणारे पुस्तक ‘दालगंडोरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:17 AM2018-06-05T00:17:14+5:302018-06-05T00:17:14+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात साहित्यिक अशोक कोतवाल लिखित ‘दाल गंडोरी’ या पुस्तकाचा रवींद्र मोराणकर यांनी करून दिलेला थोडक्यात परिचय.

 The book 'Dagandhori', underlining the uniqueness of food culture in Khandesh | खान्देशच्या खाद्य संस्कृतीचे वेगळेपण अधोरेखित करणारे पुस्तक ‘दालगंडोरी’

खान्देशच्या खाद्य संस्कृतीचे वेगळेपण अधोरेखित करणारे पुस्तक ‘दालगंडोरी’

googlenewsNext

मराठीत स्त्रियांना स्वयंपाकात मार्गदर्शन करणारी काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. परंतु जळगाव येथील साहित्यिक अशोक कोतवाल लिखित ‘दालगंडोरी’ या पुस्तकात खान्देशातील वैशिष्ट्यपूर्ण खाद्य पदार्थांबद्दल, त्यांच्या चवीबद्दल, त्यांच्या आस्वादाबद्दल लिखाण करण्यात आले आहे. प्रत्यक्ष स्वादाचा अनुभवच येथे शब्दरूपाने अनुभवायला मिळतो. एक वैशिष्ट्य म्हणजे खान्देशातील आगळ्या-वेगळ्या पदार्थांची कृतीही त्यांनी सविस्तर सांगितली आहे. म्हणजे कोणते पदार्थ किती घ्यावेत, ते कसे भाजावेत, पुढे काय करावे हे त्यांनी इतक्या सविस्तरपणे सांगितले की, लेखकाच्या हातचे किंवा त्यांच्या सल्ल्याने हे पदार्थ आपण खाल्लेच पाहिजेत, अशी तीव्र भावना होते. येथे ते त्या पदार्थांच्या स्वादाचे निराळेपण सांगतातच, परंतु संपूर्ण कृतीही (रेसीपी) सांगतात. पदार्थांची चव, त्यांचे अनोखेपण, त्याचे दिसणे, त्याचा गंध, त्याचा स्पर्श अशा विविध अंगांनी तो पदार्थ आपल्या अनुभवाचा विषय होऊन जातो. पुस्तकाच्या प्रारंभीच लेखक म्हणतो की, आपले आयुष्य खाण्यामध्ये तर संपणार नाही ना? या मिष्कील वाक्यापासून सुरू होणारे हे मुक्त गद्य पदार्थांच्या रस, रंग-गंधासह प्रत्यक्ष चवीचा अनुभव देते. प्रत्येक पदार्थाची सामग्री आणि कृतीही सविस्तरपणे दिली आहे. तीही ललित भाषेत वर्णन केली आहे. तांत्रिक भाषेत नाही. खान्देशातील काही पदार्थ फक्त खान्देशातच तयार होणारे आणि त्या मागे काही कहाण्याही आहेत. उदा. फौजदारी डाळ अशीच अपघाताने तयार झालेली आणि पुढे लोकप्रिय झालेली. रस्त्याने येणारा जाणारा एक फौजदार एका घरात शिरतो आणि कोंबडी करण्याची आज्ञा देतो. घरातील पुरुष मंडळी कोंबडी आणायला जातात. कोंबडी मिळत नाही. तेव्हा घरातील बायकांनी आपली प्रतिभा वापरून काही डाळी एकत्र करून डाळ केली. फौजदार तृप्त झाला आणि तेव्हापासून ‘फौजदारी डाळ’ असे नामाभिधान प्राप्त केलेली डाळ अतिशय लोकप्रिय झाली. याशिवाय ‘सातपुडी पाटोड्या’ खाऊन दरोडेखोर कसा तृप्त होतो व दरवर्षी पाटोड्याची खंडणी कशी वसूल करतो याची हकीकतही लेखकाने रंजकपणे मांडली आहे. थोडक्यात, ग्रामीण भागातील मनोविश्वावर प्रकाशझोत टाकणारे ‘दालगंडोरी’ हे पुस्तक महिलावर्गासोबत सर्वांना आपलेसे करेल, असे वाटते.
लेखक : अशोक कोतवाल, पृष्ठे : ९८, मूल्य २०० रुपये

Web Title:  The book 'Dagandhori', underlining the uniqueness of food culture in Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.