‘अक्षय’ आनंद : सुवर्णनगरीत सोन्याची दुप्पट विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 08:00 PM2019-05-07T20:00:28+5:302019-05-07T20:01:18+5:30

दुपारनंतर सराफ दुकानांमध्ये गर्दी

'Akshay' Anand: Double gold sales of gold | ‘अक्षय’ आनंद : सुवर्णनगरीत सोन्याची दुप्पट विक्री

‘अक्षय’ आनंद : सुवर्णनगरीत सोन्याची दुप्पट विक्री

Next

जळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेला सुवर्णनगरी जळगावात सोन्याला दुप्पट मागणी होती. यामुळे दिवसभरात तब्बल १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. मंगळवारी अक्षयतृतीयेच्या मुहर्तावर भाव वाढ होण्याऐवजी प्रति तोळा १०० रुपये भाव कमी होऊन सोने ३२,१०० रुपयांवर आले. ऐन मुहूर्तावर भाव कमी झाल्याचा अनेक वर्षानंतर योग आल्याने ग्राहकांनीही खरेदीचा ‘अक्षय’ आनंद घेण्याचा प्रयत्न केला.
अक्षय्यतृतीयेला सोने खरेदीला अनन्य महत्त्व असल्याने जळगावात सोने खरेदीसाठी या दिवशी मोठी गर्दी होत असते. यंदाही असे सुखद चित्र पहावयास मिळाले.
गेल्या वर्षाच्या तुलनेत ५०० रुपयांनी वाढ
गेल्या वर्षी अक्षयतृतीयेच्या आठवडाभरापूर्वी सोने ३१ हजार १०० रुपयांवर होते. त्यात वाढ होत जावून अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर ते ३१ हजार ६०० रुपये प्रति तोळा झाले होते. मात्र यंदा सोन्याच्या भावात घट झाल्याचे चित्र आहे. सोमवारी ३२ हजार २०० रुपये असलेले सोने मंगळवारी ३२ हजार १०० रुपयांवर आले. या सोबतच गेल्या महिन्याच्या तुलनेत सोने ६०० ते ७०० रुपये प्रती तोळ््याने कमी झाल्याने ग्राहकांनी खरेदीचा आनंद घेत मुहूर्तही साधला. एकीकडे कमी झालेले भाव व आलेला अक्षय मुहूर्त यामुळे सोन्याच्या विक्रीत दुप्पट वाढ झाल्याचे शहरातील प्रमुख ज्वेलर्सच्यावतीने सांगण्यात आले. या प्रमुख सराफी दुकानांसह एकूण १५० फर्ममध्ये एकूण किती उलाढाल झाली याचा नेमका आकडा सांगणे कठीण असले तरी १० ते १२ कोटींची विक्री झाल्याचे जाणकार सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
दुपारी वाढली गर्दी
सोने खरेदीसाठी दुपारी १२ नंतर गर्दी वाढत गेली. आजच्या मुहूर्तावर नवीन दागिने खरेदी तर झालीच सोबतच या मुहूर्तावर खरेदी केलेले सोने अक्षय राहते, अशी श्रद्धा असल्याने दागिने घ्यायचे नसले तरी किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी केले पाहिजे, याकडेही मोठा कल होता. त्यामुळे सुवर्ण बाजारात मोठी उलाढाल दिसून आली.
दागिन्यांमध्ये शॉर्ट पोतला पसंती दिली जात होती. त्या सोबतच गळ््यातील चैन (सुवर्ण साखळी), मंगळसूत्र, कर्णफुले, बांगड्या, अंगठी यांचीही खरेदी झाली. या दिवशी सोने घेऊन ठेवायचे म्हणून सोन्याचे शिक्के, तुकडे यांचीही ग्राहकी होती. यात मंगळसूत्र घडावणीवर सूट दिली जात होती.
जळगाव शहरात सराफ दुकानांची संख्या १५०च्यावर आहे. यात प्रमुख दुकानामध्ये सोन्याचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येते. यामध्ये १०० ते २०० रुपयांची तफावत असते.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठा उत्साह राहिला. मुहूर्तावरील खरेदीसाठी सकाळपासूनच ग्राहकी सुरू झाली होती. दुपारी गर्दी वाढून दुकानात पाय ठेवायलादेखील जागा नव्हती.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला. नेहमीपेक्षा आज सोने खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी झाली होती.
- मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी.

दररोजपेक्षा आज सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. नेहमीपेक्षा आज दुप्पट विक्रीचा अंदाज आहे.
- भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक.

Web Title: 'Akshay' Anand: Double gold sales of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव